१३ मेरा ७
अमेरिकेचा राष्ट्रध्वज आपण पाहतो,तेंव्हा त्यावर १३ पट्टया असलेल्या दिसतात. हया तेरा पट्टया राष्ट्रध्वजावर विनाकारण नाहीत. अमेरिकेच्या धरतीवर वसलेल्या मूळच्या तेरा वसाहतींचे ते प्रतिक आहे. १६०७ साली जेम्स टाऊन ही पहिली वसाहत संयुक्त स्टॉक कंपनी इंग्लंडने स्थापन केली. यामुळेच आजच्या अमेरिकेच्या निर्मितीचे श्रेय इंग्लंडकडे जाते. अमेरिकेच्या भूमीवर यानंतर म्हणजे १७३२ पर्यंत आणखी १२ वसाहती स्थापन झाल्या.हया सर्वच वसाहती इंग्रजांनी स्थापन केलेल्या नव्हत्या. मात्र काही काळाने त्या इंग्लंडच्या राजसत्तेच्या अधिपत्याखाली आल्या. व्यापार,धर्म व शेती असे विविध हेतू हया वसाहतींची स्थापना होण्यामागे होते. अमेरिकेतील मूळ तेरा वसाहती तीन वेगवेगळया भागांत वसविल्या गेल्या. हे तीन भाग म्हणजे न्यू इंग्लंड,मध्य आणि दक्षिण अमेरिका. जेम्स टाऊन म्हणजेच व्हर्जिनिया वसाहत लंडन व प्लिमथ संयुक्त स्टॉक कंपनी यांच्याकडून १६२४ साली इंग्लंडच्या राजाच्या अधिपत्याखाली आली. व्हर्जिनिया वसाहतीनंतर १६२३ मध्ये मॅसेच्युसेटस् वसाहत स्थापन झाली. १६२३ ला मॅसेच्युसेटस् बे कंपनीला इंग्लंडच्या राजाने दिलेल्या आज्ञेनुसार या वसाहतीची स्थापना झाली. काही अभ्यासकांच्या मते पुराणमतवादी इंग्रजांनी या वसाहतीची स्थापना केली होती. 'बोस्टन टी पार्टी' म्हणून जगाच्या इतिहासात प्रसिद्ध असलेली घटना ज्या बोस्टन शहरात घडली,ते बोस्टन शहर याच मॅसेच्युसेटस् वसाहतीत १६३० ला निर्माण करण्यात आले होते. मॅसेच्युसेटस् वसाहत पुढे मॅसेच्युसेटस्,ऱ्होडे आईसलंड व कनेक्टिकट या तीन भागात विभाजीत झाली. प्युरिट संप्रदायाच्या असहिष्णूतेमुळे हे विभाजन झाले होते. प्युरिट,बॅप्टिस्ट व क्वेकर्स या तीन ख्रिश्चन संप्रदायांच्या आपापसातील संघर्षाचा मोठा इतिहास मॅसेच्युसेटस्ला आहे. १६२३ साली न्यू हॅम्पशायर वसाहत स्थापन झाली.जॉन व्हीलराईट नावाच्या इंग्लंडमधून तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तीने ही वसाहत निर्माण केली. व्हीलराईट इंग्लंडवरुन पळून आला होता. त्याने एक्झिटर शहर वसवून न्यू हॅम्पशायर वसाहतीला नावलौकिक मिळवून दिला. त्याच्यापूर्वी खरे तर ही वसाहत जन्माला आलेली होती. मात्र तिला एक स्वतंत्र वसाहतीचा दर्जा मिळालेला नव्हता. इंग्लंडचा राजा चार्ल्स प्रथम याने एक कॅथोलीक सद्गृहस्थ लॉर्ड बाल्टिमोर याला व्हर्जिनियाच्या उत्तर-पूर्व भागातील विस्तृत प्रदेशाचा अधिकार प्रदान केला. १६३२ ला बाल्टिमोर याला हे दानपत्र देण्याचा निर्णय झाला;परंतु दानपत्रावर राजाचे हस्ताक्षर होण्यापूर्वीच बाल्टिमोर याचे निधन झाले. त्यामुळे त्याचा मुलगा ऐसिलिअस कॉलवर्ट याला हे दानपत्र प्रदान करण्यात आले. इंग्लंडची सम्राज्ञी हेंरिटा मारिया हिच्या सन्मार्थ या वसाहतीचे नामकरण मेरीलँड असे करण्यात आले. न्यू हॅम्पशायरमधून अलग होत कनेक्टिकट वसाहतीची स्थापना १६३५ साली झाली. यामागे प्रामुख्याने धार्मिक व आर्थिक प्रेरणा होती. प्युरिटीन संप्रदायाच्या जाचाला व असहिष्णूतेला कंटाळून धार्मिक स्वातंत्र्याच्या शोधात काही लोकांनी या भागाकडे प्रयाण केले. तसेच केपास नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या या भागातील जमीन अत्यंत सुपिक होती. त्यामुळे शेती करणा-यांसाठी हे वरदानच ठरले. तसेच नदीतून होणाऱ्या जलवाहतूकीमुळे दळणवळण अत्यंत सोयीचे होते. यामुळे कनेक्टिकटमध्ये लवकरच विंडसर,वेदर्सफिल्ड,हार्टफोर्ड व स्प्रिगफिल्ड ही चार शहरं निर्माण झाली. कनेक्टिकटच्या स्थापनेत थॉमस हूकर नावाच्या एका तरुण धर्मगुरूचे नेतृत्व महत्वाचे ठरले. मॅसेच्युसेटस्चे राजकारण व धर्माधता यांना कंटाळून हूकर आपल्या अनुयायांना घेऊन शेकडो मैल जंगल तूडवून या भागात पोहचला. यामुळेच तोच या वसाहतीचा संस्थापक ठरतो. हूकर आणि त्याचे अनुयायी इंग्रज येथे पोहचण्यापूर्वीच तेथे डच लोकांची वस्ती अस्तित्वात होती. इंग्रज आले तरी डच लोक त्यांनी बांधलेल्या फोर्ट गुड होप या किल्ल्यावर तग धरून राहिले. ते या भूमीवरचा ताबा व अधिकार सोडण्यास तयार नव्हते. अखेर १६५४ साली इंग्रजांशी झालेल्या युद्धात डचांचा पराभव झाला आणि त्यांना या भूमीचा त्याग करावा लागला. १६३६ साली कनेक्टिकटनंतर ऱ्होडबेट किंवा ऱ्होड आईसलंड वसाहत स्वतंत्र झाली. १६३८ साली न्यू हेवेन नगराची स्थापना थियोफिलस ईटन नावाच्या श्रीमंत व्यापा-याने केली. काही काळ न्यू हेवनला स्वतंत्र वसाहत मानण्यात आले;परंतु १६६२ साली इंग्लंडच्या राजच्या आज्ञापत्रानुसार न्यू हेवन कनेक्टिकटमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे १३ मूळ वसाहतींमध्ये न्यू हेवन स्वतंत्रपणे समाविष्ट करण्यात येत नाही. अमेरिकेच्या सागरी किना-यावर इंग्लंडचे प्रभूत्व स्थापन करण्याच्या हेतूने विल्यम पेन याने इंग्लंडच्या राजाला अनुकुल करुन घेतले. यामुळे डेलवर ही पिटर मिन्युइट याच्या नेतृत्वात निर्माण झालेली स्विडीश वसाहत इंग्लंडच्या ताब्यात आली. भविष्यात ही वसाहत पेनासिल्वेनियाचा भाग करण्यात आला. मात्र १७०२ मध्ये डेलवरला एक स्वतंत्र प्रांत म्हणून मान्यता देण्यात आली. १६७९ पर्यंत मॅसेच्युसेटस्,न्यू हॅम्पशायर,मेरीलँड,कनेक्टिकट,-ऱ्होडे बेट व डेलवर या वसाहती एक-एक करुन ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्यात आल्या. व्हर्जिनिया व फ्लोरिडा यांच्यामधील एक विस्तृत भूभाग वसाहत करण्यास योग्य असा होता. स्पेनने यावर आपला अधिकार घोषित केला असला तरी सुमारे साठ वर्षे यासंदर्भात त्याच्याकडून काहीही पाऊलं उचलण्यात आली नव्हती. स्पेनच्या उदासिनतेमुळे इंग्लंडला या भूभागावर वसाहत स्थापन करण्याची संधी साधता आली. १६५३ पासून या भागातील चौवान नदीच्या किना-यावरील अल्बेमार्लच्या खाडजवळ व्हर्जिनियाच्या काही साहसी मळेवाल्यांनी आपले मळे फुलवले होते. चौवान नदीच्या खो-यातील ही भूमी सुपीक आणि सहज मशागत करण्यास योग्य होती. तसेच या भागाती विविध नदयांमध्ये विपुल प्रमाणात माशांची पैदास होत होती. व्हर्जिनिया आणि या भागाच्या मध्ये असणारा प्रचंड मोठा दलदलीचा भाग,इतर प्रदेशांपासून दूर अंतरावर असणे,उथळ बंदरे,दुर्गमता इत्यादी कारणांनी हया भूभागावर वसाहतीचा विकास मंदगतीने झाला. १६६३ व १६६५ च्या इंग्लंडच्या राजा चार्ल्स चौथा याच्या आज्ञापत्राने व्हर्जिनियातील व इंग्लंडमधील काही कृपापात्र इंग्रजांना येथे वसाहत करण्याचा अधिकार देण्यात आला. राजाच्या कृपापात्रांनी त्याच्या सन्मार्थ या प्रदेशाचे नामकरण कॅरोलिना करण्यात आले. लॅटिन भाषेतील कॅरालस(Cerlus) शब्दच इंग्रजीत चार्ल्स या अर्थाने वापरला जातो. हा भाग आज उत्तर कॅरोलिना म्हणून ओळखला जातो. या भागात वस्ती वाढविण्याच्या दृष्टीन राजसत्तेने अधिक रस दाखवला नाही. कॅरोलिनाच्या दक्षिण भागात मात्र वस्ती करण्यास लोक अधिक उत्सुक होते. त्यामुळे १६८० मध्ये चार्ल्सटन शहराची निर्मिती झाली. हा प्रदेश धार्मिक प्रतिबंधांपासून मुक्त ठेवण्यात आल्यामुळे सर्व संप्रदायांचे अनुयायी येथे आले. तसेच डच,फ्रेंच ,स्कॉटिश,आयरीश,जर्मन,स्वीडीश इत्यादी लोक येथे पोहचले. अशा सर्व लोकांनी आपल्या परिश्रमाने या भूमीचे नंदनवन केले. १७२९ मध्ये ही वसाहत इंग्लंडच्या राज्याला विकण्यात आली. लॉर्ड बर्कले व सर जॉन कार्टरेट या दोन इंग्रज मित्रांनी,डेलवरची खाडी,नदी व अटलांटिक महासागराची मध्यवर्ती भूभाग इंग्लंडच्या राजाकडून विकत घेतला. त्याचे नामकरण त्यांनी न्यू जर्सी असे केले. कार्टरेट हा इंग्लंडमधील जर्सी प्रातांचा गर्व्हनर राहिला होता. त्याची आठवण म्हणून अमेरिकेत त्याने न्यू जर्सी निर्माण केले. १६०९ मध्ये एक इंग्रंज हेन्री हडसन याला डचांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने अमेरिका यात्रेसाठी पाठवले. हडसन उत्तर अमेरिकेच्या किना-यापर्यंत पोहचला,मात्र प्रशांत महासागराचा मार्ग शोधू शकला नाही. एका नदीच्या काठावरुन त्याने अमेरिकेच्या भूमीचे दर्शन घेतले. पुढे ही नदी हडसन नदी म्हणूनच ओळखली गेली. हा प्रदेश डचांचा प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला. इंग्लंड हे मान्य नव्हते. युरोपात तीस वर्षे जे युद्ध चालू असतांना इंग्लंड व हॉलंड यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. १६४८ ला युद्ध संपले आणि मैत्रीही संपुष्टात आली. इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय याने आपला भाऊ डयूक ऑफ यार्क व अल्बानी याला अमेरिकेतील या प्रदेशाचे अधिकार दिले. त्याने स्वारी करुन डचांना तेथून पळवून लावले. पुढे एका युद्धात डचांनी इंग्रजांकडून न्यू एमेस्टरडॅम जिंकून घेतले. १९७४ च्या संधीनुसार मात्र डचांनी न्यू नेदरलँड परत केले. ज्याचे नाव इंग्रजांनी न्यू यॉर्क असे ठेवले. इंग्लंडमधील एडमिरल सर विल्यम पेन हा अतिशय धनाढय आणि चार्ल्स द्वितीय व जेम्स द्वितीय या दोघांचा मित्र होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा व ऑक्सफर्डचा एक बुद्धिमान विद्यार्थी विल्यम पेन द्वितीय याला वारसा हक्काने इंग्लंडच्या सम्राटावरील ८०,००० डॉलरच्या कर्जाचे हक्क देखील मिळाले. कर्जाच्या मोबदल्यात सम्राटाने १६८१ त्याला पेनासिल्वेनिया आणि १६८२ ला डेलवर प्रांताचे सर्वाधिकार दिले. त्याने आपल्या पित्याच्या नावावरुन या प्रातांचे नाव पेनासिल्वेनिया असे केले. विल्यम पेन या भूभागाचा स्वामी होण्यापूर्वीच काही डच,स्विडीश व इंग्रज लोक येथे वसलेले होते. पेन याने सर्वांना स्वतंत्र जीवन जगण्याचे आश्वासन व प्रोत्साहन दिले. यामुळे युरोपातील विविध देशातील व पंथातील लोक या भूमीकडे आकर्षित झाले. सुपीक जमीन,आरोग्यदायी हवामान,दळण-वळणाची सुगमता,परिश्रमशील,व्यवहारी व संपन्न नागरिक यामुळे या प्रदेशाचा झपाटयाने विकास झाला. बंधूता किंवा बंधूप्रेम असलेले नगर म्हणजेच फिलेडेल्फियाची पायाभरणी झाली. १६८१ ला पेन स्वतः येथे आला. धार्मिक बाबतीत अत्यंत उदान व सहिष्णू असलेला हा ऑक्सफर्डचा विद्यार्थी खरा जननायक ठरला. त्याने आदिवासी समाजाचा मूलनिवासी म्हणून जगण्याचा संपूर्ण अधिकार मान्य केला. यामुळे पेनासिल्वेनिया एक अतिशय समृद्ध प्रांत म्हणून नावारूपाला आला. जॉर्जिया ही इंग्लंडची अंतिम वसाहत. १७३२ साली जेम्स एडवर्ड ओग्ले थॉर्प या अत्यंत उदार व दयाळू व्यक्तीने निर्माण केली. कर्ज चूकवता न आल्याने इंग्लंडच्या तुरूंगामध्ये खितपत पडलेल्या लोकांची सुटका करुन त्यांना एक नवे जीवन देण्याचा ध्यास ओग्ले थॉर्प याने घेतला. त्याने जॉर्ज प्रथम यांच्याकडून सवान्ना नदीच्या दक्षिणेकडील भूभाग दानपत्राद्वारे प्राप्त केला. येथे वसाहत स्थापन करण्यात इंग्लंडमधल्या काही धनाढय लोकांनी ओग्ले थॉर्पची मदत केली. जॉर्ज प्रथमच्या नावावरुन वसाहतीला जॉर्जिया असे नाव देण्यात आले. सामाजिक सुधारणेचा एक प्रयोग म्हणजे जॉर्जिया सांगता येतो. अपराधी व ऋणको लोकांना सुधारण्याची संधी येथे मिळाली. १७५२ ला जॉर्जिया देखील इंग्लंडच्या साम्राज्याचा भाग म्हणून घोषित करण्यात आला. अशाप्रकारे धर्म,व्यापार व शेती यापैकी किमान एक कारण प्रत्येक वसाहतीच्या स्थापनेत महत्वाचे ठरले. प्रत्येक वसाहतीचा स्वतंत्र इतिहास पाहिला असता,आजच्या अमेरिकेच्या सर्व छटांचा उगम आपल्याला शोधता येतो. म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावर हे पट्टे भविष्यात सर्व वसाहतींनी दाखविलेल्या १३ मेरा ७ (तेरा मेरा साथ) चे प्रतीक म्हणून दिमाखाने झळकत आहेत.
Comments
Post a Comment