वाचाल तर वाचाल !


'वाचाल तर वाचाल' हा महामंत्र पददलितांच्या कल्याणासाठी आयुष्याची आहुती देणा-या महात्मा फुलेंनी समाजाला दिला आहे. भारताचे सर्वात लोकप्रिय माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ..पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ क्टोबर 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आजच्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शासकिय व सामाजिक स्तरांवर विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या पिढिला वाचनसंस्कृतीचे संस्कार देणे हा यासर्व प्रयत्नांचा उद्देश आहे.  डॉ..पी.जे.अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांची शिल्लक राहिलेली एकमेव लौकिक संपत्ती म्हणजे त्यांची वैयक्तिक वीस हजार ग्रंथांची ग्रंथसंपदा. त्यांच्या या वाचन साधनेतून भारताचा एक महान वैज्ञानिक,आदर्श राष्ट्रपती आणि एवढेच नव्हे तर एक आदर्श व सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व आकारास आले,हे म्हणणे अयोग्य होणार नाही. भारतात वाचन आणि ग्रंथालय यांना अत्यंत प्राचीन संस्कृती लाभली आहे. अध्यात्म आणि विज्ञान या क्षेत्रांत प्रचंड योगदान देणा-या भारतात ग्रंथांविषयी व वाचनाविषयी प्रेम आणि आदर हा नवा नाही...पूर्व ४ थ्या शतकापासून वाचनाची अमर्याद संधी उपलब्ध करुन देणारी ग्रंथालय संस्कृती रुजलेली दिसते. प्राचीन काळी आपल्या नालंदा व तक्षशिला सारख्या विद्यापीठांमधील ग्रंथालयांचा लाभ घेण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करुन अनेक परदेशी अभ्यासक येत असत,यावरुन आपल्याला भारत,वाचन आणि ग्रंथालय यांचे घनिष्ठ नाते सांगता येते. ग्रंथ वाचन,रक्षण,जतन आणि संवर्धन यांसाठी भारतात झालेले प्रयत्न सर्वज्ञात आहेत. ग्रंथाला आणि त्याच्या वाचनाला गुरुस्थानी मानून,आपल्या देवालयात कोणत्याही मूर्तीऐवजी ग्रंथाची सेवा व अखंड वाचन करणारा शीख धर्म केवळ भारतातच निर्माण झाला.वाचन प्रेमामुळे भारतात समृद्ध ग्रंथालयांची एक गौरवशाली परंपरा अखंड प्रवाहित झालेली आपल्याला दिसते. पुरातत्त्वीय पुरावे आणि चिनी प्रवाशांच्या नोंदींवरुन इ..४ थ्या शतकात नालंदा विद्यापीठात तीन ईमारतींमध्ये विस्तारलेले भव्य ग्रंथालय असल्याचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत. याच काळात विक्रमशिला,उदंतपुरी,सुवर्णपुरी,जग्गदल, मिथिला, वल्लभी इत्यादी  ठिकाणी देखील अशीच समृद्ध ग्रंथालये होती. दक्षिण भारतात ही अशीच समृद्ध ग्रंथालय संस्कृती विकसित झालेली होती. बौद्ध, हिंदू व जैन या सर्व भारतीय धर्मांनी ग्रंथ वाचन व जतन यांना उत्तेजन व आश्रय दिलेला होता. भारतीय राज्यकर्त्यांनी पूर्वीपासूनच ग्रंथ वाचन,हस्तलिखिते निर्मिती व संवर्धनास उत्तेजन दिलेले आहे. अनेक गैरसमज असलेल्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या वाचन प्रेमाची सत्यता पाहिली तर आपण आवाक होतो. मुगल बादशहा हुमायॅू याने दिल्लतील 'पुराना किला' मध्ये आपल्या एका महालाचे रुपांतर ग्रंथालयात केले होते. अकबराने 'शाही ग्रंथालय' स्थापन केले. या ग्रंथालयात ग्रंथांचे वर्गीकरण आणि जतन यासंदर्भात विविध अभिनव पद्धती राबविण्यात येत. बाबर आणि जहांगीर यांनी स्वतःचे वैयक्तिक ग्रंथालय आपल्यासोबत कोणत्याही ठिकाणी नेण्याची सोय करुन घेतली होती. यालाच आपण आजच्या भाषेत मोबाईल लायब्ररी म्हणू शकतो. अशा सर्व उदाहरणांवरुन भारतीयांचे ग्रंथप्रेम व वाचनसंस्कृती यांची जाणीव आपल्याला होते. जगाच्या इतिहासात ज्या व्यक्तिंनी आपल्या कर्तबगारीने अमिट छाप उमटवलेली आहे,ती प्रत्येक व्यक्ती वाचनवेडी होती. आज इंटरनेट आणि मोबाईल यांनी घातलेला विळखा आपल्या किमान दोन पिढयांना जायबंदी करणार आहे,हे वास्तव नाकारता येत नाही. मोबाईलच्या जमान्यात वाचन व लेखन हा प्रकार कालबाहय ठरत आहे. अशा काळात ग्रंथालयांजवळ मोजकेच लोक येत आहेत. नव्या पिढिच्या जवळ ग्रंथालयांना व ग्रंथांना न्यावे लागणार आहे. आपल्या वाचनसंस्कृतीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आज आपण फेसबुक आणि व्हाट्सप या समाजमाध्यमांवर आपण विविध ग्रंथ एकमेकांना पाठवत असतो. पण आपण ते वाचतो का ? ई- बुक ही सुविधा इंटरनेटवर उपलब्ध आहे. जवळपास सर्वच वर्तमानपत्रे देखिल इंटरनेटवर उपलब्ध आहेत. याचाच अर्थ वाचनासाठी कोणतीच समस्या वा अडचण शिल्लक राहिलेली नाही. तरी दर्जेदार साहित्याचे वाचन करणारे वाचक किती आहेत ? हा महत्वाचा प्रश्न आहे. पुस्तक असो वा वर्तमानपत्र हे प्रत्यक्षात हातात घेऊन वाचनाची पद्धत यामुळे नष्ट होईल की काय अशी भीती सातत्याने व्यक्त केली जात आहे. अनेकजण या नव्या वाचनाच्या सोयींची पाठराखण करतांनाही दिसतात. असे असतांनाही वाचणा-यांची घटलेली संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रंथ वा वर्तमानपत्र प्रत्यक्ष हातात घेऊन वाचण्यातील तद्रुपता ई-बुक, फेसबुक वा इंटरनेट यामध्ये निर्माण होऊ शकत नाही,हे वास्तव नाकरता येत नाही. वाचनाच्या सुविधा अफाट झालेल्या असतांना वाचणा-यांची संख्या झपाटयाने कमी होत आहे,हे वास्तव कोणत्याही समाजाच्या भविष्यकाळासाठी निश्चितच धोकादायक आहे. वाचनाने माणूस विचारप्रवण होतो, त्याच्या विचारांच्या कक्षा नकळत रुदांवतात, त्याची कल्पनाशक्ती व संवेदनाशक्ती तरल होते, त्याची एकाग्रता व तद्रुपता वृद्धिंगत होते. हे सर्व होत असतांना एक परिपूर्ण माणूस म्हणून तो नकळतपणे घडतो. जागतिकीरणानंतर आपल्या देशात नव मध्यमवर्ग मोठया प्रमाणात निर्माण झालेला आपण पाहतो. या वर्गाची आर्थिक क्षमता असतांनाही हा वर्ग वाचनाकडे दुर्लक्ष करतांना दिसतो. आपल्या घरात किमान दोन वर्तमानपत्रे आणि चांगली ग्रंथसंपदा असण्याचे महत्व या वर्गाला वाटत नाही, ही बाब चिंताजनक आहे. आपल्या मुलांनी अधिक सुखवस्तू जीवन जगण्यासाठी केवळ शालेय आणि रोजगाराभिमुख पुस्तकांचे पठण करावे अशी अपेक्षा केली जाते,हेच मोठे चिंताजनक आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आलेली संवगता हे आपल्या -हास पावत चाललेल्या वाचनसंस्कृतीचे द्योतक मानावे लागेल. आज सुखवस्तूपणा वाढलेला दिसतो, परंतु समाज तेवढाच भरकटलेला आणि वैल्यग्रस्त दिसतो. यासाठीच पुन्हा एकदा आपल्याला वाचनाकडे वळावे लागेल. यासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनपूर्वक पाऊलं ऊचलावी लागतील. वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन हे एका नव्या सशक्त भारताची नांदी ठरेल. आपल्या भारताला अनेक अब्दुल कलाम हवे आहेत. ते निर्माण होण्यासाठी आपल्याला वाचनाकडे वळावेच लागेल.

                                                                                                          प्रा.डॉ. राहुल हांडे,

                                                            भ्रमणध्वनी - ८३०८१५०८६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !