दिगंबर-श्वेतांबर इत्यादी..
भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर जैन मुनींमध्ये तात्विक मतभेदांना सुरवात झाली. मुनींमधील हे मतभेद वाढत गेले. यामधून जैन धर्म दोन प्रमुख पंथांमध्ये विभाजीत झाला. हे दोन पंथ म्हणजे दिगंबर आणि श्वेतांबर. आजतागायत हे पंथ आपले स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत. मूलतत्ववाद आणि सुधारणावाद यांच्यातील भेदावर हे पंथ उभे आहेत. ख्रिश्चन धर्मात ज्याप्रमाणे मार्टिन ल्यूथरच्या धर्मकांतीनंतर प्रोटेस्टेंट पंथ निर्माण झाला. त्यानंतर मूलतत्त्ववादी म्हणजे कथोलीक आणि सुधारणावादी म्हणजे प्रोटेस्टेंट असे भेद निश्चित झाले. तसेच जैन धर्मातील दिंगबर हा पंथ जैन तत्त्वज्ञानाच्या मूलतत्त्वांशी निगडीत आहे. दिंगबर आणि श्वेतांबर या दोन पंथात झालेल्या जैन धर्माच्या विभाजनाविषयी वेगवेगळया कथा व कारणं सांगितली जातात. महावीरांच्या पूर्वीपासून स्थविरकल्प व जिनकल्प या नावाचे दोन पंथ अस्तित्वात होते. स्थविरकल्प पंथाचे लोकवस्त्रे वापरीत असत आणि जिनकल्प पंथांतल्या एकाशाखेचे लोकवस्त्र धारण करीत नसत. महावीरांनी हया दोन्ही पंथांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. महावीरांच्या निर्वाणांनंतर चद्रंगुप्त मौर्याच्या कारकीर्दीत१२ वर्षांचा भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी जैन मुनी भद्रबाहू यांच्या नेतृत्वात सुमारे बाराहजार तरुण जैन साधू दक्षिण भारतात गेले. भद्रबाहू दक्षिणेत पोहचण्या पूर्वीच तेथे जैन धर्म अस्तित्वात होता. त्यांच्यासोबत दक्षिणेत आलेल्या वृद्ध साधूंना श्वेतवस्त्र धारण करण्यास परवानगी होती. यातून वस्त्र धारण करणारे श्वेतांबर आणि र्निवस्त्र दिंगबर अशी विभागणी झाली,असावी असे काही अभ्यासकांचे मत आहे. इसवीसनाच्या पहिल्या शतकात पाटलीपुत्र येथे जैन धर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भद्रबाहू दक्षिणेतील कर्नाटकात होते. मगध देशात राहिलेल्या स्थूलभद्राने या धर्मपरिषदेचे आयोजन केले. महावीरांनी आपल्या शिष्यांना केलेला उपदेश एकूण १४ ग्रंथांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. या ग्रंथांना पुव्व(पूर्व) असे संबोधले जाते. महावीरांनंतर बराच काळ पुव्व ग्रंथांमधील त्यांच्या उपदेश व ज्ञानाप्रमाणे जैन धर्म वाटचाल करत होता. स्थूलभद्रच्या धर्मपरिषदेत जैन तत्त्वज्ञान अकरा अंगांमध्ये विभागण्यात आले. तसेच १४ पुव्वांचे अवशिष्ट राहिलेले ज्ञानसंकलित करून बारावे अंग तयार केले. तसेच स्थूलभद्राचे अनुयायी श्वेत वस्त्रे वापरत होते. भद्रबाहूचे अनुयायी मगधला परतले तेंव्हा त्यांनी हे सर्व अमान्य केले. तसेच आपल्या अनुपस्थितीत तयार झालेल्या बारा अंगांना अमान्य ठरवले. मूळचे १४ पुव्व व अंगे नष्ट झाली अशी घोषणा करून हे ग्रंथ अप्रमाण ठरविले. हे भद्रबाहूचे अनुयायी दिंगबर म्हणून ओळखले जाऊ लागले,तर स्थूलभद्रचे अनुयायी श्वेतांबर झाले. हे एक कारण जैन धर्माचे दोन प्रवाह होण्यास सांगितले जाते. जैनांच्या ‘आवश्यक सूत्र’ नावाच्या ग्रंथात दिंगबर पंथाची एक उत्पत्ती कथा आलेली आहे. शिवभूती नावाच्या एका प्रधानपुत्राने जैन धर्माची दीक्षा घेतली. त्याला एका राजाने रत्नकंबल( भरजरी शाल) भेट दिली. त्या शालबद्दल शिवभूतीच्या मनात प्रचंड आसक्ती निर्माण झाली होती. हे त्याच्या गुरूच्या लक्षात आले. शिवभूती एके दिवशी बाहेर गेला असता,गुरूने त्या शालीचे तुकडे तुकडे करून सर्व शिष्यांत वाटून टाकले. शिवभूती परतल्यावर त्याला हा प्रकार समजला. त्याला अतिशय राग आला. तो दिंगबर म्हणजे निर्वस्त्र राहू लागला. अशा वर्तना संदर्भात गुरूने त्याच्यावर टीका केली. यावर माझ्या अंगी नग्न राहण्याचे सामर्थ्य आहे. तसेच असे राहण्यात काही दोष नाही. असे स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. त्यामुळे शिवभूतीपासून जिनकल्प हीखंडित झालेली, जैन परंपरा पुनरूज्जीवित झाली असे समजतात. महावीरांनी दिंगबर वृत्तीने तपश्चर्या केली व त्यासाठी नग्नत्व आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यामुळे दिंगबर पंथ उदयास आला असे म्हणतात. महावीरांपूर्वीचे २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ श्वेतवस्त्र धारण करीत असत. पार्श्वनाथ आणि महावीर यांच्या वस्त्रधारणा विषयक भेदामुळे श्वेतांबर व दिंगबर हे दोन प्रमुख संप्रदाय जैन धर्मात निर्माण झाले,असेही एक मत आहे. इसवीसनाच्या पहिल्या व दुस-या शतकातील काही शिलालेखांवरून श्वेतांबर व दिंगबर हे पंथ त्याकाळी अस्तित्वात होते, असे स्पष्ट दिसून येते. श्वेताम्बरामध्ये स्थानकवासीव, देरावासी असे दोन उपपंथ कालांतराने १७ व्या शतकात निर्माण झाले. स्थानकवासी मूर्तीची पूजा करतात,तर देरावासी करत नाहीत. देरावासी पंथातील ‘खरतरगच्छ’ शाखेचे साधू काळया रंगाचे भिक्षापात्र वापरतात तर ‘तपागच्छ’(तपोगच्छ) शाखेचे साधू लालरंगाचे भिक्षापात्र वापरतात. खरतरगच्छ व तपागच्छ या दोन्ही उपपंथांची आचार्य परंपरा व त्यांची वाङ्मयपरंपरा फार मोठी आहे. इसवीसनाच्या दहाव्या शताकात उद्योतन नवाचा एक श्रेष्ठ भट्टारक होऊन गेला. त्याच्या शिष्यांपासून ८४ ‘गच्छ’ म्हणजेच पंथ उत्पन्न झाले. निरनिराळया धर्मगुरूंच्या मतात भेद होत गेले व त्यामुळे भिन्न भिन्न गच्छ उदयास आले. काही गच्छ हे केवळ स्थान भेदामुळे निर्माण झाले. बंधमोक्ष विरक्त जैनसाधु नग्ना वस्थेत वनात राहत असत. यतींच्या आणि आर्जिंकांच्या गुंफा अलग-अलग असत. कांही मुनि वस्तीपासून थोडया अंतरावर राहून आपल्या आत्मज्ञानाचा लाभ श्रावक-श्राविकांना देत असत. त्यातूनच गच्छ म्हणजे विशेष दल पद्धतीचा उदय झाला. गच्छाच्या प्रमुख आर्चायाला ‘सूरि’ व शिष्याला ‘गणी’ असे संबोधतात. एका मुनीला गुरू मानणारे त्याचे श्रावक यांचा मिळून एक गच्छ मानला होतो. प्रत्येक गच्छाची परंपरा पुढे रूढ होते. अशा गच्छातील अथवा दलातील मोठया दलांना संघ म्हणतात आणि संघातील छोटया दलांना गण,गच्छ आणि शाखा अशा संज्ञा आहेत. पूर्वी आत्मोद्धाराच्या मार्गासंबंधी त्यांच्यात मतभेद होत, तेंव्हा वादसभा होत असत. काही गणांनी आणि गच्छांनी आपली स्वतंत्र जैन मंदिर उभी केली आणि तरूणांना धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली. अशा शिक्षण केंद्रांना गुरूकुल किंवा पाठशाळा असे नावं होते. प्रत्येक दलाचे निरनिराळे मुनी असत. काही गच्छांचा एकसंघ असे. त्यात निरनिराळया मुनींचा समावेश असे. गच्छाधिपतींना श्रेष्ठ मान दिला जाई. त्यांत श्रावकांवर व मुनींवर धार्मिक संस्कार सतत केले जात. धर्ममताविरूद्ध आचरण करणा-या श्रावकालाच नव्हे तर कित्येकदा मुनीला सुद्धा संघातून काढून टाकले जाई. आज सुद्धा संघातून कांही जैन संघात हा नियम पाळला जातो. गच्छाधिपती जर संघाला मान्य असलेल्या परंपरांच्या विरूद्ध वागले तर त्यांना ही संघाबाहेर काढले जात असे. संघांत मतभेद होऊन दोन भाग पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. आंध्रप्रदेशांत प्रचलित असलेला ‘याप्य संघ’ असाच सुधारणावादी आहे. या संघाने धार्मिक पुस्तकांतील सत्यांवर विश्वास व स्त्रियांनीही मोक्ष मार्गावरील प्रयत्नांची मुक्त सवलत दिली आहे. श्वेतांबर पंथात पुजेरा(मूर्तिपूजक,डेरावासी किंवा मंदिरमार्गी) साधुमार्गी,स्थानकवासी,तेरापंथी यासारखे उपपंथ आहेत. श्वेतांबरांचा एक उपपंथ ढुंढिया (बिसतोला,स्थानिकवासी किंवा साधुमार्गी) नावाचा आहे. मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात केंद्र असलेला हा पंथ वैशिष्टपूर्ण असा आहे. ढुंढिया पंथाचे साधु स्थानक नामक मठात राहतात. त्यामुळे त्यांना ‘मठमार्गी’ असेही संबोधले जाते. मूर्तिपूजेला या पंथात स्थान नसल्याने मंदिरांची आवश्यकता देखील नाही. मनोविकारांच दमन व तीर्थंकरांच्या पवित्र आचरणाचे अनुसरण हा ढुंढियांचा आचारधर्म आहे. तीर्थंकरांची देखील पूजाआर्चा या पंथात केली जात नाही. पांढरे पण मलिन वस्त्र परिधान करणारे साधुही या पंथाची विशेष ओळख सांगता येते. स्त्रियांनाही दीक्षा घेण्याची आणि धर्मग्रंथाचा अभ्यास करण्याची मुभा या पंथात देण्यात आली आहे. त्यांनी देखील श्वेत मलिन वस्त्रे वापरावीत असा दंडक आहे. श्वासोच्छावासांनी जीवजंतू हत्या होऊ नये, यासाठी नाकातोंडावर कापडाची पट्टी बांधली जाते. चालतांना पायाखाली जीव हत्या होऊ नये म्हणून रस्ता झाडण्यासाठी सुतांची चवरी किंवा कुंचला बरोबर ठेवला जातो. या कुंचल्याला रजोहरण,कुटासना किंवा ओगा अशी नावे आहेत. दीक्षा घेतल्यानंतर सतत केशमुंडण करावे लागेत. यावेळी देखील हिंसा होऊ नये म्हणून केशलुंचन केले जाते,म्हणजे हाताने केस उपटतात. तसेच दीक्षा घेतल्यानंतर आजीवन स्नान करू नये,असा ही दंडक सांगितला जातो. दिंगबर पंथात विसपंथी,तेरापंथी,तरणपंथी(समयपंथी),गुमानपंथी आणि तोतापंथी असे पाच भेद आहेत. जैन धर्माच्या अतिप्राचीनत्वामुळे दिंगबर व श्वेतांबर अशा प्रमुख पंथांसोबत अनेक उपपंथ कालौघात निर्माण होणे स्वाभाविकच होते. दिंगबर व श्वेतांबर यांच्यातील भेद देखील जैन धर्माची वाटचाल पाहण्यासाठी उपयुक्त ठरतात. धार्मिक ग्रंथांच्या मान्यतेपासून ते आचरण पद्धतीपर्यंत हया भेदांची व्याप्ती पसरलेली आहे. जैन धर्माचे स्वरूप समजण्यासाठी दिंगबर-श्वेतांबर पंथांमधील हे भेद नेमकपणाने समजून घेणे आवश्यक ठरते.
डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी – ८३०८१५५०८६
Comments
Post a Comment