श्रमण परंपरेचा चिरंतन प्रवाह


भारतीय संस्कृती अतिप्राचीन काळापासून आदान-प्रदानाची संस्कृती असलेली दिसते. विविध वंश,संस्कृती व धर्मपरंपरा यांचे अभिरसरण म्हणजे आजची भारतीय संस्कृती. बौद्ध-जैन या परंपरा अनार्य व अवैदिक तर आहेतच, मात्र प्राग्वैदिक काळातील द्रविड व इतर मूलनिवासी समाजाशी नाते सांगणा-या आहेत. द्रविड,नाग,मुंडा शबर,ठाकूर,निषाद इत्यादी अनार्य समाजांशी आर्यांचा संघर्ष व समन्वय हा अतिशय गुंतागुंतीचा इतिहास आहे. जैन धर्मातील आचार्यांनी सदैव आपण अनार्य असून क्षत्रिय आहोत हे सांगितलेले दिसते. तसेच आपल्या धर्मपरंपरेचे अस्तित्व प्राग्वैदिक काळापासून असल्याचा दावा केला. बौद्ध-जैन धर्मपंरपरांमधील पुनर्जन्म,कर्मवाद आणि मुक्तीचा प्रयत्न या अहिंसावादाच्या द्योतक आहेत. त्याचप्रमाणे आर्यांच्या यज्ञप्रधान तत्त्वज्ञानाशी या तीन गोष्टी जुळणा-या देखील नाहीत. उत्तर वैदिक काळात यज्ञविरोधी क्षत्रियतत्त्वज्ञानाचा विकास होऊ लागला. तेंव्हा आर्यांनी ही तत्त्वे आपल्या धर्मात पण गोवली असावीत,असे काही अभ्यासकांचे मत आहे. अवतारवादाची संकल्पना आर्यांकडून बौद्ध-जैन या सुधारणावादी तत्त्वज्ञानात आली असावी. अवतारी पुरुषाची ( बुद्ध अथवा तीर्थंकर) अनुवांशिक श्रेष्ठता सिद्ध करण्याची रूढी आर्यांकडून बौद्ध व जैनांकडे आली आणि त्यातूनच जन्मविषयक अद्भूत कथांची निर्मिती झाली. हडप्पा-मोहेंजोदरोची अतिसमृद्ध संस्कृती निर्माण करणारे द्रविड हे देखील भारताच्या भूमीवर खूप आधी आले होते. संस्कृतीचा उगम न झालेल्या येथील स्थानिक जमातींशी त्यांनी समन्वय साधला. यातून भारताच्या संपन्न संस्कृतीचा जन्म व विकास होत गेला. त्यामूळे द्रविडांना या भूमीचे मूलनिवासी म्हणून ओळखले गेले. एका अतिशय समृद्ध संस्कृतीच्या निर्माणानंतर आर्य भारतात आले. आर्य भ्रमण करणारे होते,परंतु युयुत्सु जीवनदृष्टीमुळे ते संस्कृती संग्राहक देखील होते. भारतात भ्रमण करतांना या भटक्या टोळयांनी निरनिराळे राहणीमान  व प्रथांचा स्वीकार केला. हा काळ प्राग्वैदिक व पूर्व वैदिक असावा. कारण आत्मवादी तत्त्वज्ञानाचे उगमस्थान असलेल्या पूर्व भारतात किंवा गंगेच्या पूर्व खो-यात आर्यांच्या काही गोष्टींचा स्वीकार करण्यात आला होता. जैन-बौद्ध धर्माचे मूलस्त्रोत असणा-या क्षत्रियांकडूनही आर्यांच्या काही गोष्टीं स्वीकारण्यात आल्या. याचा अर्थ आर्यांचा भारतात येण्याचा कालखंड दोन संस्कृतीच्या सहज आदान-प्रदानाचा काळ असावा. नवीन आलेल्या या लोकांची संस्कृती अप्रगत असली तरी द्रविडनिर्मित संस्कृतीने त्यांच्याकडूनही काही तरी स्वीकारलेच असणार. हा प्रारंभीचा काळ होता. यानंतर मात्र संघर्षाला सुरवात झाली. भविष्यात या संघर्षाचा इतिहास शस्त्रांनी लिहिला गेला आणि लेखनीने बदलवला गेला. सुरवातीच्या काळात वैदिक धर्म अनुयायीसुद्धा क्षत्रियांकडून जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि धर्मोपदेश ऐकण्यास येत असत. प्राचीन भारतीय साहित्यातून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. आत्मविद्येचे हे तत्त्वज्ञान गंगेच्या पूर्व खो-यात पसरलेले होते. रामायणातील अत्यंत प्रभावी राजा विदेह हा ज्या जनक कुलातील होता,ते कुल क्षत्रिय होते आणि सीता देखील याच कुलातील होती. अर्थववेदात व्रात्यखंड नावाचे प्रकरण आहे. यामध्ये व्रात्य म्हणजे तपोनिष्ठ ब्राह्मणेतर विद्वान असा होतो. हा व्रात्य वैदिक देवतांपेक्षा श्रेष्ठ असून,त्याने जगांतील चार देश निस्तेज करून टाकले होते व त्याच्या श्वासोच्छवासातून नवीन जग निर्माण झाले होते. अशी कथा आलेली आहे. या कथेच्या माध्यमातून आर्येतर व्यक्तीचे श्रेष्ठत्व मान्य केलेले आहे. अशा आर्येतर व्रात्यांमधूनच क्षत्रिय जातीचा उगम झालेला दिसतो. आर्येतर क्षत्रियांनी वेदविरोधी तत्त्वज्ञानाची पायाभरणी केली. यातूनच पुढे बौद्ध-जैन या नवमतवादी तत्त्वज्ञाने आकारास आली. आपण जैन धर्माचा जेंव्हा विचार करतो,तेंव्हा जैन परंपरेचे प्राचीन नाव श्रमण आहे. श्रमण संस्कृती प्राग्वैदिक होती. तैतरिय अरण्यक व भागवतात सुद्धा श्रमणांचा उल्लेख असलेला दिसतो. मुख्यतः मुनि हा शब्द जरी वैदिक साहित्यात ऋषी शब्दाचा पर्यायवाची मानला गेला असला तरी मुख्यतः तो जैन श्रमणासाठी वापरला जाणारा शब्द आहे. एका गोष्टीवर अनेक अभ्यासकांचे एकमत दिसते की वेदांच्या ऋचा रचल्या जात असतानांच वेदविरोधी विचारधारा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होती. ब-याच जैन तत्त्वांचा ओझरता उल्लेख वेदांमध्ये सांपडतो. त्याबरोबरच ऋग्वेदात मुनींना 'आर्हण' संज्ञा होती आणि अर्थववेदांत ती 'अर्हत' संज्ञा झाली. हाच शब्द जैन धर्मोपदेशकांची जाणीव करून देणारा आहे. जैनांनी जो अरिहंत शब्द वापरला आहे तो याच अर्हत शब्दाचे रुपांतर असावे. जैन धर्माचे एक श्रेष्ठ नेते आणि संस्कृतचे प्रकांड पंडित जैनमुनी आचार्य तुलसी यांनी चार पुराणांचा सखोल अभ्यास करून असुर लोकांचा इतिहास स्पष्ट केला आहे. त्यांच्या संशोधनानुसार असुर लोक हे केवळ आर्येतर अवैदिक देवविरोधी नेते नव्हते तरे ते जैन धर्माचे आचार्य होते. मोहेंजोदरो उत्खननात सापडलेल्या अनेक मुद्रांवर योगासन मुद्रेतील प्रतिमा दिसतात. या प्रतिमा जैनांनीच काढलेल्या आहेत. यामुळे जैन हे मुख्यतः प्राग्वैदिक भारताचे मूळचे रहिवासी असून त्यांची कला हिंदूनी स्वीकारली. आचार्य तुलसी यांच्या विवेचनाला एच.टी.कोलेब्रुक या जैन धर्माच्या पाश्चात्य अभ्यासकांनी केलेली मांडणी पूरक ठरते. कोलेब्रुक यांच्या मते इ.स.पूर्व तिस-या शतकातील ग्रीक लेखकांनी भारतीय तत्त्वज्ञांची दोन गटात विभागणी केली आहे. त्यानुसार एक श्रमण व दुसरे ब्राहमण(वैदिक). या दोन गटांमध्ये अत्यंत टोकाचे मतभेद असल्याने या दोन स्वतंत्र जाती मानल्या जात. याठिकाणी जात शब्दाचा ग्रीकांनी भाषिक व अनुवांशिक अंगाने घेतला होता. असे असले तरी वैदिक व जैन या दोहोंमध्ये तीव्र मतभेद होते आणि त्याचे पर्यवसन दोन स्वतंत्र जाती (समाज) मानण्यापर्यंत झाले ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. यावरुन इ.स.पूर्व तिस-या शतकातील जैन लोक हे देखील आर्येतर समाजातील होते. असा ही अन्वयार्थ सांगता येतो. अशा विविध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे अनेक विद्वान जैन आचार्य आणि देशी-परदेश अभ्यासकांनी जैन धर्ममताचे  प्राग्वैदिक काळापासून असलेले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.नतालिया गुसेवा या रशियन विदुषीने आपल्या संशोधनातून जैन धर्माचा प्रारंभ इ.स.पूर्व सहाव्या सातव्या शतकातला नसून ही धर्मपंरपरा प्राग्वैदिक असल्याचा दावा केलेला दिसतो. 'द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया' ग्रंथाच्या चौथ्या खंडात जैन परंपरेचे प्राग्वैदिकत्व अनेक संशोधकांनी साधार सिद्ध व मान्य केलेले आहे. तसेच जैनांचे प्राचिनत्व खोडून काढलेले नाही. उलट ते मान्य झालेले आहे. असे प्रतिपादन करण्यात आले आहे. हे सर्व विवेचन आपण बौद्ध धर्मासंदर्भात देखील विचारात घेणे आवश्यक ठरते. बौद्ध व जैन हे दोन्ही प्राग्वैदिक काळापासून चालत आलेल्या आर्येतर व अवैदिक श्रमण तत्त्वज्ञानाच्या मुख्य प्रवाहातून इ.स.सहाव्या-सातव्या शतकात विलग झालेले दोन प्रवाह आहेत. असाही निष्कर्ष काढता येतो. यासंदर्भात भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांचे समकालिनत्व हा निकष समोर ठेवावा लागतो. बुद्धांपेक्षा वयाने सुमारे पंचवीस वर्ष ज्येष्ठ असलेले महावीर परमेश्वराचे अस्तित्व नाकारतात. मानवी आत्म्याला परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान करण्याचा विश्वास व्यक्त करतात. ही क्रांती होती. त्यांच्यानंतर लगेचच बुद्ध परमेश्वरच नव्हे तर आत्मा हे तत्त्व देखील नाकारतात. ही संपूर्ण क्रांती ठरते. अधिक सखोल शोध घेतल्यास एक अत्यंत महत्वाचे सूत्र या दोघांच्या जीवनकार्यात शोधता येते. वैदिक संस्कृतीला क्षत्रियांनी आव्हान  दिले होते. यामागे प्राग्वैदिक काळापासून भारताच्या भूमीत रुजलेली द्रविड व स्थानिक जमातींच्या समन्वयातून निर्माण झालेली वैभवशाली संस्कृती होती. वैदिक काळात तिची पिछेहाट झाली,मात्र अनार्यांच्या मनात ती सुप्तावस्थेत कायम होती. उत्तर वैदिक काळात यज्ञयागादी कर्मकाडांच्या अवाजवी स्तोमाने आणि काही विघातक प्रवृत्तींमुळे वैदिक परंपरा मोडकळीस आली. अशावेळी महावीर व बुद्धांच्या रुपाने सुप्तावस्थेत असलेला अनार्यांच्या मनातील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या दोन्ही महापुरूषांनी धर्मचक्र पुन्हा आत्मवादाच्या दिशेने वळवले. आकाशातील वा स्वर्गस्थ देवतांपेक्षा मातीवरच्या माणसाला महत्व दिले. माणसातच परमेश्वर होण्याचा दुर्दम्य आशावाद निर्माण केला. मानवी जीवनातील चिरंतन दुःखातून सुटकेचा मार्ग मानवातच दडलेला होता. त्याला प्रकाशमान केले. अन्य कोणत्याही प्रकाश स्त्रोताची मानवाला आवश्यकता नाही. त्याच्या आयुष्याला उजळवणारा दीप त्याच्या अंतरातच आहे. विशुद्ध विचार व आचार यांनी तो प्रज्वलित केल्यास माणूस स्वतःच प्रकाशाचा स्त्रोत होऊ शकतो. अशी ग्वाही त्यांनी दिली. क्षत्रियांपासून प्रारंभ झालेल्या तत्त्वज्ञान व जीवन पद्धतीला धर्माचे कोंदण दिले. इतिहासाने आपले वर्तुळ पूर्ण केले. पुन्हा एकवार क्षत्रियांनीच आपल्या आत्मवादी श्रमण परंपरेचा जयघोष केला.   
  प्रा.डॉ.राहुल हांडे,                                      भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !