ते २० काळे लोक...


१६१७ साली इंग्लंडच्या किना-यावर व्हर्जिनियाची तंबाखूने भरलेले जहाज येऊन धडकले. जॉन राल्फच्या अथक प्रयोगशिलता  व परिश्रम यांनी निर्माण झालेली ही तंबाखू. व्हर्जिनिया कंपनीने स्थानिक आदिवासी जमातींनी पिकवलेली तंबाखू याआधी इंग्लंड व युरोपच्या बाजारात विकण्याच्या  केलेल्या असफल प्रयत्नांची किनार या घटनेला होती.यामुळे जॉनच्या तंबाखूचे स्वागत इंग्लंडमध्ये कसे होईल ? याविषयी साशंकता असणे स्वाभाविकच होते. स्पेनचे बियाणं जरी जॉनच्या हाती लागले होते,तरी स्पॅनिश व स्वीडीश तंबाखूसारखी ही तंबाखू ब्रिटिशांना आवडेल याची खात्री जॉनसह कोणालाच नव्हती. यावेळी मात्र व्हर्जिनिया कंपनीचं नशीब फळफळले. जॉन राल्फची  तंबाखू ब्रिटिशांना प्रचंड आवडली. जॉनच्या तंबाखूच्या एका जहाजाने नवजात अमेरिकेच्या निर्यात व्यापाराचा श्रीगणेशा केला. अमेरिकेचा निर्यात व्यापार तंबाखूच्या माध्यमातून आकाराला येऊ लागला. व्हर्जिनियाच्या तंबाखूने ब्रिटनलाच नव्हे तर अखंड युरोपाला वेड लावण्यास सुरवात केली. १६१७ साली जॉनच्या एका जहाजाने सुरवात झालेला हा निर्यात व्यापार १६२० पर्यंत दरवर्षी पन्नास हजार पौंड तंबाखूची इंग्लंडला निर्यात करण्यापर्यंत गेला. १६३० पर्यंत ही निर्यात तीन लाख पौंडापर्यंत पोहचली. १६४० साल उजाडेपर्यंत व्हर्जिनियामधील तंबाखूची निर्यात तीस लाख पौंडच्या वर गेली. युरोपात जॉन राल्फची  प्रयोगशीलता, कल्पकता व साहस यामुळे तंबाखू व्यापार युद्धाला सुरवात झाली. स्पॅनिश व स्वीडीश तंबाखूची मक्तेदारी व्हर्जिनियाच्या तंबाखूने केवळ मोडीतच काढली नाही,तर ती जगातील सर्वोच्च दर्जाची तंबाखू ठरली. आजही या तंबाखूने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. १६१७ साली सुरू झालेले हे तंबाखूचे उत्पादन व निर्यात सुमारे १५० वर्षे अव्याहत सुरू होती. काळ बदलला मात्र युरोपाच्या व जगाच्या तंबाखू शौकिनांच्या तलफ भागवणा-या व्हर्जिनियाच्या तंबाखूचा कैफ  बदलला नाही. व्हर्जिनियाची तंबाखू आजही 'उंचे लोगों की, उंची पसंद' म्हणून व्यसनाच्या दुनियेत दिमाखाने मिरवतेय. चारशे वर्षे सरली तरी तिच्या अंमलाची नशा तंबाखूच्या बाजारात आपली स्वतंत्र,श्रेष्ठ ओळख व बेजोड आघाडी टिकवून आहे. व्हर्जिनियाच्या तंबाखूची ही यशोगाथा पाहतांना,मानवी अस्तित्वासाठी अनन्यसाधारण महत्व ठेवणा-या अन्न-धान्याची निर्मिती करणारा बळीराजा डोळयासमोर उभा ठाकतो. हजारो वर्ष आणि लाखो पिढयांची आहूती देऊनही अन्न-धान्याची निर्मिती करणारा कोणत्याही देशातील शेतकरी व्हर्जिनियाच्या शेतक-यांप्रमाणे अत्यंत अल्प काळात संपन्न होऊ शकलेला नाही. तंबाखूचे उत्पादन करणा-याला शेतकरी, आयात-निर्यात करणा-याला व्यापारी आणि तंबाखूपासून व्यसनाचे विविध प्रकार निर्माण करणा-याला उद्योजक म्हणावे का ? असा एक सहज प्रश्न मनात अस्वस्थता निर्माण करतो. एक मात्र खरे की तंबाखूऐवजी जीवनोपयोगी शेतमालाच्या उत्पादनाने  अमेरिकेसारखा नवजात देश कधीच भरभराटीला येऊ शकला नसता. अत्यंत अल्पावधीत तंबाखूच्या शेतीतून संपन्नता व समृद्धी संपादित करून देणारा जॉन राल्फ एका अर्थान अमेरिकेचा पहिला भाग्यविधाता ठरतो. यासाठीच आजही अमेरिकेत त्याचा सन्मान कायम असलेला दिसतो. पूर्व व्हर्जिनियामधील जेम्स टाऊन व परिसर ही जॉनची कर्मभूमी. त्याच्या सन्मानार्थ जेम्स टाऊन व विल्यम्सबर्ग या शहरांना जोडणारा महामार्ग क्र.३१ हा आज जॉन राल्फ महामार्ग म्हणून ओळखला जातो. १५८५ ला जन्म आणि १६२२ ला मृत्यू पावलेल्या जॉनला अवघे ३८ वर्षांचे आयुष्य मिळाले. एवढया अल्पायुष्यात या द्रष्टया इसमाने अमेरिकेच्या इतिहासाचा प्रर्वतक होण्याचा मान मिळवला. तंबाखूच्या उत्पादनातून व निर्यातीतून अमेरिकेच्या पायाभरणीची दमदार सुरवात करणा-या जॉनने स्पॅनिश तंबाखूचे बियाणं कसे प्राप्त केले ? हे जसे आजही गूढ सांगितले जाते. तसेच त्याचा मृत्यूचे कारण देखील गूढतेच्या धूक्यात गुरफटलेले आहे. त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला की स्थानिक जमातीविरुद्ध लढतांना त्याला वीरमरण आलं याबद्दल आजवर इतिहासकारांचे एकमत होऊ शकलेले नाही. जॉनच्या तंबाखूसारख्या नगदी पिकाच्या शेतीतून आणखी एक गोष्ट जन्माला आली. ती म्हणजे मानवी समाजाच्या  अमिट कलंकांपैकी एक नीग्रो गुलामगीरी. अमेरिकेतील तंबाखू उत्पादन,प्रकिया व निर्यात यांचा जनक  असलेल्या जॉन राल्फकडे अमेरिकेतील नीग्रो गुलामगीरीचे जनकत्व देखील जाते. तंबाखू निर्यातीतून आर्थिक समृद्धी प्राप्त होऊ लागल्यानंतर जेम्स टाँऊन व व्हर्जिनिया परिसरातील ब्रिटिशांच्या  मूळ स्वभावाचे पुनरूज्जीवन होणे स्वाभाविकच होते. भांडवलशाहीतून निर्माण झालेली आर्थिक समृद्धी ही माणसांच्या शोषणावरच पोसलेली असते. भांडवलशाही जसजशी बळकट होत जाते,तसतशी शोषण यंत्रणा अमानवी,पाशवी व विकृत स्तरावर पोहचते. मूठभर लोकांच्या हातात संपूर्ण साधन-संपत्ती एकवटल्यानंतर ते भोगाची परिसीमा गाठतात. १६१७ पासून तंबाखूच्या निर्यातीतून व्हर्जिनियावासीयांच्या जीवनात सुबत्ता अवतरली. त्यासोबतच तेथील ब्रिटिशांना आरामात जगण्यासाठी व शेतीवर राबण्यासाठी माणसांची आवश्यकता भासू लागली. इंग्लंड  ज्या युरोप खंडाचा भाग आहे. त्या युरोपला गुलामगीरी हा प्रकार काही नवा नव्हता. भूदासांच्या जीवावरच तेथिल अमिर-उमरावांनी ऐश्वर्य संपन्न जीवनाचा उपभोग  शेकडो वर्ष घेतलेला होता. इंग्लंडची कर्तबगार महाराणी ऐलिझाबेथ प्रथमच्या काळापासून इंग्रज लोक नीग्रो गुलामांच्या अमानवी व्यापारात गुंतलेले होते. १५७२ सालापासून हॉकिन्स याने आफ्रिकेतून नीग्रो गुलाम आणून त्यांची दक्षिण अमेरकिेतील स्पॅनिश  वसाहतींमध्ये खुलेआम विक्री सुरू केली होती. दक्षिण अमेरिकेत सुरू झालेल्या नीग्रो गुलामीची प्रथा उत्तर अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये म्हणजेच आजच्या अमेरिकेत सुरू करण्याचे श्रेय जॉन राल्फकडेच जाते. व्हाईट लॉयन नावाचे एक ब्रिटिश जहाज जेम्स टाऊनला पोहचले. व्हाईट लॉयनमध्ये आफ्रिकेतील अंगोलामधून आणलेले २० नीग्रो लोक होते. त्यांना लोक म्हणणे देखील उचित ठरणार नाही. कारण लोक हा शब्द आपण माणसं या अर्थाने वापरतो. हे वीस नीग्रो गुलाम म्हणून विक्रीसाठी जेम्स टाऊनच्या वसाहतीत आणण्यात आले होते. त्यामुळे त्यांना माणसं म्हणण्यापेक्षा पशु म्हणणेच योग्य ठरेल. इंग्रज गो-यांच्या लेखी ते पशुच होते. व्हाईट लॉयनच्या नीग्रो गुलाम विकणा-या व्यापा-याकडून जॉन राल्फने त्यांना शेती कामासाठी विकत घेतले. तो दिवस होता ३१ ऑगस्ट १६१९. व्हर्जिनियातील म्हणजेच अमेरिकेतील नीग्रो गुलामगीरीचा प्रारंभ ठरलेला हाच तो काळा दिवस. अमेरिकेच्या इतिहासाला काळया रंगाने रंगविण्याचे काम जॉन राल्फने या दिवशी सुरू केले. पश्चिम आफ्रिकेच्या अंगोलातील हे नीग्रो आपले लोक,समाज,भाषा,श्रद्धा,जीवनमूल्यं,स्वातंत्र्य,संस्कृती गमावून अमेरिकेच्या भूमीवर पोहचले किंवा पोहचवण्यात आले. त्यांच्याकडून त्यांचे सर्वस्व हिरावण्यात आले होते . १६६१ मध्ये याच व्हर्जिनियामध्ये नीग्रो गुलामीला कायदेशीर मान्यता देण्यात आली. गोरे मालक त्यांना पशुसारखे राबवू शकत होते. त्यांची आपसात विक्री करू  शकत होते. अखेर मालकांचा धर्म,भाषा व संस्कृती त्यांना स्वीकारावी लागली. त्यांचा काळा वर्ण त्यांच्या गुलामीला अत्यंत घुणास्पद किनार देण्यास कारणीभूत ठरला. अब्राहम लिंकन यांनी नीग्रो गुलामी संपुष्टात आणली. परंतु तोपर्यंत या नीग्रोंकडे स्वतःचे म्हणून काहीही शिल्लक राहिले नव्हते. यामुळेच 'मी कोण आहे ?' हा त्यांचा शोध अद्याप ही थांबलेला नाही. म्हणूनच आजही अमेरिकेतील नीग्रो त्याच्या काळया वर्णापायी भोगाव्या लागलेल्या अनंत-अंथाग वेदना हृदयात घेउन गातो,' What did I do, To be so black, And blue ?'
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !