सुखाच्या शोधात नव्या जगाकडे..


युरोपातील लोकांना त्यांच्या साहसी वृत्तीने पृथ्वीवरील एका प्रचंड मोठया खंडाचा शोध लागतो. हया खंडाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन निसर्गानेच केलेले असते. निसर्गनिर्मित हया दोन्ही भागांना एकत्रितपणे अमेरिका खंड असे संबोधले जाते. यानंतर उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका अशी विभागणी होते. दक्षिण अमेरिकेत अनेक छोटे-छोटे देश जन्माला येतात. उत्तर अमेरिकेत मात्र क्षेत्रफळाने मोठे असे मोजकेच देश निर्माण होतात. उत्तर अमेरिकेतील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश आज जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने या नावाने ओळखला जातो. अमेरिका  या खंडातील इतर देशांनाही व्यापून टाकतो. एक राष्ट्र ते महासत्ता म्हणून अमेरिकेची निर्मिती व विकास यांचा इतिहास अत्यंत सुस्पष्ट आहे. ईनमिन ४५० वर्षांचा इतिहास असणारा हा देश. जगातील एकमेव महासत्ता म्हणून दिमाखाने मिरवतो. हजारो वर्षांचा इतिहास सांगणारे देश त्याच्या खिजगणतीत देखील राहत नाही. रशिया त्याच्याशी टक्कर देण्याचा साम्यवादी प्रयत्न करतो आणि स्वतःची शकलं करून घेतो. जगातील दुसरा साम्यवादी देश चीन आज त्याच्या विश्वव्यापी प्रभूत्वाला आव्हान देतोय. त्याचे ही भविष्य येणारा काळच निश्चित करेल. अशा अमेरिकेचा हा देदीप्यमान प्रवास पहातांना,तो निर्माण करण्या-या प्रारंभीच्या लोकांचा इतिहास पाहणे महत्वाचे ठरते. त्यांच्या वेगळेपणातच अमेरिकेचे वेगळेपण दडलेले दिसते. अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर युरोपिअन लोकांनी त्याला नवे जग(New World) म्हणून संबोधले. नव्या जगातील अमेरिका देश वसण्यास प्रामुख्याने इंग्रजांच्या वसाहतींनी प्रारंभ झाला. युरोपातील इतर देशांच्या काही वसाहती या भूमीवर वसल्या होत्या,मात्र त्यांची संख्या नगण्यच म्हणावी लागेल. सन १६०० ते १७०० च्या शतकात युरोपातील सुमारे ७५००० लोक नव्या जीवनाच्या आशा उराशी बाळगून या नव्या जगात आले. स्वतः निर्माण केलेल्या एका नवीन जीवनशैलीचे जीवन जगण्याच्या लालसेतून त्यांनी आपल्या मातृभूमीचा त्याग केला. नव्या जगामध्ये एका नव्या देशाला हे लोक जन्म देणार होते. आपल्या कल्पनेनुसार, आवडीनुसार व सोयीनुसार त्याला आकार देणार होते. जुनाट-कालबाहय रुढी,परंपरेने लादलेली जीवनशैली,शेकडो वर्षांपासून एका पिढीकडून  दुस-या पिढीकडे अंधपणे हस्तांतरीत होत आलेली जीवनदृष्टी-जीवनमूल्यं,तूंबलेली-सडलेली-किडलेली सामाजिक चौकट,धार्मिक-आर्थिक शोषण इत्यादींपासून कायमची मुक्ती देणारे स्थान म्हणून त्यांना नव्या  जगाची रचना करायची होती. अशा नव्या जगाचे विश्वकर्मा म्हणून त्यांनी या भूमीवर पाय ठेवला. सर्वात महत्वाचे म्हणजे हे लोक धनदांडगे किंवा कफल्लक किंवा सर्वहारा शेतकरी अशा सर्व स्तरातील होते. सर्वसाधारणपणे जहाजाचे भाडे स्वतः भरू शकणारे आणि येथे पोहचल्यावर जगण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उभी करण्याची आर्थिक क्षमता असणाऱ्या लोकांची संख्या जवळपास दोन तृतीयांश होती. तसेच कंत्राटी मजूर म्हणून आलेले लोकही काही प्रमाणात होते. कंत्राटी मजूर म्हणजे वेठबिगार अथवा गुलाम नव्हते. तर मालकाशी केलेला करार संपुष्टात आल्यानंतर एक स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार अबाधित होता. आपल्या मातृभूमीचा त्याग आणि अत्यंत जोखमीची समुद्रयात्रा करून या लोकांनी नव्या जगाकडे कायमचे स्थलांतर केले. त्यांच्या अशा स्थलांतराची प्रमुख चार कारणं युरोपच्या तत्कालीन परिस्थितीत दडलेली होती. मध्ययुगीन युरोप राजकीयदृष्टया अत्यंत अस्थिर झालेला होता. सतत होणारी युद्ध आणि त्यात होत असलेला रक्तपात-मनुष्यहानी याचा आलेला उबग,हे पहिले कारण सांगता येते. सतत युद्ध करायचे,तर लढण्यासाठी म्हणजेच मरण्यासाठी सैन्याची गरज सत्ताधा-यांना व श्रीमंतांना कायमच असते. सैनिक म्हणून मरण्यासाठी दरिद्री लोकांना पकडून सरदार-उमराव यांना विकण्याचा व्यापार याकाळात युरोपातील एक सहज प्रथा म्हणून गणली जात असे. युरोपात अशा निर्धन लोकांचे मरण निश्चितच होते. त्यांच्या मरणावर देखील त्यांची मालकी अमान्य होती. हे स्थलांतराचे दुसरे कारण होते. युरोपातील बेमौत मरणापेक्षा आयुष्याचा जुगार खेळून नव्या जगात पोहचण्यात यशस्वी झालो,तर माणूस म्हणून जगण्याची नवी संधी उपलब्ध होऊ शकेल. परिश्रम व प्रामाणिकता यांच्या बळावर काही उद्योग-धंदा करता येईल. आपल्या मुला-बाळांसाठी एका चांगल्या जीवनाची व्यवस्था होऊ शकेल. या तिस-या कारणामुळे अशा लोकांनी युरोपाचा त्याग केला. तसेच धर्म हे स्थलांतराचे चौथे कारण ठरले. संपूर्ण युरोप पोप व चर्च(धर्मसंघ) यांच्या आधिन झालेला होता. एखादी राजसत्ता जेवढे शोषण माणसाचे करू शकत नाही,तेवढे शोषण धर्मसत्ता करू शकते. जगाच्या  इतिहासात व वर्तमानात धर्मसत्तेच्या शोषणाचे अनेक दाखले देता येतात. मध्ययुगीन कालखंडातील युरोप हा त्यातीलच एक अध्याय. धर्माकिंत युरोपातील  धार्मिक व सांप्रदायिक अत्याचारांपासून अनेकांना मुक्ती हवी होती. त्यांना ईश्वराची भक्ती अमान्य नव्हती. उलट मनोभावे भक्ती करायची होती. परंतु त्यासाठी त्यांना धर्माचा कोंडवाडा नाकारून मोकळा श्वास घ्यायचा होता. तसेच दमनकारी सरकारी यंत्रणेच्या जोखडातूनही सुटका हवी होती. युरोपातून नव्या जगाकडे स्थलांतर करणारे हे पहिले लोक आणि आजही जगाच्या कानाकोप-यातून अमेरिकेला जाण्याचा ध्यास घेणारे लोक यांचा अभ्यास केला असता. एक गोष्ट लक्षात येते की,अमेरिकेच्या भूमीवर जाण्याच्या कारणांमध्ये फारसा बदल झालेला नाही. स्वातंत्र्य,समता आणि संधी यांच्या धाग्याने हे नवे जग विणले गेलेले आहे. वर्तमानकाळात हे धागे उसवून जनमत स्वतःच्या बाजूने वळवून सत्ता संपादन केलेल्या राजकीय नेतृत्वाची किंमत अमेरिकेला चूकवावी लागत आहे. हे आपण अनुभवतोय. आपल्या नव्या जगाच्या पायात भावना नसून रोकडा व्यवहार आहे. याचा विसर गेल्या अध्यक्षीय निवडणूकीत अमेरिकेला पडला. त्याचे दुरगामी परिणाम येणारा काळ ठरवेल. अमेरिकेच्या बाबतीत एक गोष्ट विशेषतः जाणवते १६०० व्या शतकापासून या नव्या जगाकडे स्थलातंर केलेल्या वसाहतवादी कोणत्या ना कोणत्या धर्माचे किंवा पंथाचे अनुयायी होते. वसाहतवादयांपैकी अधिकांश लोक ख्रिश्चन होते. असे असले तरी मार्टिन ल्यूथर प्रणित धर्मक्रांती पश्चात ख्रिश्चन धर्म अनेक पंथामध्ये विभाजीत झालेला होता. पोपच्या धर्मसत्तेला मानणारा रुढीवादी कॅथोलीक आणि पोपला आव्हान देत त्याची जीवनव्यापी धर्मसत्ता नाकारणारे सुधारणावादी प्रोटेस्टेंट. असे दोन प्रमुख प्रवाह ख्रिश्चन धर्मात अस्तित्वात आले, असले तरी युरोपातील विविध देशांनी स्वतःचे चर्च (धर्मसंघ) स्थापन केलेले होते. नव्या जगाच्या रचनेत सर्वाधीक योगदान असलेल्या इंग्लंडचा विचार केल्यास असे लक्षात येते की,राजसत्तेच्या प्रोत्साहनाने तिथे ऐंग्लिकन चर्चची स्थापना करण्यात आली. मार्टिन ल्यूथरच्या धर्मक्रांतीला  आतून पाठबळ देऊन हेन्री सातवा व एलिझाबेथ प्रथम या राज्यकर्त्यांनी पोपची सत्ता झुगारली आणि स्वतःच्या अंकित ऐंग्लिकन चर्चची निर्मिती केली. इंग्लंडमध्ये सुधारणावादी ऐंग्लिकन चर्चचे विरोधकही होते. हे विरोधक सनातनी व जहाल असे ख्रिश्चन होते. त्यांनी स्वतःचा उग्र पंथ निर्माण केला. त्याला प्युरिटन असे संबोधण्यात आले. ऐंग्लिकन व प्युरिटन या दोन्ही संप्रदायांना न मानणारे काही लोक होते. ते या दोन्ही पंथांच्या बाबत असंतुष्ट होते. त्यांनी आपले विविध पंथ निर्माण केले होते. त्यामध्ये क्वॅकर्स(Quakers),प्रेस्बीटेरियन(Presbyterian), बॅप्टिस्ट(Baptist), आणि ल्यूथर संप्रदायी (Lutherion) यांचा समावेश होतो. अशा समस्त समुदायांचे व संप्रदायांचे अनुयायी नव्या जगाच्या भूमीवर पोहचले. त्यांच्यात धार्मिक विचार व आचारण पद्धतीत अनेकता होती. मात्र मायदेशात प्रचलित धर्मसंस्थेविषयी असंतोष हा त्यांच्यातील समान धागा होता. त्यामुळे नव्या जगात स्थापन झालेल्या प्रत्येक वसाहतीच्या पार्श्वभूमीत युरोपातील धार्मिक असंतोषाचा अंश होता. नव्या जगात आल्यानंतर केवळ धर्माच्या भरोशावर पोट भरता येत नाही. याची कल्पना वसाहतवादयांना आली. तसेच पैसा नसेल तर धर्म ही टिकू शकत नाही आणि त्याचा प्रसार देखील होऊ शकत नाही. हे वास्तव उमगले. यामुळेच नव्या जगात माणसाच्या कर्तबगारीला प्राधान्य प्राप्त झाले. धर्म किंवा संप्रदाय हे दुय्यम ठरले. अशाप्रकारे भविष्यातील जागतिक महासत्ता म्हणून नव्या जगाची वाटचाल मानवी कर्तृत्वाला प्रमाण मानून झाली. माणसाच्या कर्तबगारीवर सुखाचा शोध सुरू झाला. आजही या नव्या जगात सुखाचा शोध अखंड सुरू आहे. तसेच सुखाच्या शोधासाठी त्याच्याकडे धाव घेणा-यांचे आकर्षण ही कायम आहे.





   

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !