श्रमण परंपरेचा विस्तार - जैन धर्म..
भगवान महावीर यांचा जीवनप्रवास आणि जैन धर्माची स्थापना यांचा इतिहास पाहत असतांना महावीरपूर्व २३ तीर्थंकरांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या श्रमण परंपेरचा इतिहास पाहणे आवश्यक होते. यासाठी मध्यमपावाची धर्मपरिषदेत आपल्या प्रबोधनानं सर्वांची मनं जिंकणा-या महावीरांचा पुढील प्रवास समजण्यासाठी प्राग्वैदिक,अनार्य व अवैदिक श्रमण परंपरेचा इतिहास आपण मधल्या काही लेखांमध्ये जाणून घेतला. कैवल्यज्ञान प्राप्तीनंतर महावीरांनी प्राग्वैदिक श्रमण परंपरेला संस्थागत धर्म म्हणून स्थापन करण्याचे आव्हान स्वीकारले. वैदिक संस्कृती जेंव्हा चरमोत्कर्षावर होती,तेंव्हा मूलनिवासी समाजाची क्षत्रिय प्रणित संस्कृती व तत्त्वज्ञान यांची पिछेहाट झाली होती. एखाद्या अत्यंत विकसित संस्कृतीचा पराभव होतो,तेंव्हा तिचा प्रवाह खंडित होत असतो. अशा संस्कृतीचे तत्त्वज्ञानरूपी संचित देखील विखुरले जाते. अशा प्रवाहाचे पुनरूज्जीवन करणे अति कठिण काम असते. सर्वप्रथम या संस्कृतीच्या वारसदारांना त्यांच्या समृद्ध वारस्याची आठवण करून दयावी लागते. त्यांच्या हरवलेला आत्मविश्वास जागा करावा लागतो. संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचे विखुरलेले आणि सुप्तावस्थेत असलेले धागे एकत्र करून त्यांना एका शिस्तबद्ध चौकटीत बांधावे लागते. म्हणजेच तत्त्वज्ञानाची पुनर्रबांधणी करणे आवश्यक असते. मध्यमपावाच्या धर्मपरिषदेत श्रमण परंपरेच्या विरुद्ध असणा-या वैदिकांनी देखील महावीरांच्या ज्ञानाने प्रभावीत होऊन तिचा स्वीकार केला. हया यशाने महावीरांसमोर श्रमण परंपरेला संस्थात्मक धर्म म्हणून प्रस्थापित करण्याचे ध्येय उभे राहिले. उदात्त अशा ध्येयाला साक्षात साकार करण्याचा संघर्ष म्हणजे महावीरांच्या जीवनाचा उत्तरार्ध म्हणता येतो. मोक्षाची प्राप्ती झालेल्या महावीरांना आता तीर्थंकर म्हणून इतरांना भवसागर पार करण्यासाठीची चिरंतन व्यवस्था निर्माण करायची होती. यासाठी श्रमण परंपरेला एक संस्थात्मक धर्म म्हणून आकार दयावा लागणार होता. वैदिक काळाच्या उत्तरार्धात चातुर्वण्य आणि जातीव्यवस्था यांनी विकृत झालेल्या विषमतापूर्ण समाज व्यवस्था त्यांच्यासमोरचे सगळयात मोठे आव्हान होते. जुनाट धार्मिक समजुतींचे उच्चाटन,धार्मिक अंधश्रद्धांचे निर्मूलन व विकृत समाजव्यवस्थेचा विध्वंस म्हणजे भगवान महावीर व भगवान बुद्ध यांचे जीवन. महावीर असो वा बुद्ध यांनी केवळ विद्रोहच केला नाही,तर त्यासोबत निर्मळ-समतामूलक अशी व्यवस्था देखील समाजाला दिली. यामुळेच विध्वंस व नवनिर्माण अशा दोन्ही क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वात होत्या. महावीरांनी श्रमण परंपरेला संस्थागत धर्म म्हणून स्थापित करतांना अत्यंत सूक्ष्म व सखोल चिंतन केले होते. एकांतात ज्ञानप्राप्ती आणि समजात सुधारणा अशा दोन्ही स्तरांवर त्यांनी कार्य केले. कैवल्यज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर समाजाची जबाबदारी स्वीकारली. धर्म म्हणजे कर्मकांड नाही,तर धर्म हा माणसाच्या आत्म्याशी संबंधित असतो. महावीर-बुद्ध यांच्या काळात धर्माची सांगड जातीशी घातली गेली होती. एका विशिष्ट वर्गाच्या हातातच धर्माचे सर्व अधिकार केंद्रित झाले होते. सर्व प्राणिमात्रांतच नव्हे तर चराचरात ईश्वराचा अंश असल्याचा दावा करणारे अद्वैत तत्त्वज्ञान समाजावर अधिराज्य करत होते. त्याच्यावर विविध सिद्धांत मांडले जात होते. तसेच यासाठी विविध धर्मग्रंथांची निर्मिती होत होती. धर्मपरिषदांमधून अद्वैत तत्त्वज्ञानावर विद्वान पंडित शब्दांचे जंजाळ विणत होते. समाजात वावरतांना मात्र माणसांना जगण्याचा अधिकार नाकरत होते. याच अद्वैतवादी पंडितांना शुद्राची सावली अपवित्र आणि स्पर्श धर्मभ्रष्ट होण्याचं कारण वाटत होतं. शुद्राने धर्माचे श्रवण देखील करता कामा नये असा दंडक होता. शुद्र कितीही विद्वान व सदाचारी असला,तरी तो शुद्रच होता. एकीकडे अद्वैत तत्त्वज्ञानावर उभा असलेला धर्म आणि दुस-या बाजूला समतेला पाप ठरवणारे आचरण अशी विसंगती म्हणजे समाज व्यवस्था. अशी हास्यास्पद आणि विवेकहीन परिस्थिती होती. ज्या स्त्रीला वेदात गृहलक्ष्मी व गृहसम्राज्ञी संबोधले,तीच स्त्री प्रत्यक्षात एक पराश्रिता,उपेक्षिता,अधिकारहीन व उपभोग्य वस्तू मानली जात होती. शुद्र-स्त्री यांना ज्ञानार्जन व मोक्ष यांचा अधिकर नाकारण्यात आला होता. गाय,बैल,अश्व आदि ज्या मूक पशूंना मानवजातीचे निकटतम साहयकर्ते समजून राष्ट्रीय धन म्हणून मानण्यात आले होते. त्या मूक-निष्पाप पशूंचा देवपूजेच्या नावाखाली यज्ञामध्ये बळी देऊन होम केला जात होता. शुद्र,नारी व पशू खरोखरच ताडन के अधिकारी झाले होते. मानव वा सजिव म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकारच व्यवस्थेच्या मालकांनी-चालकांनी नाकारला होता. प्राग्वैदिक काळापासून म्हणजेच हडप्पा-मोहेंजोदरोपासून गणराज्यात्मक पद्धती ध्वस्त करून एकाधिकारशाही निर्माण करणारी सामंतशाही वा राजेशाही निर्माण करण्यासाठी साम्राज्य ही असूरी संकल्पना रुजविण्यात येऊ लागली होती. म्हणेज समाजव्यवस्थेतील शिल्लक असलेली लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. लहानसहान गोष्टींवरून गणराज्यांमध्ये लढाया भडकत होत्या. मुठभर उच्च वर्गातील लोक अपार भोग व अखंड शोषण करण्यात दंग होते. उच्च वर्गातील स्ति्रयांनाही केवळ शोभेची व उपभोग्य वस्तू याशिवाय अधिक दर्जा नव्हता. अशा अस्वस्थ वर्तमानात मूलनिवासी समाजाला त्यांच्या ख-या धर्माची जाणीव करून देणे नितांत आवश्यक होते. साधारणपणे इसवीसन पूर्व सहाव्या शतकातील भारताचे हे वर्तमान म्हणता येईल. अशा वर्तमानात विशुद्ध धर्म समाजाला सांगण्यासाठी केवळ तत्त्वज्ञान पुरसे नव्हते. विचारांना आचाराची चौकट देण्याची नितांत आवश्यकता होती. म्हणजेच भारताच्या भूमीत सर्वप्रथम संस्थागत धर्माची आवश्यकता निर्माण झाली होती. समतेच्या स्थापनेसाठी धर्माची चौकट निर्माण करणे ही काळाची गरज होती. आज आपण पाहतो की अनेक जण धर्म ही संकल्पना नाकारतात किंवा ईश्वर ही संकल्पना नाकारतात. असे असले तरी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा एक मार्ग दाखवावा लागतो.कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता तेवढी नसते. समाजातील बहुतांश लोकांना जगण्याचा आराखडा तयार करŠन द्यावा लागतो. यासाठी संस्थात्मक धर्माची गरज निर्माण होते. हे इतिहासाच्या अवलोकनावरून लक्षात येते. शोषणाविरूद्ध निर्माण झालेल्या प्रत्येक धर्मामध्ये शोषण करणारे स्वार्थी शोषक जन्माला आले. हे वास्तव ही नाकारता कामा नये. मात्र याचा अर्थ मानवी समाजाला धर्माची आवश्यकता नाही,असे अजिबात नाही. इतिहासाच्या विविध टप्प्यांवर धर्मातील विकृती व साचलेपण दूर करणारे महापुरुष जन्माला आलेले आहेत. महावीरांनी ईश्वर ही संकल्पना नाकारत आत्मा हे तत्व सर्वोतोपरी मानले. आत्मोन्नतीने माणूसच ईश्वर होऊ शकतो. असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. बुद्धांनी आत्मा हे तत्त्व देखील नाकारले. इतके प्रागतिक विचार इसवीसन पूर्व सहाव्या शतकात या महापुरूषांनी मांडले. आज आधुनिक म्हणवणा-या जगातील सुशिक्षितांमध्ये काही सन्मान्य अपवाद वगळता हे धैर्य दिसत नाही. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गात कालौघात विकृती निर्माण झाल्या. हे नाकारण्यातही अर्थ नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला. मात्र त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजेच त्यांच्या अनुयायांना शोषणकारी व्यवस्थेला नाकरून जगण्याचा एक मार्ग देणे गरजेचे होते. हे या महामानवाच्या लक्षात आले होते. आजकाल विवेकवादाच्या नावाखाली ईश्वर,धर्म व धर्मपरंपरा नाकारणारे काही लोक दिसतात. हे लोक बुद्धीमान आहेत व आत्मविश्वासाने भरलेले आहेत. असे लोक संख्येने अत्यल्प असतात. धर्माच्या नावाखाली चालणारे शोषण व ईश्वरावर हवाला ठेवण्याची दैववादी वृत्ती यांनी ते अस्वस्थ झालेले दिसतात. त्यांची तळमळ प्रामाणिक असते. परंतु प्रत्येक माणूस असा असतो असे नव्हे. सर्वसामान्य माणूस कोणत्या ना कोणत्या अंगाने दुबळा असतो. त्याला जगण्यासाठी मानसिक आधार लागतो. धर्म त्याला हा आधार देतो. धर्म ही सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी दिलेली केवळ एक चौकट आहे. धर्माच्या आचरण पद्धती वा कर्मकांड यांच्यामध्ये फारसे तथ्य नाही. याची जाणीव महावीर,बुद्ध,गुरू नानकदेव,येशू ख्रिस्त,मोहंम्मद पैगंबर,झरतुष्ट्र इत्यादी प्रत्येक धर्मसंस्थापक महापुरुषांना होती. असे असतांनाही त्यांनी धर्माची निर्मिती केली. कारण सर्वसामान्य माणसाच्या दुबळेपणाची त्यांना जाणीव होती. यामुळेच धर्म ही संकल्पना मानवी जीवनातून कधीही हद्दपार होणार नाही. हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. विवेकवादयांनी कोणताही भेदभाव न बाळगता किंवा हातचे न राखता प्रत्येक धर्मातील विकृतींना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले,तर समाज ही त्यांचे नेतृत्व स्वीकारेल आणि धर्माकडे कर्मकांड-अंधश्रद्धा यांना दूर सारून विशुद्ध दृष्टीने पाहिल. मात्र धर्म ही संकल्पनाच मोडित काढावयास गेल्यास अस्वीकाराशिवाय काहीही हाती लागणार नाही. भगवान महावीरांनी भारतातील पहिला संस्थात्मक धर्म स्थापन केला. तर भगवान बुद्धांनी दुसरा संस्थात्मक धर्म निर्माण केला. त्यांच्या धर्मनिर्मितीमागील हेतूचा विवेकवादी विचार केल्यास धर्म संकल्पनेचे महत्व समजू शकते. यासाठीच महावीरांनी संस्थात्मक धर्म म्हणून श्रमण परंपरेचा केलेला विस्तार आणि समाजाने त्याचा केलेला स्वीकार हा प्रवास पाहणे महत्वाचे ठरते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment