मूलनिवासींचे कालजयी हुंकार 'बुद्ध –महावीर'

प्राग्वैदिक काळापासून जैन-बौद्ध धर्माची विचारधारा भारतीय मातीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असलेली दिसते. जैन-बौद्ध धर्मपरंपरांची पाळमुळं आर्यांच्या आगमनापूर्वी भारतीय उपखंडात रूजलेली होती. सर्वसामान्य माणूस भगवान बुद्ध अथवा भगवान महावीर यांच्यापासून या दोन्ही धर्मांचा उगम झाला,असेच मानतो. मात्र बौद्ध असो वा जैन हे केवळ धर्म नाहीत. हे अत्यंत प्राचीन,समृद्ध आणि संपन्न अशा एकाच संस्कृतीच्या समांतर धारा आहेत. त्यांचा उगम शोधण्यासाठी आपल्याला बुद्धांच्या आणि महावीरांच्या खूप मागे जावे लागते. यासाठी सर्वप्रथम बौद्ध व जैन यांच्यातील दृष्य भेद काही काळ बाजूला ठेवावे लागतात. बुद्ध व महावीर हे समकालीन असल्याने त्यांचे तत्त्वज्ञान व जीवनदृष्टी यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्यासाठी अनुयायांमध्ये स्पर्धा लागली होती. या दोन्ही महापुरुषांमध्ये ही स्पर्धा नव्हती. हे दोघेही सगळयाच्या पल्याड पोहचले होते. इतिहासाच्या क्रूर जात्यात भरडल्या गेलेल्या भारतीय मातीच्या मूलनिवासी समाजाचे प्रचंड सामर्थ्यशील हुंकार म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवान महावीर. या समाजाचे सर्वांगिण कल्याण बुद्धांनी बोधीसत्वाच्या आणि महावीरांनी कैवल्याज्ञानाच्या प्राप्तीनंतर महत्वाचे मानले. भवसागरातून एकटयानी तरून जाण्याचा स्वार्थ त्यांनी ठेवला नाही. त्यांना गवसलेल्या जीवनसत्याच्या तरफेवर त्यांनी सर्व मानव जातीला तारून नेण्याचे औदार्य दाखवले. म्हणूनच ते ज्ञानप्राप्तीनंतर समाजविन्मुख न होता,समाजाभिमुख झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या अनुयायांनी केलेल्या चढाओढीने व दुहीने,मात्र मूलनिवासी भारतीय समाजाची अतोनात हानी झाली. याचे मूल्य बौद्ध व जैन धर्मांनांच भविष्यात चूकवावे लागले. बौद्ध धर्म या मातीतून नष्ट झाला होता आणि जैन धर्म अल्पसंख्याक होऊन राहिला. बुद्ध व महावीर यांच्यापूर्व व पश्च्यात या दुहीनेच मूलनिवासी भारतीयांना हजारो वर्ष सामाजिक-सांस्कृतिक गुलामीत जगावे लागले आहे. एखाद्या भूमीत इतिहासाच्या कालकमात विविध मानवी समूह येणे आणि स्थिरावणे हे अपरिहार्य असते. त्यांचे येणे कधी सहज व रक्तहीन असते,तर कधी आक्रमक व रक्तरंजीत असते. सहज-रक्तहीन सामाजिक सहजीवनातून दोन संस्कृती एकरूप होतात आणि अधिक समृद्ध संस्कृतीचे निर्माण होते. आक्रमक व रक्तरंजीत सामाजिक संघर्षातून पराभूतांची संस्कृती नष्ट केली जाते अथवा भ्रष्ट केली जाते. भारतीय उपखंडाने आजवर हे अनेकदा अनुभवलेले आहे. जैन व बौद्ध धर्मपरंपरांचा शोध घेण्यासाठी आपल्याला द्रविड वंश या भूमीवर आला, तेथून प्रारंभ करावा लागतो. राहुल सांस्कृत्यान यांच्यासारख्या विद्वानांनी द्रविड देखील स्थलांतरीत आहेत,हे मान्य केले आहे. मात्र ते आर्यांच्या खूप-खूप आधी आले होते. त्यावेळेस भारताच्या भूमीवर काही मानव समाज वास करतच होते. हे मानवी समाज अत्यंत आदिम वा बाल्यावस्थेत होते. जुनाट आणि नवीन अशा दोन्ही दगडी हत्यारांचा वापर हे लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि स्वरक्षणासाठी करत. द्रविड एक वेगळी संस्कृती घेऊन येथे आले. द्रविडांची ही संस्कृती सिंधू किंवा मेसोपोटामिया यांच्यापूर्ती मर्यादित नव्हती,तर उत्तरेत मध्य-आशियात विस्तारलेली होती. भारताच्या भूमीवर आदिम अवस्थेत रहिवास करणा-या मानवी समाजांशी समन्वय साधत,द्रविडांनी संस्कृतीची पायभरणी केली. एवढेच नव्हे तर तिला विस्तारीत व समृद्ध केले. संस्कृतीचा विकास न झालेल्या आदिम जमातींना संस्कृतीच्या प्रवाहात आणणे हे अत्यंत मोठे कार्य होते. अशा समन्वयातून निर्माण झालेल्या एका महान संस्कृतीची साक्ष आपल्याला हडप्पा-मोहंदोजडोच्या रूपात अनुभवता येते. पाच हजार वर्षांच्याही पूर्वी अस्तित्वात असलेल्या,या ताम्र युगातील संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्या सिंधूच्या खो-यातच नव्हे,तर गंगेच्या दुवाबात ही सापडतील. असा कयास काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ईसवी सन पूर्व दुस-या सहस्त्रकात एक पशुपालन करणारी भटकी जमात,म्हणून आर्यांचा प्रवेश भारतात झाला. द्रविड संस्कृतींशी आर्यांचा परिचय ते सिंधू खो-यात पोहचण्यापूर्वीच मध्य आशियाच्या वक्षु व सिर या नदयांच्या खो-यात झालेला होता. पहिला द्रविड-आर्य संघर्ष येथेच घडला. यामुळे द्रविड संस्कृतीचे दोन भाग झाले. यातील काही भाग उत्तरेत रशियाकडे विस्थापीत झाला. दक्षिणेकडे द्रविड आधिपासूनच होते. पहिल्या संघर्षातच आर्य द्रविडांच्या संस्कृतीने प्रभावीत झाले. भारतात आल्यावर ते द्रविडांच्या अत्यंत विकसित व समृद्ध संस्कृतीच्या प्रभावाखाली आले. ईसवी सन २००० वर्षांपूर्वी सिंधू खो-यात आलेले आर्य,कालांतराने गंगा-यमुना खो-यांच्या उत्तर भागापर्यत पोहचले. येथवर पोहचेपर्यंत त्यांनी आपली लोकसत्ताक समाज पद्धती टिकवेलेली होती. मात्र गंगाजलाचा स्पर्श होताच,ही पद्धती नष्ट झाली आणि राजेशाही वा सामंतशाही प्रस्थापित झाली. आर्य आता द्रविड संस्कृतीच्या सामाजिक जीवनपद्धतीशी अनभिज्ञ झाले होते. गंगा खो-यात किंवा कुरू-पांचाल वंशांच्या राजवटीत आर्यांच्या जून्या देवता व प्रथा यांच्याशी निगडीत असलेल्या वैदिक कर्मकांडांच्या चरमोत्कर्षाचा हा काळ होता. कर्मकांडांचा अतिरेक आणि त्यांच्या माध्यमातून होत असलेले सामाजिक शोषण यांच्या विरुद्ध बौद्धिक स्तरावर विरोध प्रारंभ झाला होता. जे वैदिक कर्मकांड करत होते,ते त्याच्या मौलिकतेविषयी साशंक  बनले. तर जे याचा विरोधात होते,ते बाहेरून प्रहार करत होते. अशा परिस्थितीत समाजाला याच व्यवस्थेत  गुंतवूण ठेवणारे नवीन काही तरी देणे ही काळाची गरज झाली. पांचाल राज प्रवाहण जयवलीसारख्या विचारवंत वैदिक धर्माच्या मोडकळीस आलेल्या चौकटीस आधार देण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी आत्मा व परब्रहम या संकल्पनांची निर्मिती केली. प्रवाहणचा शिष्य उद्दालक आरूणी याने ब्रहमज्ञानाला मानवाच्या पर्यटनासंदर्भातील स्वाभाविक रूचीला जोडले. यातून प्रव्रज्या ज्यालाच दिशा किंवा संन्यास ही सर्वसाधारणपणे संबोधले जाते,हा प्रकार निर्माण झाला. त्यामुळे असंख्य ब्रहमज्ञानी परिव्राजक देशात फिरून आपल्या विचारांचा प्रसार-प्रचार करू लागले. ताम्र युगातील द्रविडांनी सिंधू खो-यात निर्माण केलेली समृद्ध संस्कृती व भटके जीवन जगणा-या आर्यांची अविकसित संस्कृती यांचे मिश्रण होईपर्यंत आणि वैदिक कर्मकांडांच्या मार्गे परिव्राजकांच्या काळ येईपर्यंत सुमारे अडिच हजार वर्षे लोटली. याकाळात विभिन्न जमातींच्या संपर्कातून भारताच्या भूमीत एक संमिश्र संस्कृती आकाराला आली. प्राग्वैदिक काळ आणि ईसवी सनाचे सहावे शतक (बुद्ध-महावीरांचा काळ) यांच्यामध्ये वैदिक काळ येतो. बुद्ध-महावीरांनी प्रतिपादित केलेले धर्म प्राग्वैदिक काळाशी नाते असणारे आहेत. म्हणजेच सिंधूच्या खो-यात द्रविडांनी निर्माण केलेल्या अतिशय समृद्ध संस्कृतीत या धर्मांची पाळमुळं खोलवर गेलेली आहेत. भारतीय उपखंडात द्रविड-आर्य संघर्षाच्या इतिहासाकडे पाहणारे संशोधक-अभ्यासकांचे विविध पक्ष आहेत. मात्र बौद्ध असो वा जैन यांनी कायम स्वतःला अनार्य-अवैदिकच मानले आहे. यासाठी अनेक सप्रमाण दाखले देखील सादर करण्यात आले. प्राग्वैदिक प्राचीन भारतीय विचार परंपरा पाळणारे लोक बलीविधानांचे विरोधी होते. प्राग्वैदिक काळात देवतांसाठी पशु बळी देण्याची पद्धत नव्हती. आर्यांमध्ये यज्ञात बळी देण्याची पद्धत ते भारतात येण्यापूर्वीच रूढ होती. काही अभ्यासक म्हणतात आर्य केवळ पशुबळीच देत नव्हते, तर आर्येतर पुरुषांचा नरबळी सुद्धा देत असत. पालीभाषेतील एका ग्रंथात पुरुषमेध करण्याचा उल्लेख आलेला आहे. महाभारतात नाग,राक्षस,असुर असा ज्यांचा उल्लेख आहेत,हे खरोखरचे नाग किंवा अधम प्रवृत्तीचे नाहीत. तर या आर्येतर जमाती आहेत. असुर अथवा अखुर हा शब्द केवळ ऋग्वेदातच नाही,तर पारशी धर्माच्या अवेस्ता ग्रंथातही सापडतो. पर्शिया वा आजच्या ईराणमध्ये अत्रि वंशांचे लोक होते आणि झरतुष्ट्र हे पारशी धर्मसंस्थापक याच वंशांचे होते. असुरांचा देश म्हणजे असेरिया असाही संदर्भ दिला जातो. नाग,राक्षस,असुर,मुंडा,गोंड, निषाद,भिल्ल,गुह,शबर,ठाकूर अशा विविध जमातींशी जैन-बौद्ध धर्मांचे अनुबंध लक्षात घेण्यासाठी विविध धार्मिक ग्रंथात आलेल्या कथांचा अन्वयार्थ लक्षात घ्यावा लागतो. आर्येतर व आर्यविरोधी असलेल्या या जमातींना निष्प्रभ करण्याचे काम या कथांनी केले आहे. एक खूप मोठया संघर्षाचा इतिहास या कथांच्या माध्यमातून दडपण्यात आला. आधुनिक काळात अनेक अभ्यासकांनी प्राग्वैदिक काळ आणि बौद्ध-जैन धर्मांची उत्पत्ती यातील दुवा शोधण्यासाठी आणि द्रविड-आर्य संघर्ष,आर्य-आर्येतर संघर्ष यांचे वास्तव उकलण्यासाठी अशा कथांचा सखोल शोध घेतला. त्यांचा अन्वयार्थ नव्याने सप्रमाण सादर केला. इसवी सन पूर्व सहाव्या शताकात भारतात जैन असो वा बौद्ध हे धर्म निर्माण होतात. हा निव्वळ योगायोग नव्हता. एका प्रदीर्घ वांशिक संघर्षाची,सामाजिक-धार्मिक शोषणाची,घडविण्यात आलेल्या एका अतिशय विकसित-समृद्ध संस्कृतीच्या विनाशाची पार्श्वभूमी यामागे होती. भगवान बुद्ध व भगवान महावीर यांनी धर्मस्थापनेतून हजारो वर्षांच्या घुसमटीला मूर्त रूप दिले. यासाठीच बुद्ध-महावीर हे भारताच्या मातीखाली हजारो वर्ष खदखदणा-या विद्रोहाचे कालजयी हुंकार होते. 
  प्रा.डॉ.राहुल हांडे,                                      भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      



Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !