शापितांची संजीवनी


 सन १६१० साली एक जहाज जेम्स नदीकिनारी वसलेल्या जेम्स टाऊनला पोहचले. अशी भयान,विराण आणि निर्मनुष्य वस्ती म्हणजेच जेम्स टाऊन आहे. यावर जहाजातील इंग्रंज प्रवाशांचा विश्वास बसत नव्हता. वस्तीत उभे असलेले चर्च त्यांना दिसले. चर्चचा घंटानाद करावा,जेणे करुन येथे कोणी जिवंत माणूस असल्यास तो आपल्या पर्यंत येईल. अशा विचारातून त्यांनी चर्च बेल वाजवण्यास सुरवात केली. ब-याच वेळानंतर काही भयग्रस्त चेहरे चर्चच्या प्रांगणात नजरेने अंदाज बांधत प्रकट झाले. अर्धनग्न व भूकेने व्याकूळ ६० जेम्स टाऊनवासीयांनी आपल्या देशबांधवानां ओळखले. जेम्स टाऊनच्या नरकयातनांमधून सुटकेचा किरण दिसताच. त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळले. अनेक दिवसांच्या उपासमारीने अर्धमेले झालेल्या या लोकांच्या पायात एक नवीन बळ संचारले. त्यांनी आपल्या देशबांधवांकडे धाव घेतली. त्यांची हकिकत ऐकून नव्याने जेम्स टाऊनमध्ये प्रवेश केलेले त्यांचे देशबांधव सुन्न झाले. जॉन स्मिथच्या अथक प्रयासामुळे जेम्स टाऊनने बाळसे धरले होते. स्थानिक जमातींशी सौहादर्यपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याने जीवाचे भय संपले आणि अन्नाचीही भ्रांत कमी झाली. शेतीचे तंत्र अवगत करत, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न ते करत होते. जेम्स टाऊन आता स्थिरावू  आणि विस्तारू लागले. इंग्लंडहून त्यांचे आणखी ६०० देशबांधव जेम्स टाऊनला पोहचले. त्यांनी आपल्यासोबत भरपूर रसद आणली होती. त्यांना ही घटना अत्यानंद देणारी असली,तरी स्थानिक जमातींना मात्र ही धोक्याची घंटा वाटली. इंग्रंजाचा वाढता पसारा पाहून या जमातींच्या मनात संशय निर्माण होऊ लागला.। स्वतःच्या अस्तित्वाच्या भयाने चिंताग्रस्त झालेल्या स्थानिक जमाती व इंग्रजांचे संबंध बिघडण्यास सुरवात झाली. किरकोळ कुरबुरींपासून सुरवात होऊन लढाईपर्यंत हे वैर पोहचले. अशा नाजूक काळात आणखी एक र्दुदैवी घटना घडली. जेम्स टाऊनचा नेता आणि स्थानिक जमातींना जोडून ठेवणारा दुवा जॉन स्मिथ गंभीर जखमी झाला. बंदुकीची दारू हाताळाताना झालेल्या स्फोटात ब-याच प्रमाणात भाजलेल्या स्मिथला नाइलाजास्तव इलाजासाठी इंग्लडला परतावे लागले. जॉन स्मिथ इंग्लडला गेला आणि जेम्स टाऊन पुन्हा एकदा शापित झाले. सुयोग्य संघटन करणारा आणि समन्वय साधणारा नेता नसल्याने,हे लोक म्हणजे पशुंचा भरकटलेला कळपच झाला. आपापसातील भांडणे,मारामा-या,खून,बलात्कार इत्यादी सर्व प्रकारांमुळे त्यांच्यातील अनेक जण मारले गेले. काही लोक अज्ञात ठिकाणी पळून गेले,तर काही स्थानिक जमातींमध्ये जाऊन राहिले. वसाहतीचे सर्व नियोजन कोसलळले. वसाहतीमध्ये शिल्लक राहिलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली. दिवसोंदिवस परिस्थिती अत्यंत भयाण होत गेली. १६०९ पर्यंत जेम्स टाऊनचा नरक झाला. अन्न-धान्य संपलेले होते. भूक भागविण्यासाठी हे लोक दुभत्या जनावरांकडे वळले. पाळीव प्राणी शिल्लक होते. काही दिवसात तेही संपले. अखेर भूक भागविण्यासाठी हे लोक अत्यंत अधम पातळीवर पोहचले. त्यांनी आपल्या मृत सहका-यांचे मांस देखील खाल्ले. खाण्यासाठी त्यांना जामडयाचे बूटही कमी पडले.  आपली कर्मकहाणी नव्याने आलेल्या देशबांधवांना सांगून हे अर्धनग्न-भूकबळी लोक,त्यांच्याकडे आपल्या सुटकेची याचना करू लागले. सोन्याच्या शोधात आलेले हे लोक  जगातील सर्वात मौल्यवान सोन्याला पारखे झाले होते. हे सोन म्हणजे काळया आईच्या कुशीतून उगवणारे अन्न. अन्नासोबतच मातृभूमीच्या ओढ त्यांना अस्वस्थ करत होती. अमेरिकेच्या भूमीवर भोगाव्या लागलेल्या नरकयातनांनी खचलेले लोक नवागतांना ऐनकेन प्रकारे आपल्या मायदेशी नेण्याची करुण याचना करु लागले. हे शोकनाटय सुरू असतांनाच,जेम्सच्या प्रवाहातून तीन जहाजांचा ताफा जेम्स टाऊनच्या दिशेने येतांना दिसला. लॉर्ड डी.लावर इंग्लंडवरून नवे वसाहतवादी,भरपूर अन्न आणि रसद घेऊन जेम्स टाऊनला पोहचला. त्याचे आगमन जेम्स टाऊनला नवसंजीवनी देणारे ठरले. जगण्याची आशा सोडलेल्या साठ लोकांच्या शुष्क मनाला नवी पालवी फुटली. जगण्याची एक नवी उमेद त्यांना मिळाली. भविष्यात एका नव्या राष्ट्राची नांदी ठरणारी ही वसाहत समूळ नष्ट होण्यापासून वाचली. अद्भूत अशी ही घटना जेम्स टाऊनलाच नव्हे,तर जन्माला येणा-या अमेरिकेसाठी तारणहार ठरली. लॉर्ड डी.लावरच्या आगमनाने जेम्स टाऊनचीच नव्याने उभारणी होणार नव्हती,तर भविष्यातील एका महाशक्तीची मजबूत पायाभरणी होणार होती. लॉर्ड डी. लावर जेम्स टाऊनला आला,हा योगायोग नव्हता. जेम्स टाऊनची वाताहत सुरू असतांना इंग्लंडमध्ये घडत असलेल्या घडामोडींची पार्श्वभूमी लावरच्या आगमनला कारणीभूत होती. इंग्लंडचा सम्राट जेम्स प्रथम याने संयुक्त स्टॉ कंपनीला १६०९ मध्ये एक नवे आज्ञापत्र(चार्टर) प्रदान केले. नव्या आज्ञापत्रानुसार कंपनीला पॅसिपीक महासागराच्या किना-यापर्यतचा प्रदेश वसाहती स्थापन करण्यासाठी देण्यात आला. तसेच स्थापन होणा-या  वसाहतींच्या कारभारात सुसुत्रता येण्यासाठी कंपनीला गर्व्हनर नियुक्त करण्याचे अधिकार देखील मिळाले. गर्व्हनरच्या नियुक्तीमुळे वसाहतींना प्रशासकीय व्यवस्था प्राप्त होणार होती. केवळ सोन्याच्या शोध किंवा व्यापार अशा उद्देश्यांनी या नव्या भूमीवर येणा-या लोकांना तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे नियम अथवा कायदे नव्हते. यामुळे अर्निबंध झुंड असेच प्रारंभी येणा-या लोकांचे वर्णन होऊ शकते. नव्या आज्ञापत्रामुळे व्याने वसणा-या वसाहतींमध्ये कायदा व सुव्यवस्था स्थापन होणार होती. आज्ञापत्रानुसार संयुक्त स्टॉ कंपनीकडून  लॉर्ड डी. लावर याची गर्व्हनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याला सल्ला देण्यासाठी काउंसिलर्सचीही नियुक्ती करण्यात आली. नव्या भूमीचा पहिला गर्व्हनर म्हणून लॉर्ड डी.लावर तीन जहाजांचा ताफा घेऊन जेम्स टाऊनला पोहचला. ज्याप्रमाणे हया भूभागावर वस्ती करणे सहज नव्हते,तसेच कायदा व सुव्यवस्था स्थापन करणे ही सोपे नव्हते. असे असले तरी हे पहिले प्रशासकीय पाऊल भावी व्यवस्थेची सुरवात होती. व्हर्जिनियाचा पहिला गर्व्हनर लॉर्ड डी. लावर काही दिवसातच इंग्लंडला परतला. यानंतर १६१८ पर्यंत इथला कारभार उप-गर्व्हनरांच्या माध्यमातूनच चालत होता. डी.लावर जेम्स टाऊन आणि परिसरात अत्यंत अल्पकाळ राहिला मात्र त्याच्यासोबत आलेल्या दोन व्यक्तींनी अमेरिकेची भावी वाटचाल निश्चित केली. एकाने प्रशासकीय अंगाने इंग्लंडच्या वसाहतींना शासन व सुव्यवस्था दिली. तो होता सर्वात कार्यक्षम उपगर्व्हनर डेल. दुस-याने व्हर्जिनियाच्या भूमीवर तंबाखूच्या शेतीची रुजवात केली. ज्या तंबाखूच्या व्यापाराने अमेरिकेच्या समृद्धीचा राजमार्ग मोकळा केला. तो होता जॉन राल्फ वुल्फ. या दोघांचे जीवनकार्य इंग्लंडसाठी व भावी राष्ट्र अमेरिकेसाठी गौरवास्पद असले,तरी एक मानव म्हणून अमानवीच होते. जगाच्या इतिहासातील एक अत्यंत अमानुष अध्याय या दोघांच्या कारकीर्दीपासून  लिहिण्यास सुरवात होणार होती. 

    प्रा.डॉ.राहुल हांडे,                        भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !