'नाग-पणि-कलिंग' ते जैन-बौद्ध
जैन व बौद्ध हया प्राग्वैदिक काळापासून अस्तित्वात असलेल्या धर्मपरंपरा आहेत. यासाठी त्यांचा आर्येतर जमातींशी असलेला अनुबंध लक्षात घ्यावा लागतो. द्रविडांनी भारताच्या भूमीत स्थिरावल्यानंतर येथील मूलनिवासी जमातींशी समन्वय साधला. यामधून एका समृद्ध संस्कृतीचे निर्माण झाले. असे असले तरी या बहुपेडी संस्कृतीत प्रत्येक जमात आपले वेगळे वैशिष्टय राखून होती. दुस-या शब्दात सांगायाचे झाल्यास एका सर्वसमावेशक संस्कृतीचा भाग असून ही प्रत्येक जमातीचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित होते. विविधतेत एकता हया भारतभूमीच्या जगावेगळया जीवनशैलीचा पाया येथेच मजबूत झालेला होता. द्रविडांनी ज्या मूलनिवासी जमातींशी एकरूप होत,एक रक्तहीन सांस्कृतीक क्रांती घडवली. त्याच्यामध्ये सहभागी असणा-या आर्येतर जमातींचा जैन किंवा बौद्ध धर्मपरंपरांच्या जडणघडणतील सहभाग लक्षात घेण अत्यंत महत्वाचे आहे. पुराणांमध्ये सर्पासारखे वर्णन करण्यात आलेले नागलोकांचा विचार सर्वप्रथम करणे आवश्यक आहे. पुराणातील कथांचा पगडा जनमानसावर जसा-जसा बसत गेला,तसा-तसा नागलोक म्हणजे खरोखरचे नाग असा समज दृढ होत गेला. खरे तर मथुरेजवळील प्रदेशांत व गंगेच्या खो-यात राहणारा एक मानववंश म्हणजे नागलोक. सर्पपूजेला अनन्यसाधारण महत्व देणारा हा समाज नागवंश म्हणून ओळखला गेला. याच अर्थ ते नाग नव्हते तर नागपूजा करणारे मानव होते. आजच्या बिहारमधील राजगृह अथवा राजगिर हे शहर,प्राचीन मगधराज्याची राजधानी होती. राजगिर शहरात इसवीसनपूर्व पहिल्या शतकात नागपुरुष किंवा नागलोकांच्य पूजेचा मोठा उत्सव साजरा होत होता. आर्य व नाग या दोन्ही वंशांचे हाडवैर होते. नागांबरोबर आर्यांच्या अनेक लढाया झाल्या आहेत. महाभारताचा संदर्भ घेतल्यास अर्जुनाचा विवाह नागवंशीय राजकन्या उलुपी हिच्याशी झाला होता. तसेच जनमेजयाने केलेल्या नागयज्ञाचाही उल्लेख आहे. याचबरोबर प्राचीन भारतीय साहित्यात नागांचा बळी देणे अथवा जिवंत पुरल्याचा कथा आहेत. कोणतीही वास्तू बांधतांना बांधकाम र्निविघ्न पार पडण्यासाठी दलित समाजातील व्यक्तीला जिवंत पुरण्याची प्रथा दिड-दोनशे वर्षांपर्यंत अस्तित्वात होती. एखादा व्यक्ती संकटात असले,तर संकटनिवारणासाठी नारायण नागबलीसारखे विधी आजही केले जातात. आजचा दलित समाज हा नागवंशीय समाज आहे,हे स्पष्ट होते. आर्यांनी नागलोकांवार संपूर्ण विजय प्राप्त करून त्यांना कायमचे शुद्र ठरवले. पुराणकथा रचतांना नागलोकांचे वर्णन अर्धे मनुष्य व अर्धे सर्पशरीर असे वर्णन केले. त्यांना खरोखरचे नाग करून टाकले. त्यामुळे नागवंशाचा गौरवशाली इतिहास कायमाचा पुसला गेला. कृषीव्यवसाय करणारा नागवंशीय समाज आर्यांच्या पूर्वीचा होता आणि त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न आर्यांनी सदैव केला. हया सर्व गोष्टी इतिहास नमूद आहेतच. शेतक-यांचा राजा बळीच्या कथेचा अन्वयार्थ लावल्यास अनेक गोष्टी लक्षात येतात. बलीप्रतिपदेला शेतकरी 'समाज ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो', अशी मागणी करतो. हया मागणीचे मूळ नागवंशाच्या इतिहासात असलेले दिसते. अवैदिक व सुधारणावादी धर्मपरंपरांमध्ये सर्प-नाग हे एक प्रमुख चिन्ह असलेले दिसते. विशेषतः जैनांमध्ये नाग चिन्हाला अतिशय महत्व आहे. जैन मूर्तीशिल्पांमध्ये जिन मूर्तीच्या पार्श्वभागी अनेक फण्यांचे नागशिल्प ही असते. नागफणीखाली बसलेली जिनमुद्रा अनेक ठिकाणी आढळते. तसेच बोधीवृक्षाखाली बसलेल्या भगवान बुद्धांच्या मागे सुद्धा नागफणा दाखविला जातो. भागवतांमध्ये श्रीकृष्ण व बलराम या देवतांच्या मागे नागफणा दाखविण्याची प्रथा आहे. येथे आर्येतर नागवंश आणि जैन-बौद्ध धर्मपंरपरा यांचा अनुबंध स्पष्ट होतो. दुस-या बाजूला विष्णूची शय्या शेषनाग आहे. तसेच समुद्रमंथनासाठी मेरू पर्वत रवीसारखा ‹फिरविण्यासाठी वासुकी नागाचा वापर होतो. या कथांचा आणि नागवंशाच्या पराभवाचा संबंध देखील तपासता येतो. नागवंशप्रमाणेच एक महत्वाची आर्येतर जमात म्हणजे पणि. ऋग्वेद व इतर वाङ्मयात या जमातीचा उल्लेख आलेला आहे. ही जमात द्रवीड होती हे निश्चतपणे सांगता येत नाही. वैदिक वाङ्मयाने पणि जमातीबद्दल बरेच काही सांगितले आहे. पणि ही एक अयाज्ञिक म्हणजे,यज्ञ न करणारी जमात होती. आर्य त्यांचा उल्लेख पणिदास म्हणूनच करत. आर्य व पणिलोक यांच्यामध्ये लढाया झालेल्या आहेत. जे.डाऊसन यांच्या 'अ क्लासिकल डिक्शनरी ऑफ हिंदू मायथॉलॉजी' या ग्रंथानुसार आर्यांनी त्यांना जिंकून त्यांचे सर्वस्व हिरावले आणि त्यांना दास केले. तसेच वैदिक वाङ्मयात या लोकांचे वर्णन ते पापी,दुष्ट,राक्षस,वाटमारे,डाकू आहेत अशा स्वरूपात करण्यात आले. डॉ.धर्मानंद कोशांबी यांच्या मते हे लोक आर्यांशी व्यापारविनिमय करीत असावेत. त्यामुळेच 'बनिया','वणिक' इत्यादि व्यापारी अर्थ दर्शविणारे शब्द मूलतः संस्कृत बाहेरील भाषा गटांतील आहेत. यावरून पणिपासून पुढे पण्यसमाज निर्माण झाला असावा ही मानव वंशावळ स्पष्ट होते. अनेक भारतीय विद्वानांच्या मते पणि लोकांनीच श्रमण संस्कृतीचे संरक्षण केले आहे. ही श्रमण संस्कृती म्हणजेच जैन तत्वज्ञान असे प्रतिपादन आर.जैन यांनी 'द ग्रेट पणि प्युपल' या आपल्या ग्रंथात केले आहे. आज आपण पाहिले तर जैन समाज हा प्रामुख्याने एक व्यापारी म्हणजे वणिक समाज असलेला दिसतो. जैनांचे 'अहिंसा परमोधर्म:' हे तत्त्व पणि लोकांकडून रुढ झाले असावे अथवा पणि लोकांच्या तत्त्वज्ञान विषयक जाणिवा जैन तत्त्वज्ञानात विकसित झाल्या असाव्यात. अहिंसेला महत्व म्हणजे बलीप्रथेला विरोध. म्हणजेच यज्ञविधीला विरोध. पणि अयाज्ञिक अर्थात यज्ञविरोधी होते. जैन-बौद्ध या सुधारणावादी तत्त्वज्ञानांनी अहिंसेला महत्व दिले. यामध्ये पणि लोकांची विचारधाराच सामावलेली असावी. म्हणजेच प्राग्वैदिक अनार्य विचारधाराच सुधारणावादात परिवर्तित झालेली दिसते. भारतात आलेल्या आर्यांची भूमिका दोन प्रकारची होती। पहिली म्हणजे मूलनिवासी लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या उपयुक्त विचारांचा स्वीकार करायचा. दुसरी म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव करायचा आणि त्यांच्यावर आपली विचारधारा लादायची. आर्य-अनार्य संघर्षातून दोन संस्कृती व दोन प्रमुख सामाजिक भेद निर्माण झाले. आर्यांशी संघर्ष करणारा अनार्य समाज अधिक सुसंस्कृत असल्याने त्यांचा पराभव होणे अपरिहार्य होते. हरप्पा-मोहोजेंदरोपासून प्रजासत्ताक किंवा गणराज्य पद्धती या समाजात अस्तित्वात होती. प्राग्वैदिक काळापासून आर्यांशी संघर्ष करणारा व पराभूत होत गेलेल्या,या समाजाने स्वतःच्या टोळया निर्माण केल्या. पुढे त्यांची जमातीजमातींची छोटी छोटी राज्ये तयार होऊ लागली. पुढे त्यांचे पर्यवसान गणराज्यांत व जानपदांत होऊ लागले. त्यावेळची जानपदे म्हणजे उत्तर भारताचे प्रांतच होत. असे प्रतिपादन डॉ.आर.के.मुखर्जी यांनी आपल्या 'हिंदू सिव्हिलायझेशन' ग्रंथात केलेले आहे. ज्यावेळी या जानपदांतून राजघराणी रूढ होऊ लागली. पुढे पुढे आर्य राजांच्या माध्यमातून साम्राज्यवादी राज्यव्यवस्था स्वामित्व गाजवू लागली. परंतु या जानपदांतील प्रजा मूलतः मोठया संख्येने आर्येतर प्रजाच होती. पाणिनीने आपल्या ग्रंथांत बावीस जानपदांचा उल्लेख केला आहे. ती सर्व नर्मदेच्या उत्तरेकडीलच आहेत. बुद्ध-महावीर गणराज्यांच्या राजघराण्यातील होते,हे देखील लक्षात घ्यावे लागते. श्री.एस.बी.चौधरी यांनी आपल्या 'ऐथनिक सेटलमेंट इन अॅन्शेटं इंडिया' या ग्रंथात वैदिक महाकाव्ये,जैन व बौद्ध साहित्याच्या संशोधनातून,कौशल राज्याचे उदाहरण दिले आहे. कौशल हे राज्य हल्लीच्या बिहार व ओरिसा राज्यांचा भाग मिळून महाकोशल राज्य होते. या महाकोशल राज्यावर रामाचे आधिपत्य होते. पुढे त्याचे दुसरे नांव दक्षिण कोशल प्रचलीत झाले. ओरिसा राज्याचा पूर्व किनारा आणि महानदीच्या दक्षिण किना-यावरील प्रदेश मिळून तोसल प्रांत या नावाने ओळखला जात होता. या तोसल प्रांताची प्रजा आर्येतर कलिंग जातीची होती. वैदिक वाङ्मयात कलिंग लोकांचा उल्लेख अशुद्ध किंवा अपवित्र अशा अर्थाने करण्यात आला आहे. कलिंग देशाची हद्द उत्तरेकडे बिहारच्या दिक्षण टोकापर्यंत व दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या तटांपर्यंत पसरलेली होती. असे प्रतिपादन केले आहे. नाग,पणि,कलिंग अशा आर्येतर जमातींमध्ये संस्कृती म्हणून द्रविडीयन संस्कृतीच रूजलेली होती. आत्मविषयक अथवा आत्मवादी अवैदिक तत्त्वज्ञानाचा प्रवाह या जमातींमध्ये होता. अशा विविध आर्येतर जमातींचे छोटे-छोटे प्रवाह एकत्र होऊन आत्मवादी तत्त्वज्ञानाचा मुख्य प्रवाह प्राग्वैदिक काळापासून दृढमूल झालेला होता. त्यामधूनच संस्थात्मक धर्म म्हणून जैन व बौद्ध निर्माण झाले. आणखी काही आर्येतर जमातींचा समावेश जैन व बौद्ध धर्मपरंपरेत असलेला दिसतो. त्यांचा संक्षिप्त इतिहास पाहणे देखील महत्वाचे आणि उद्बोधक ठरते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment