लोकभाषेतील जैनधर्म...
वैदिक संस्कृतीपासून तीर्थस्थानांच्या ठिकाणाच्या विविध विधींना अत्यंत महत्व देण्यात आले. आज ही माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत तीर्थस्थानाशी त्याचा संबंध असतोच. जन्माला आल्यानंतर डोक्यावरच्या काढलेल्या पहिल्या केसांपासून ते अस्थि विर्सजनापर्यंत माणसाचे तीर्थस्थानाशिवाय पान हलत नाही. भारतातील गंगा,नर्मदा,गोदावरी इत्यादी काही नद्यांमधील स्नानाला वेगळेच महत्व देण्यात आले आहे.पापं धूण्यासाठी गंगा नदी सर्वात महत्वाची मानली जाते. जीवनाच्या सायंकाळी अनेकांना गंगास्नानाची ओढ लागलेली दिसते. गंगेत अथवा विशिष्ट तीर्थस्थानी स्नान केल्यास पापमुक्तीची शंभर टक्के गॅरंटी दिलेली आहे. पापं धूऊन जाण्याच्या धार्मिक शिकवणीचे व सामाजिक रुढीचे अत्यंत विवेकपूर्ण खंडन 'सूयगदांग' या जैन अंगग्रंथांतील तृतीय अंगग्रंथात करण्यात आले आहे. सूयगदांगमध्ये पाप धूण्याच्या रुढीवर प्रश्नचिन्ह उभे करतांना पाण्यात स्नान करून पापमुक्ती होत असेल, तर बेडूक,मगर व सांपासारखे प्राणी माणसांपेक्षा श्रेष्ठ होत व त्यांना प्रथम मुक्ती मिळाली पाहिजे. तसेच तीर्थस्नानाने जर पाप धुवून जाते तर पुण्यही धुतले जात असेल असा तर्क करण्यात आला आहे. वैदिक संस्कृतीत यज्ञ व त्यातील अग्नी यांना अनन्यसाधारण महत्व होते. अग्निहोत्र्याने सदैव अग्नीपूजा केली पाहिजे. त्याच्या घरातील होमकुंड विझता कामा नये. परंतु लोहार,सोनारांसारखे सदैव अग्नीच्या माध्यमातून स्वतःचे काम करणारे लोक देखील सतत अग्नीसमोरच असतात. मग ते अग्नीहोत्र्यापेक्षा श्रेष्ठ होत. अशी उपहासात्मक चर्चाही सूयदांगात करण्यात आली आहे. वैदिक परंपरेला विरोध करणा-या जैन धर्माच्या वाङ्मयात २४ तीर्थंकरांच्या आधुनिक व विवेकप्रामाण्यवादी तत्त्वज्ञानाचा सार असलेला दिसतो. लोकभाषा,लोककथा व नीतिकथा यांच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवादी असे हे वाङ्मय भारताच्या भाषिक व साहित्यिक इतिहासाचे एक सोनेरी पर्वच म्हणावे लागते. भगवान महावीर-भगवान बुद्ध या दोन्ही समकालीन महापुरुषांनी लोकभाषेतून जनसामान्यांशी संवाद साधला. आपल्या अनुयायांना देखील लोकभाषेचाच वापर करण्याचा संदेश दिला. लोकभाषेच्या वापरामुळे त्यांच्या धर्मपरंपरेचा प्रचार-प्रसार झपाटयाने तर झालाच,मात्र हे महापुरुष व त्यांचा धर्म जनसामान्यांना आपले वाटू लागले. कारण हे धर्म त्यांची भाषा बोलत होते. महाराष्ट्राचा विचार करता महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय हे लोकभाषेच्या वापराचे उत्तम उदाहरणं सांगता येतात. महावीर त्यांच्या काळातील कोणती लोकभाषा वापरत होते,याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे असलेली दिसतात. त्यांच्या काळात मगध राज्यात म्हणजेच प्राचीन बिहारमध्ये अर्धमागधी भाषेचा वापर कितपत होत होता,याविषयी निश्चित असे पुरावे उपलब्ध नाहीत. महावीरांनंतर जैन धर्मपरंपरेत जाणिवपूर्वक ग्रंथ निर्मिती फार नंतर होऊ लागली. एका जैनधर्मकथेनुसार महावीरांनी आपला उपदेश तोंडी सांगितला व तो गणधरांनी लिहून आढला. 'गणिपिटिका' या नावांने तो उपदेश ग्रंथबद्ध झाला. या पुस्तकांच्या आधारावर उपाध्यायांनी श्रमणांचे संस्कार शिकविले. दुस-या जैन कथेप्रमाणे महावीरांचा उपदेश भाषाभिन्नता असूनही सर्व लोकांच्या सहज ध्यानात आला. जैन लोक अर्धमागधीला पवित्र धर्मभाषा मानतात व त्या दुष्टीनेच तिचा अभ्यास करतात. जैनांच्या धार्मिक वाङ्मय निर्मितीचा प्रवाह लोकभाषा अर्धमागधी-संस्कृत-जैनसंस्कृत असा झालेला दिसतो. हा प्रवास पाहणे अत्यंत महत्वाचे ठरते. इसवीसनाच्या दुस-या शतकांतील काही संस्कृत व प्राकृत भाषा यांचे मिश्रण असलेले जैन धर्मग्रंथ मथुरेजवळ सापडले आहेत. संस्कृतसोबतच मथुरा परिसरातील त्या काळातील लोकभाषेचा वापर या ग्रंथांमध्ये दिसतो. जैन वाङ्मय अर्धमागधी व संस्कृत अशा दोन्ही भाषेत समांतर निर्माण होत होते। असा कयास करता येतो. इसवीसनाच्या अकराव्या शतकापासून पुढे साहित्यिक संस्कृत भाषेत जैन ग्रंथ लिहिले जाऊ लागले. नंतर मध्यभारत व आसपासच्या बोलीतील शब्द स्वीकारून तयार झालेली जैन संस्कृत भाषा पुढे विकसित होत गेली. त्या भाषेची लकब कांही निराळीच वाटते म्हणून तिला जैनसंस्कृत म्हटले आहे. भारताच्या भाषिक इतिहासाच्या दृष्टीने जैन साहित्यातील कालानुरूप होत गेलेली भाषिक परिवर्तने अत्यंत महत्वाची आहेत. अतिप्राचीन काळ ते आजचा काळ येथपर्यंत भारतीय भाषांमध्ये होत गेलेले बदल जैन वाङ्मयात नकळतपणे नोंदवले गेलेले दिसतात. आर्यभाषा व द्रविडभाषा अशा दोन्ही भाषांमध्ये जैन साहित्य निमार्ण झाले. हे त्याचे आणखी एक वेगळेपण दिसते. भारताच्या ज्या प्रदेशात जैन लोक वास्तव्यास गेले,त्या प्रदेशाची भाषा त्यांनी स्वीकारली. आधुनिक संस्कृतपासून निर्माण झालेल्या भारतीय भाषांना जवळची किंबहुना पूर्व रूप मानलेल्या अपभ्रंश भाषांमध्ये बरेच जैन वाङ्मय लिहिले गेले. इसवीसनाच्या चौदाव्या शतकाच्या जवळपास व त्यानंतर हे साहित्य आधुनिक भारतीय भाषांमध्ये लिहिले गेले. जैन धर्मपरंपरेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वसामन्य लोकांसाठी जैन साहित्य लेखकांनी समकालीन बोलीभाषांचा अत्यंत चांगला वापर केला. संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश-देशीभाषा असा भारतीय भाषांचा कालानुक्रमे होत गेलेला प्रवास अभ्यासण्यासाठी जैन वाङ्मय उपयुक्त ठरते. भद्रबाहूंनंतर दक्षिणेतील द्रविड भाषाकुळातील कन्नड भाषेत देखील जैन साहित्य निर्माण झाले. कन्नडमध्ये विपुल प्रमाणात जैन साहित्यनिमिती दक्षिणेत राहिलेल्या जैन मुनींनी केलीली दिसते. भगवान बुद्धांप्रमाणेच भगवान महावीरांनी स्वतः वाङ्मय निर्मिती केली नाही. आपल्या गणधर शिष्यांना धार्मिक तत्त्वे समजावून दिल्यावर त्यांच्या पालनाची व जतनाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. १४ पूव्वांच्या स्वरूपात ही धर्मतत्त्वे सांगितली होती. पुढे सहा पिढयांपर्यंत गणधरांनी ही तत्त्वे मुखोद्गत ठेवून मौखिक परंपरेने त्यांच जतन केले. सम्राट चंद्रगुप्त मौर्यच्या काळात पूव्वांच्या पुनर्रचनेवरून भद्रबाहू व स्थूलभद्र यांच्यातील मतभेदांमुळे अनुक्रमे दिगंबर व श्वेतांबर पंथांची निर्मिती झाली. ग्रंथनिर्मिती जैन धर्माच्या दोन पंथांमध्ये विभाजनास कारणीभूत ठरली,असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. स्थूलभद्रांनी महावीरांच्या गणधरांनी मुखोद्गत करून ठेवलेल्या तत्त्वज्ञानाच्या १४ पूव्वा बारा अंगांत समाविष्ट करून घेतल्या. म्हणूनच या बारा अंगांना 'दिट्ठीवय'(दृष्टिवद) असे म्हणतात. पुढे मूळ 'दिट्ठीवय' हरवले. त्यामुळे बारा अंगातील चौथ्या अंगांचे चौदा 'पूव्वा' रूढ झाले. या धर्मग्रंथांचे एकूण सत्तेचाळीस विभाग आहेत. त्यांत अकरा अंगे,बारा उपांगे,दहा पइष्ण,सहा छेदसूत्रे,चार मूळ सूत्रे आणि चार स्वतंत्र सूत्रे आहेत. दक्षिणेकडून परत आल्यावर भद्रबाहूंनी ही सूत्रे अमान्य केली. त्यांनी 'कल्पसूत्र' ग्रंथाची रचना केली. कल्पसूत्र,छेदसूत्रांचाच भाग आहे. भद्रबाहू आणि त्यांचा दिगंबर मुनीसंघ यांच्या मते मूळ धार्मिक उपदेश नाहीसे झाले,असून जे उपल्बध आहेत त्यांत बदल झालेला आहे आणि महावीरांनी केलेल्या पवित्र उपदेशाचे लोकांना विस्मरण झालेले आहे. इसवीसनाच्या पांचव्या शतकात गुजरातमध्ये वल्लभी या ठिकाणी पुन्हा एका जैन धर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले. काही जूने सिद्धांत अशंतः नाहीसे झाले आहेत व अशंतः नवीन बनवले गेले आहेत हया तत्त्वाला वल्लभी धर्मसभेने मान्यता दिली. हया सिद्धांतांना व्यवस्थित स्वरŠप देण्याचे महत्वाचे काम वल्लभी धर्मपरिषदेने केले. जैन धर्माच्या मूळ ग्रंथांना सिद्धांत अथवा आगम असे म्हणतात. आगम या मूळ धर्मग्रंथातील पहिल्या महत्वाच्या बारा अंगांना श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही पंथांच्या विद्वानांची मान्यता आहे. अभ्यासकांच्या मते श्वेतांबर पंथीयांचेच 'सिद्धांत अथवा आगम ग्रंथ' आज उपलब्ध आहेत. वल्लभीची धर्मसभा देखील पाटलीपुत्रप्रमाणे श्वेतांबरांची धर्मपरिषद होती. देवर्द्धिगणी नावाच्या धर्मपंडिताने जैन धर्मग्रंथांच्या पुनर्रसंकलनाचे महान काम या धर्मपरिषदेत केले. जैन धर्मांचे अवलोकन केले असता अवैदिक जैन धर्मपरंपरा व वैदिक परंपरा यांच्या एकमेकावर पडलेल्या प्रभावांची प्रचीती येते. महाभारतकालीन बहुपतीत्वाची परंपरा स्पष्ट करणारी धर्मशील द्रौपदीची कथा बारा अंगापैकी पष्ठामांगांत आली आहे. याच पष्ठामांगांत महाभारत कथा,कृष्णलीला,द्वारका जळून भस्म होणे,यादवांचा विनाश इत्यादी घटना महाभारतातील वर्णनात काहीसा बदल करून मांडण्यात आलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णला जैन धर्मावलंबी मानले आहे. तसेही श्रीकृष्णाच्या अवैदिकतेसंदर्भात अवैदिक धर्मपरंपरा व आधुनिक संशोधन यांनी कायमच मांडणी केली आहे. यासाठी सबळ पुरावे देखील देण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केलेला दिसतो. कल्पसूत्र हा ग्रंथ नंतर निर्माण झाला असूनसुद्धा जैनांच्या मते तो सर्व श्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. पहिल्या विभागात चोवीस तीर्थंकरांच्या चरित्राचे वर्णन आहे. दुस-या विभागात समाजातील निरनिराळे दल व त्यांच्या प्रमुखांची माहिती आहे. तिस-या विभागात मुनी धर्माचे विवेचन आहे. मूलसूत्र या ग्रंथात अनेक नीतिकथा,उपदेशकथा व साधूंचे संवाद आहेत. जैन वाङ्मयात संवादात्मक स्वरूपात चर्चा करणारे ग्रंथ विपुल आहेत. लोकभाषेचा वापर संवादासाठी करण्यात आला आहे. लोकभाषांच्या विस्तारामुळे संस्कृत भाषा मागे पडली. ती केवळ विद्वानांची व वैदिकांची भाषा राहिली. कालप्रवाहानुसार जैन धर्मात संस्कृत भाषेतील ग्रंथ निर्माण झाले. परंतु मुख्यतः लोकाभाषांना त्यांनी महत्व दिले. त्यामुळे जैन वाङ्मयात संस्कृतचा वापर कमी-कमी होत गेला. मध्ययुगीन काळातील भक्ती आंदोलनांनी लोकभाषांचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. आजही जैन वाङ्मय आधुनीक भारतीय भाषांतून लिहिले जात आहेत. जैन वाङ्मयाचा अफाट विस्तार एका लेखात करणे म्हणजे 'गागर मे सागर' भरण्याचा प्रयत्न ठरतो.
डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी – ८३०८१५५०८६
(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)
Comments
Post a Comment