निर्माण,नियोजन आणि निर्वाण..
अहिंसा,आत्मजय,व्रत,विनय,शील,मैत्री,समभाव व समाधान अशा अष्ट तत्त्वांचा प्रचार-प्रसार करण्याचा दिशेने भगवान महावीरांनी मार्गक्रमण आरंभले. तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा काळ महावीरांच्या पूर्वी सुमारे दीडशे वर्षे मानला जातो. काशीचा राजा अश्वसेन यांचे पुत्र असलेले क्षत्रियकुमार पार्श्वनाथ यांनी महावीरांआधी जैन मताच्या पेरणीसाठी आवश्यक मशागत करून ठेवली होती. पार्श्वनाथांनी मांडलेला सिद्धांत 'चातुर्याम मत' म्हणून प्रसिद्ध आहे. 'याम' हा योगशास्त्रातील शब्द आहे. योगशास्त्रात यामलाच महाव्रते असेही संबोधले जाते. यामध्ये अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रहमचर्य,अपरिग्रह हे पाच याम किंवा महाव्रते आहेत. पार्श्वनाथांनी ब्रहमचर्याचा समावेश अपरिग्रहामध्ये केला होता. जैन परंपरेत चार यामच मानण्यात आले. यामुळेच पार्श्वनाथांचे मत 'चातुर्याम मत' म्हणून मानण्यात येते. महावीरांपूर्वी स्थविरकल्प व जिनकल्प या नावाचे दोन जैन पंथ अस्तित्वात होते. पार्श्वनाथांच्या सत्तर वर्षाच्या जीवनकार्यात त्यांनी जैन धर्माची पायाभरणी करून ठेवलेली होती. प्राग्वैदिक काळापासून चालत आलेल्या क्षत्रियप्रणित अवैदिक व अनार्य तत्त्वज्ञानाचा काळाच्या ओघात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अस्तित्व दर्शवणारा हा प्रवाह होता. पार्श्वनाथांपासून तो पुन्हा आपले अस्तित्व दर्शवू लागला. अशा भक्कम पायावर महावीरांनी जैन धर्माची भव्य वास्तू उभारली, असे म्हणणे वावगे ठरत नाही. मध्यमपावा धर्मपरिषदेत अकरा वैदिक पंडितांना आणि त्यांच्या साडे चार हजार शिष्यांना आपले अनुयायी करण्यात महावीर यशस्वी झाले. त्यांचे हे यश श्रमण परंपरेला विरोध करणा-या वैदिक परंपेरला एक प्रकारे शहच होता. त्यांच्या यशाने जैन धर्म स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला. राजकुमारी चंदनबालासमवेत अनेक स्त्रियांनी महावीरांचा उपदेश ग्रहण केला आणि त्यांचे शिष्यत्व पत्कारले. त्यातील अनेक स्त्रियांनी श्रमण धर्माचा स्वीकार केला. तर इतर स्त्रियांनी गृहस्थ जीवन स्वीकारले. मध्यमपावाच्या धर्मपरिषदेतच महावीरांनी धर्मसंघाची स्थापना केली. जैन धर्म स्वीकारलेल्या अनुयायांची विभागणी चार वर्गात करण्यात आली. त्यानुसार श्रमण जीवनाच्या कठोर व्रतांचे(पंच महाव्रतांचे) ग्रहण करणा-या स्त्री-पुरुषांना श्रमण आणि श्रमणी संबोधण्यात आले. ज्यांना गृहस्थ जीवनाचा त्याग न करता,जैन धर्म स्वीकारायचा होता. त्यांना गृहस्थ जीवनात राहून धर्मतत्त्वांचे पालन करण्याची मुभा ठेवण्यात आली. अशा अनुयायांना श्रमणोपासक व श्रमणोपासिका (श्रावक-श्राविका) यांच्या रुपात धर्मसंघात समाविष्ट करण्यात आले. महावीरांच्या ठायी असणा-या नियोजन कौशल्याची जाणीव येथे होते. गणतंत्रात्मक वातावरणात बालपण व्यतीत झालेल्या महावीरांचा आणि बुद्धांचा कायमच सामंतशाही व साम्राज्य संकल्पनांना विरोध होता. संघीय राज्यव्यवस्थेचे संस्कार त्यांच्या रक्तातच भिनले होते. अहिंसा व समता यासाठी गणतंत्रात्मक पद्धतीच उपयुक्त होती. यामुळेच महावीरांनी आपल्या अनुयायांच्या समुदायाला धर्मतीर्थ अथवा धर्मसंघ अशी संज्ञा दिली. त्यानुसारच श्रमण,श्रमणी,श्रावक,श्राविका अशी धर्मसंघाची रचना झाली. सत्तेचे विेकेंद्रिकरण हे महावीरांच एक आणखी वैशिष्टय सांगता येते. गणतंत्रात्मक पद्धतीवर आधारीत धर्मसंघ स्थापन करुन महावीर थांबले नाही,तर त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा स्वीकारणा-या शिष्यांना शिक्षण देण्याचे अधिकार सुयोग्य व्यक्तींकडे सोपवले. तसेच धर्मसंघाची सूत्रे देखील स्वतःच्या नियंत्रणात ठेवली नाहीत. संपूर्ण लोकशाही हे महावीरांचे सूत्र सांगता येते. 'गणधर' हे पद निर्माण करण्यात आले. श्रमणसंघाची शिक्षा-दीक्षा,व्यवस्था व अनुशासन यांची जबाबदारी गणधरांवर सोपविण्यात आली. धर्मसंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे गणधर. इंद्रभूती आदी अकरा सुयोग्य व विद्वान श्रमणांना गणधर म्हणून नेमण्यात आले. त्यांचे नऊ गण तयार झाले. त्यांच्या अधीन संपूर्ण श्रमण-समुदायाचे अनुशासन करण्यात येत असे. राजकुमार चंदनबाला ही श्रमणी संघाची प्रथम गणधर म्हणावी लागेल. वयाने लहान असलेल्या मात्र जीवनातील संघर्षाने व चढ-उतारांनी अनुभवांनी परिपक्व झालेल्या चंदनबालेने हे कर्तव्य अत्यंत समर्थपणे पार पाडले. धर्मसंघात पूर्वजीवनातील जात,पद,प्रतिष्ठा,संपत्ती,वय इत्यादी गोष्टींना गौण स्थान होते. व्यक्तीच्या साधाना जीवनास प्राधान्य देण्यात येत असे. म्हणजेच चातुर्वर्णातील उच्च-नीच,स्पृश्य-अस्पृश्य आणि स्त्री-पुरुष असा कोणताच भेद धर्मसंघात मान्य नव्हता. संचलनात सुसूत्रता येण्यासाठी धर्मसंघाची रचना व्यवस्थीतपणे करण्यात आली असली,तरी आत्मानुशासनास सर्वाधिक महत्व होते. धर्मसंघाचे किंवा श्रमण जीवनाचे पालन करतांना कोणी कोणावर दबाव टाकणे अथवा ज्येष्ठतेचा गैरवापर करणे याला थारा नव्हता. श्रमण असत्य वर्तन कदापि करत नसत. एखाद्या श्रमणाकडून काही प्रमाद अथवा चूक घडल्यास त्याने स्वतः गुरूकडे जाऊन प्रायश्चित्य घेणे महत्वाचे होते. याचाच अर्थ धर्मसंघात आत्मानुशासन व अंतःप्रेरणा यांना अनन्यसाधारण महत्व होते. महावीरांच्या धर्मसंघात सर्वात मुख्य गोष्ट होती,ती म्हणजे विनय,सरलतेने,समानतेने व पूर्वसंस्कारांच्या स्मृतीपासून मुक्त होऊन प्रत्येक श्रमण गुरूच्या आज्ञेत व अनुशासनात चालत असे आणि स्वेच्छेने आपल्या नियमांचे पालन करीत असे. धर्मसंघात साधना महत्वाची होती. साधनेच्या दृष्टीने साधकांच तीन प्रकार करण्यात आले होते. त्यानुसार पहिला प्रकार म्हणजे प्रत्येकबुद्ध हे साधक प्रारंभापासूनच संघीय मर्यादेतून मुक्त होऊन साधना करीत असत. दुसरे स्थविरकल्पी साधक हे संघीय मर्यादा व अनुशासन यात राहून साधना करीत असत. तिसरे जिनकल्पी साधक होते,हे विशिष्ट साधनापद्धती घेऊन व संघीय मर्यादेतून मुक्त होऊन तपाचरण आदि करीत असत. प्रत्येकबुद्ध आणि जिनकल्पी हे स्वतंत्र विहार करत. त्यामुळे त्यांच्यासाठी कोठल्याही अनुशासनाची अपेक्षा नसे. स्थविरकल्पी हे संघात राहून एका पद्धतीने व एका व्यवस्थेने जीवन व्यतीत करीत असत. त्यांच्यासाठी संघात सात निरनिराळी पदे निर्माण करण्यात आली होती. ती म्हणजे आचार्य(आचाराचा विधी शिकविणारे),उपाध्याय(श्रुताचा अभ्यास करवून घेणारे),स्थविर(वय,दीक्षा व श्रुत यामध्ये अधिक अनुभवी),प्रवर्तक(आज्ञा व अनुशासन याबद्दल प्रवृत्ती निर्माण करणारे),गणी(गणाच्या व्यवस्थेचे संचालन करणारे),गणधर(गणाचे संपूर्ण उत्तरदायित्व असणारे) आणि गणवच्छेदक(संघाच्या संग्रह-निग्रहादी व्यवस्थेचे विशेषज्ञ) हे सर्व पदाधिकारी संघीय जीवनातील अध्ययन,साधना,आचार-मर्यादा,सेवा,धर्म,प्रचार,विहार इत्यादी विभिन्न बाबींकडे लक्ष देत. महावीरांची ही गणतंत्रावर आधारित धर्मसंघ व्यवस्था ऐतिहासिक दृष्टया महत्वाची आहे. वैदिक परंपरेतील हजारो तपस्वी व संन्यासी त्याकाळी होते. पण त्यांच्यापैकी एखाद्याने विधिवत संघाची स्थापना केली असा उल्लेख सापडत नाही. असे अभ्यासकांचे मत आहे. तसेच भगवान पार्श्वनाथ यांना देखील हे शक्य झाले नव्हते. महावीरांनी मात्र विखुरलेल्या श्रमण परंपरेला धर्मसंघाच्या एकाछत्राखाली आणले. श्रमण तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांना धर्मसंघाच्या माध्यमातून संस्थागत धर्माचे स्वरुप दिले. यामुळेच जैन धर्म हा भारतातील पहिला संस्थागत धर्म ठरतो. भारतीय उपखंडातील पहिले संस्थागत धर्मसंस्थापक म्हणजे भगवान महावीर. धर्म निर्माण आणि नियोजन यांचे अतिशय उत्तम उदाहरण महावीरांनी जगासमोर सादर केले. संस्थागत धर्म स्थापन करणारे महावीर सहजप्रज्ञेचे पुरस्कर्ते होते,परंपरेचे नव्हे. सत्याचा निर्णय हा कोणत्याही शास्त्राच्या अथवा परंपरेच्या आधारावर न करता आपल्या आत्म्याला साक्षी ठेवून करावा असा संदेश ते देत असत. एकांगी विचार आणि आग्रह यांना त्याच्या उपदेशात थारा नव्हता. सत्याच्या नावाखाली परंपरेला नकार आणि असत्यासाठी परंपरेचा वापर अशा दोन्ही प्रवृत्तींना त्यांचा विरोध होता. त्यांच्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पार्श्वनाथांच्या पार्श्वपंथी किंवा निर्गंथ परंपरेला त्यांनी विरोध केला नाही किंवा या पंथातील श्रमणांना धर्मसंघात समाविष्ट होण्याचा आग्रह देखील केला नाही. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना धर्मसंघात सामील होण्यासाठी अनुकुल केले. यामुळे कोणताही संघर्ष न होता पार्श्वपंथी श्रमणपरंपरा महावीरांच्या धर्मसंघात विलिन होत गेली. पार्श्वपंथाचे हे सामिलकरण महावीरांच्या समन्वयशीलतेचे एक ऐतिहासिक उदाहरण म्हणून सांगता येते. महावीरांचे माता-पिता,मामा चेटक हे सर्वच पार्श्वपंथी होते. महावीरांवर पार्श्वपंथाचे संस्कार बालपणापासूनच होते. असे असले तरी महावीर स्वयंप्रज्ञ होते. त्यांना साधना पथावर गुरूंची आवश्यकता लागली नाही. परंतु महावीर आणि पार्श्वनाथ यांचा मार्ग एकच होता. त्यांचे ध्येय ही एक होते. पार्श्वनाथांनी ज्या धर्मक्रांतीचा उद्घोष केला,तेच महावीरांचेही लक्ष होते. त्यामुळे दोघांचे साध्य-साधनं समान होती. तीर्थंकर झालेल्या महावीरांनी जीवनाचा उत्तरार्ध जनसामान्यांना भवसागर पार करण्यात व्यतीत केला. त्यांच्या आदर्श जीवनाच्या व उपदेशाच्या अनेक कथा जैन वाङ्मयात आहेत. विस्तारभयास्तव त्यांचा उल्लेख याठिकाणी करता येत नसला, तरी महावीरांचे जीवन कोणालाही अभ्यासणीय व अनुकरणीय असे आहे. धर्मसंघाची स्थापना हे आज वाटते तेवढे सुलभ नव्हते. महावीरांना अनेक आंतर-बाहय विरोधाचा सामना करावा लागला. असे असले तरी केवलज्ञानी महावीर समाजविन्मुख झाले नाही. अज्ञान व अंधःकार यांच्या विनाशासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा व उपदेशाचा नंदादीप अखंड तेवत ठेवला. अखेर वयाच्या ७२ व्या वर्षी श्रावस्तीमध्ये ख्रिस्तपूर्व ५५६ च्या कार्तिकी अमावस्येला भगवान महावीरांचे निर्वाण झाले. हा ज्ञानसूर्य देहरूपाने अस्ताला गेला असला, तरी त्याचा प्रकाश चिरंतन राहणार होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment