अमेरिकेच्या पायातील भांडवलशाही...
इंग्लंडमध्ये एलिझाबेथ प्रथम सारख्या कर्तृत्त्वान महाराणीच्या निधनानं,एका पर्वाचा अंत झाला. स्टुअर्ट घराण्याकडे राजसत्ता आल्यानंतर काही काळ यादवी व हुकुमशाहीचा अनुभव इंग्लंडने घेतला. स्टुअर्ट घराण्याचा पहिला राजा जेम्स प्रथम सत्तारूढ झाला. तोपर्यंत अमेरिकन भूमीवर इंग्रंज नावाला देखील नव्हते. एलिझाबेथच्या काळात इंग्लंडची नावीक शक्ती प्रचंड वाढली होती. असे असले तरी,समुद्रावर छापे मारणे आणि जहाजांची लूट करून संपत्ती प्राप्त करणे. एवढाच हेतू राजसत्तेने महत्वाचा मानला होता. हॉकिन्स,ड्रेक आणि रॅले सारखे एलिझाबेथचे आवडते लोक स्पॅनिश जहांजाना लूटने किंवा नीग्रो गुलामांचा व्यापार याच्यात संतुष्ट होते. त्यांच्यामध्ये साहस व शौर्य यांची कमी होती,असे मुळीच नाही;परंतु अपर्याप्त साधनांमुळे त्यांना असे करण्याशिवाय पर्याय नव्हता. एलिझाबेथने त्यांना प्रोत्साहन दिले. महाराणी म्हणून तिचे हे कृत्य बेकायदेशीर व अमानवी होते. हे मान्य केले, तरी संपत्तीची निर्मिती आणि त्यातून नावीक शक्ती प्रबळ करण्यासाठी दुसरा पर्याय इंग्लंडकडे उपलब्ध नव्हता. तसेच त्याशिवाय स्पेनच्या समुद्री महासत्तेला आव्हान देणे अशक्य होते. एलिझाबेथच्या काळात इंग्लंडने आपली नावीक शक्ती वाढवली आणि स्पॅनिश जहाजांचा मोठा ताफा नष्ट केला. यामुळे एकमेव समुद्री महासत्ता ही स्पेनची ओळख पुसल्या गेली. महासागर आणि त्यांच्यावरील सागरी मार्ग इंग्लंडसाठी खुले झाले. एलिझाबेथच्या काळातील ही कमाई इंग्लंडच्या भविष्याच्या आणि अमेरिकेच्या निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली. सन १६०३ मध्ये इंग्लंडच्या राजगादीवर आरूढ झालेला. स्टुअर्ट घरण्याचा जेम्स प्रथम हा राजकीय बुद्धीबळाच्या पटावरचा अपयशी राजा. अशी इतिहासात नोंद आहे. मात्र अमेरिकेच्या निर्मितीचा प्रारंभ करण्याचे श्रेय त्यालाच जाते. अमेरिकेत वसाहती स्थापन करण्याची सुरवात त्याच्या काळात झाली. तसेच वसाहतींच्या संख्या देखील त्याच्या काळातच वाढली. सरकारी आणि खाजगी गुंतवणुकीतून अमेरिकेतील वसाहती स्थापन्याचे धोरण जेम्स प्रथम याने स्वीकारले. सरकार किंवा राजसत्तेला हे स्वबळावर करणे शक्य नाही. हे उमगल्यानंतर भांडवलदारांना सोबत घेण्यात आले. त्यांच्या भांडवली गुंतवणुकीतून नव्याने शोध लागलेल्या भूमीवर वसाहत स्थापन करण्याच्या धोरणाचा अंगीकार करण्यात आला. त्यानुसार सन १६०६ मध्ये सम्राट जेम्सने एका संयुक्त स्टॉक कंपनी(Joint Stock Company) ला एक आज्ञापत्र किंवा चार्टर प्रदान करण्यात आले. आज्ञापत्र प्राप्त केलेल्या संयुक्त स्टॉक कंपनी म्हणजे कोलॅबरेशन कंपनी होती. लंडन कंपनी व प्लिमथ कंपनी अशा दोन भांडवल गुंतंवणुक करणा-या कंपन्यांचे हे कोलॅबरेशन होते. प्लिमथ हे इंग्लंडमधील एक प्रसिद्ध बंदर आणि शहर आहे. त्या शहरातील प्लिमथ कंपनी होती. इंग्लंडमधील उमराव-सरदार,व्यापारी,साहसी दर्यावदी आणि मोठे शेतकरी अथवा मळे मालक(Planter) अशा लोकांच्या भागीदारीतून जेम्स प्रथमने या कंपन्या उभारल्या होत्या. उत्तर अमेरिका भूखंडाची विभागणी या दोन कंपन्या मध्ये करण्यात आली. ३४ व ४१ समांतर अक्षवृत्ताच्या मधल्या भागात लंडन कंपनीने आणि ३४ व ३५ अक्षवृत्ताच्या मधल्या भागात प्लिमथ कंपनीने वसाहती स्थापन कराव्यात. असा करार करण्यात आला. यामध्ये एक महत्वाची अट अशी होती की,दोन्ही कंपन्यांच्या वसाहतींमध्ये किमान १०० मैलांचे अंतर असावे. तसेच प्रत्येक कंपनी ५० मैल लांब आणि १०० मैल रुंद वसाहत स्थापन करू शकत होती. या सर्व घटनांचा व धोरणांचा अन्वयार्थ लावणे अत्यंत आवश्यक आहे. युरोपातील स्पेन,पोर्तुगाल,ईटली,डेन्मार्क,फ्रांस अशा देशांनी अमेरिका खंडच नव्हे,तर जगभरात अशा वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. एकेकाळी इंग्लंड या स्पर्धेत कुठेच नव्हता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र सुनियोजित धोरण आणि भांडवलशाहीचा योग्य वापर यांच्या जोरावर त्याने देदीप्यमान यश संपादन केले. सतराव्या शतकापासून ते एकोणवीसाव्या शतकापर्यंत जगाचा इतिहास हा याच इंग्लंडच्या भोवती फिरलेला दिसतो. ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता. अशी कर्तबगारी इंग्रजांनी दाखवली. खरे पाहिले तर असे राजकीय व व्यापारी यश इतिहासात कोणत्याच देशाला मिळवता आले नाही. आज त्यांच्या यशाचे अत्यंत ढोबळ उदाहरण दयावयाचे झाल्यास, इंग्रजी आज जगाची संज्ञापन भाषा आहे आणि सारे जग आज ग्रेगोरियन म्हणजेच ख्रिश्चन कॅलेंडरवर चालते. इंग्रजांच्या यशात त्यांचा द्रष्टेपणा,चाणाक्षपणा आणि व्यापारी वृत्ती यांचे योगदान महत्वाचे होते. अमेरिकेसारख्या अज्ञात भूभागवर जातांना. म्हणजे १६०३ साली एवढे नियोजन आणि भांडवलदारी काटेकोरपणा दाखवणारा इंग्लंड जगावर राज्य न करता तर नवलच. त्याकाळात व्यापारीपेढया व पतसंस्था या संकल्पनांसंदर्भात त्यांच्या कल्पना आणि कार्यपद्धती किती स्पष्ट होत्या. ही गोष्ट नजरेआड करून चालत नाही. 'रोम एका दिवसात निर्माण झाले नाही', अशी एक म्हण जगात प्रसिद्ध आहे. असेच इंग्लंडच्या यशाबाबत म्हणता येते. एका नगराच्या निर्मितीला प्रदीर्घ कालखंड जावा लागतो. तर एका देशाच्या निर्मितीला केवढा काळ मोजावा लागेल,याचा आपण अंदाज करू शकतो. यामुळे आज आपण ज्या महासत्तेला संयुक्त राज्य अमेरिका(युनाईटेड स्टेट ऑफ अमेरिका) असे संबोधतो,त्याच्या प्राथमिक निर्माण प्रक्रियेतच सुमारे पावने दोनशे वर्षांचा कालखंड जावा लागला. इ.स.१६०० ते १७०० या कालखंडात प्रामुख्याने इंग्लंड आणि अल्प प्रमाणात इतर युरोपिअन देश यांमधील सुमारे ७५००० हजार लोक या पूर्णपणे अज्ञात भूमीवर उज्ज्वल भविष्याच्या शोधात आले. सन १६०७ मध्ये या स्थलांतराला सुरवात झाली. सम्राट जेम्स प्रथम याने दिलेल्या आज्ञापत्रानुसार लंडन कंपनीने त्यावर्षीच्या ग्रीष्म ऋतूत अमेरिका भूखंडावर आपली पहिली वसाहत स्थापन करण्याची योजना आखली. त्यानुसार १४३ प्रवाशांचा एक छोटा समूह व्हर्जिनीया नदीच्या विस्तिर्ण तटावर पोहचला आणि तेथून पुढे जेम्स नदीच्या किना-याकडे गेला. जेम्स नदीच्या किना-यावर त्यांनी आपली वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी वसाहतीची उभारणी सुरू केली. अमेरिकेच्या धरतीवर उभारण्यात आलेल्या या वसाहतीला सम्राट जेम्स प्रथम याच्या नावावरून जेम्स टाऊन असे नाव देण्यात आले. तसेच ज्या नदीच्या काठावर ही वसाहत उभी राहिली तिला जेम्स नदी संबोधण्यात आले. जेम्स टाऊन या वसाहतीच्या रूपाने अमेरिकेसारख्या एका वैभवशाील राष्ट्राच्या उभारणीची कुदळच जणू मारण्यात आली. हे १४३ लोक ख-या अर्थाने आजच्या अमेरिकेच्या पायाचे दगड म्हणावे लागतील. इंग्लंडने व्हॅटिकनशी बंड करून आपल्या स्वतंत्र चर्चची (धर्मसंघ) स्थापना केली होती. या चर्चचे अनुयायी असणारे हे लोक होते. जेम्स टाऊनच्या स्थापनेनंतर प्रोटेस्टंट आणि ख्रिश्चन धर्मातील विविध पंथांचे लोक देखील आले. तसे पाहिले तर त्यांना येथे येऊन राहण्याचा त्यांना कसलाही अधिकार नव्हता. यामध्ये काही कॅथोलीक ही होते. जेम्स टाऊनच्या सरकारी कर्मचा-यांनी यासंदर्भात कोणताही आक्षेप घेतला नाही. ते या लोकांसंदर्भात उदासिन अथवा उदारच राहिले. कदाचित अमेरिकेत स्थायिक होण्याबाबत उदारवादी धोरणाचा प्रारंभ येथेच झाला असावा. यामुळेच आज जगातील सर्व देशांमधील लोक अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यांचा देश कोणताही असो ते अमेरिकन आहेत. वर्तमानात हा उदारमतवाद बाजूला सारू पाहणा-या अपरिपक्व राजकीय विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रवृत्तींनी यामधून तेथे सत्ता संपादन करण्यात यश देखील संपादन केलेले दिसते. अशा अपरिपक्व नेतृत्वामुळे अमेरिकेच्या जगातील एकमेव महासत्ता म्हणून असलेल्या स्थानाला चायनासारखा देश आव्हान देतांना दिसतोय. मात्र प्रत्येक देशाचा एक पिंड असतो. काही काळ त्या देशाला भ्रमित करणा-या अथवा भरकटवणा-या अतिरेकी व अपरिपक्व शक्ती सत्ता संपादनात यशस्वी होतात. याचा अर्थ ही स्थिती कायमच राहते असे नाही. भरकटण्याची चूकवावी लागलेली किंमत लक्षात आल्यानंतर,तो देश पुन्हा आपल्य मुळ पिंडाकडे वळतो. त्यात विशुद्ध भांडवलदारीच्या पायावरच उभा राहिलेला अमेरिकेसारखा देश,तरी अधिक काळ अशा प्रवृत्तींच्या मागे जाणे शक्य नाही. असे त्याच्या आजवरच्या इतिहासावरून म्हणता येते. अखेर एखाद्या राष्ट्राचा विनाशच जवळ आला असेल,तर इतिहासाधारित अशा भाकितांनाही अर्थ नसतो. हेही त्रिकालाबाधीत सत्य नाकारता येत नाही.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment