हिमालय,पेन-पो आणि जैन-बौद्ध परंपरा..

हिमालय पर्वत म्हणजे भारतावरील प्रत्येक आक्रमणाचा आणि भारतातील प्रत्येक परिवर्तनाचा साक्षीदार.अतिप्राचीन काळापासून भारताच्या धार्मिक,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील घडामोडींशी हिमालय व त्याच्या भोवतलचा परिसर यांचा संबंध अतिशय महत्वाचा राहिला आहे. प्रत्येक काळात घडणारा व बदलणारा भारत सर्वप्रथम हिमालयाने अनुभवला. द्रविडांची संस्कृती,तिची समृद्धी,आर्यांचे आगमन,द्रविड-आर्य संघर्ष-समन्वय,आर्य-आर्येतर विचारधारांची निर्मिती हा सर्व इतिहास हिमालयाने अनुभवलाच नव्हे तर पचवला आहे. अशा हिमालयाच्या परिसरातील बिहार,नेपाळ व तिबेटची भूमी आणि त्याच्यात उगम पावणा-या सिंधू-गंगा-ब्रम्हपुत्रा आदि नदयांची खोरी यांच्यात आजच्या भारताची मूळं आहेत. प्राग्वैदिक व अनार्य बौद्ध-जैन धर्मपरंपरांचा उगम व विकास यांच्या पहिल्या पाऊलखुणा देखील हिमालयाच्या कुशीतच उमटलेल्या दिसतात. जैन धर्माचा विचार जेंव्हा आपण करतो तेंव्हा हिमालयातील लोकांच्या जुन्या चालीरीतीमध्ये जैन धर्माशी साधर्म्य सांगणा-या अनेक गोष्टी आढळतात. हिमालयातील पश्चिम नेपाळमध्ये ठाकूर जमातीचे लोक राहतात. त्यांच्या उपासना पंथाचे नाव 'पेन-पो' असे आहे. पेन-पो पंथांच्या अनुयायांचा देवावर विश्वास आहे. पण त्यांचा देव ज्याच्या अस्तित्वासंदर्भातच प्रश्नचिन्ह असणा-या स्वर्गात नाही. म्हणजे स्वर्ग ही संकल्पना पेन-पो विचारधारेत अमान्य केलेली दिसते. पेन-पोंचा देव स्वर्गात नसून 'तो स्वर्गाकडे वाटचाल करणारा देव' आहे. तीर्थंकर ही जैन परंपरेतील संकल्पनेचा अर्थ 'भवसागर तरून नेणारा' असा आहे. तसेच जैनांच्या 'जिन' शब्दांत 'इंद्रिये जिंकणारा' हा अर्थ अभिप्रेत आहे. यामुळेच स्वर्गाकडे वाटचाल करणारा अथवा तरून नेणारा अथवा जिंकणारा या संकल्पनांमध्ये कमालीचे साम्य दिसते. पेन-पो जमातीचे ठाकूर लोक आपल्या देवाची प्रतिमा जैन तीर्थंकरांप्रमाणे पूर्ण दिगंबर व ध्यानस्थित अशीच बनवितात. फक्त फरक ऐवढाच की पेन-पो पंथातील लोकांचा देव पंचमुखी आहे तर जैनांच्या तीर्थंकरांच्या प्रतिमा एकमुखी असतात. त्यांच्या देवाला दहा हात आहेत त्यामुळेच ते त्याला 'जोड' असे म्हणतात. परंतु मूर्तीच्या पांची मुखांचा रंग आणि जैन तीर्थंकरांच्या मूर्तीचा रंग सारखा असतो. निळा,तांबडा,पांढरा,हिरवा आणि पिवळा हेच ते पाच रंग होत. पेन-पोंच्या देवाचे प्रतीक एक पक्षी आहे,तर तीर्थंकरांचे प्रतीकसुद्धा एक पक्षीच आहे. आपल्या देवतूल्य पूर्वजांच्या प्रतीमासुद्धा पेन-पो लोक दिगंबर ध्यान मुद्रेतच स्थापन करतात व त्यांना पांढरा किंवा निळा रंग देतात. हाच पेन-पो पंथ बौद्ध धर्माच्या पूर्वपरंपरेशी निगडीत दिसतो. अनेक ठिकाणी सिंहासनाधिष्ठित बौद्ध प्रतीमा आढळतात. सिंहासनावर पक्ष्याचे चित्र कोरलेले असते. तसेच जैन तीर्थंकरांच्या प्रतीमा कांही विशिष्ट आसनावर बसलेल्या दाखवितात. या आसनांवर सुद्धा पक्षी व इतर प्राणी कोरलेले असतात. प्रतीमा,आसन व पक्षी याबातीत जैन,बौद्ध व पेन-पो यांच्यात साम्य आढळून येते. पेन-पो परंपरा ही जैन व बौद्ध धर्मपरंपरेशी जुळणारी अशी आहे. जैनांशी पेन-पोंचे साधर्म्य अधिक दिसते एवढेच. पेन-पो पंथाच्या धार्मिक चालीरीतींचा समग्र अभ्यास झालेला नाही. असे असले तरी जैन धर्माप्रमाणे या पंथात कोणी सृष्टीकर्ता परमेश्वर मानलेला नाही. हे मात्र संपूर्ण सत्य आहे. जैनांप्रमाणे हा पंथ संपूर्ण शाकाहारी लोकांचा पंथ आहे. अहिंसेला त्यांनी सर्वोपरि महत्व दिलेले दिसते. पेन-पो लोकांच्या घरांवरील,भांडयांवरील व कपडयांवरील शुभसूचक चिन्हे देखील अभ्यासण्यासारखी आहेत. पेन-पोंच्या घर,भांडे व वस्त्र यांच्यावर शुभसूचक म्हणून स्वस्तिक चिन्ह असतेच. जैनांच्या सर्व पवित्र वस्तूंवरही स्वस्तिक चिन्ह आढळते. तसेच जैन शिल्पांवर सुद्धा स्वस्तिक कोरलेले दिसते. हे स्वस्तिक प्राग्वैदिक काळातील सिंधू संस्कृतीच्या प्राप्त अवशेषांवर आढळलेले आहे. पेन-पो पंथातील लोक जैनांशी असलेल्या त्यांच्या साधर्म्याला मान्य करतात. पेन-पो पंथीय ठाकूर लोकांच्या मते त्यांचे साधू पूर्णतः विरक्त असतात आणि मोक्षाचा मार्ग स्वीकारतात. पेन-पो साधू आणि जैन तीर्थंकर यांच्यातील हे साम्य ठाकूर लोक कदापि नाकारत नाही. मानववंशशास्त्रानुसार नेपाळमधील हे ठाकूर लोक नेमक्या कोणत्या वंशाचे आहेत,हे सांगता येत नसले,तरी ब-याच संशोधकांनी त्यांना मंगोल वंशांतील भारतीय लोक मानले आहे. परंतु ठाकूर लोक यासंदर्भात वेगळा दाखला देतात. त्यांच्या मते त्यांचे राजघराणे पांडवांपासून चालत आलेले आहे. आज ते नेपाळी असले तरी आपण भारतीय आहोत,हे सिद्ध करण्याची त्यांची धडपड दिसून येते. त्यांचे भारतीयत्व अत्यंत प्राचीन म्हणजे प्राग्वैदिक काळातील ठरते,असे काही संशोधकांचे मत आहे. पेन-पो पंथाच्या ठाकूर लोक भारतातून नेपाळला गेले असावेत. मात्र त्यांनी आपल्या जुन्या धार्मिक समजुती आजपर्यंत जोपासून ठेवल्या असाव्यात हे स्पष्ट होते. यामुळेच अनेक अभयासक पेन-पो पंथ म्हणजे प्राचीन जैन धर्माचा स्थलांतरीत झालेला एक भाग असावा,असे प्रतिपादन करतात. अशा स्थलातंराविषयी प्राचीन काळापासून पुरावे उपलब्ध असलेले दिसतात. बिहार,नेपाळ व तिबेट या प्रदेशांमध्ये प्राचीन काळापासून दळण-वळण होत होते. भारत व हिमालयाच्या डोंगराळ भागांतील लोकांत वांशिक साम्यही दिसून येते. यांना 'इंडो-हिमालयन' असेही संबोधले जाते. इंडो-हिमालयन लोकांनीच धर्मविषयक परंपरांचा प्रचार अनेक ठिकाणी केला. असे सांगितले जाते. प्रा.मोतीचंद्र यांनी आपल्या सार्थवाह नावाच्या ग्रंथात मोहेंजोदरो-हडप्पा संस्कृतीच्या काळापासून व्यापारउदीमाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासांनी धर्म व कलेचा प्रसार साधला,तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली. हे जैन व बौद्ध कथा साहित्याच्या सबळ पुराव्यांनी सिद्ध केले आहे. इसवीसन पूर्व सहाव्या शतकाच्या सुमारास बिहार ते नेपाळ व तिबेटपर्यत व्यापारउदिमासाठी जाणारे लोक होते. त्यांनी आपल्या धार्मिक परंपराचेही आदानप्रदान केले. इसवीसन पूर्व ५ व्या शतकात आर्टजेरकस मेनन हा पर्शियाचा(इराण) सम्राट होता. त्याचा राजवैद्य टेशयसन याने आर्टजेरकस दुसरा व छोटा किर यांच्यातील युद्धप्रसंगाचे वर्णन केले आहे. त्यांत त्याने हिमालय पर्वतातील भूतान ते सिंधू खो-यापर्यंतचे लोक गंगेच्या पठार प्रदेशातील लोकांकडे जात असत असा उल्लेख केला आहे. एफ.विल्फोर्ड या पाश्चात्य संशोधकांच्या मते हिमालय पर्वत रांगांच्या पायथ्याजवळील प्रदेशातील बहुतेक राजे मूळचे नेपाळमधील लोक आहेत. वायव्य बिहारचा हिमालयालगतच्या भागात 'चेरो' जमात होती. अतिशय शक्तीशाली चेरो जमातीच्या सात पिढयांनी या भागात राज्य केले. चेरो लोक मूळचे ऑस्ट्रोलाईड वंशाचे मानले जातात. टेशियसने केलेला उल्लेख  गंगाखो-यातील या लोकांसंबंधीचाच असावा. चेरो जमातीच्या प्राचीन इतिहासाचा अद्याप समग्र अभ्यास होऊ शकलेला नाही. परंतु आर्यांची भारतात वस्ती होत असतांना व आर्यांनी आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला असतांना या चेरो लोकांनीही त्यांना विरोध केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे चेरो लोकसुद्धा आर्यविरोधी तत्त्वज्ञानाचे अथवा सुधारणावादी नव्या मताचे पुरस्कर्ते होत हे स्पष्ट होते. बिहार प्रांतातील लिच्छवी क्षत्रियांचे जैन धर्मासाठी असेलेले मौलिक योगदान भगवान महावीर या एका शब्दात सामवलेले आहे. हे लिच्छवी व्रात्य क्षत्रियांचे वंशज आहेत. या कुळाचे मूळ मानवी वंश व मूलभाषिक कुळ कोणते ते मानवंशशास्त्राच्या अभ्यासातून व्हावे तितके स्पष्ट झालेले नाही. भगवान महावीरांचे लिच्छवी कुळ हे स्वतंत्र आणि स्वाभिमानी कुळ म्हणून प्राचीन भारतीय इतिहासात व साहित्यात प्रसिद्ध आहे. लिच्छवी कुळाने कोलिय,भग्ग,मल्ल अशा आठ कुळांची एकजूट करुन त्यांच्या गणतंत्रांचे एक प्रजासत्ताक  निर्माण केले होते. उत्तर बिहार ते नेपाळ या प्रदेशात हे प्रजासत्ताक विस्तारलेले होते. वैदिक संस्कृतीच्या या भागातील प्रभावासंदर्भात 'स्लॅव्हरी इन अॅशंट इंडिया', या ग्रंथात डी.आर.चन्ना या संशोधकांनी एक सबळ पुरावा सादर केला आहे. त्यानुसार या भागात ब्राह्मण शेतकरी होते. यावरून वैदिक धर्माचा प्रभाव या प्रदेशात पडू शकला नव्हता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. अशा रीतीने बिहार प्रांतातील गणराज्यांतून जेथे मूळचे आर्येतर रहिवासी अधिक संख्येने होते तेथे वैदिकांविरुद्ध धार्मिक उठाव जोरदारपणे उभा राहिला आणि सुधारणावादीची तत्त्वे मूळ धरू लागली. याचे प्रधान कारण तेथे क्षत्रियांच्या हातात राजसत्ता होती. क्षत्रिय याचा अर्थ केवळ लढवय्यी जमात किंवा राजकीय नेतृत्व  असा नसून,प्राग्वैदिक काळापासून द्रविड किंवा आर्येतर समाजाचे बौद्धिक नेतृत्व करणारी जमात एवढा व्यापक होतो. क्षत्रिय जमात व बिहार प्रांत यांनी सुधारणावादाचा पाया घातला. हे मान्य करावे लागते. अशाच प्रकारे प्राग्वैदिक काळातील मूलनिवासी आर्येतर लोकांची धर्मतत्त्वे,सांस्कृतिक संचित आणि समजूती एकत्रित होत गेल्या. वैदिक काळात या सुप्त अवस्थेत कार्यरत होत्या. उत्तर वैदिक काळात म्हणजे इसवीसन पूर्व सहाव्या शतकापासून आर्येतरांच्या धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक संचिताला संस्थागत धर्माचे कोंदण लाभले. यातूनच जैन आणि बौद्ध या दोन धर्माची निर्मिती झाली.
प्रा.डॉ.राहुल हांडे,                                      भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !