ऋजुवालुकेच्या तीरावरचा सूर्योदय
इसवी सन सहाशे
वर्षांपूर्वीची मगध देशातील मध्यमपावा नगरी एक धार्मिक केंद्र म्हणून प्रख्यात
होती. संस्कृती व वैदिक पंडित यांचे तर ते एक तीर्थस्थळच झाले होते. अशा मध्यमपावा
नगरात सोमिल नामक एक धनाढय ब्राहमण राहत होता. त्याने एका विशाल महायज्ञाचे आयोजन
केले. हा महायज्ञ केवळ मगध देशातच नव्हे,
तर संपूर्ण उत्तर भारतात चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरला होता.
उत्तर भारतातील सर्व वैदिकांना अशा महायज्ञात सहभागी होण्याचा मोह अनावर झाला
होता. मोठ-मोठया नगरांपासून छोटया-छोटया खेडयांपर्यंत महायज्ञज्ञाची
वार्ता पोहचली. हजारोंच्या संख्येने स्त्रीपुरुष
या महायज्ञाच्या पवित्र यज्ञज्वालेचे दर्शन घेण्यासाठी मध्यमपावेच्या दिशेन
निघाले. पूर्व भारतातील अकारा दिग्गज विद्वान आपल्या ४४०० शिष्यांसह या महायज्ञात
सहभागी झाले होते. यावरून
सामान्यजन किती प्रमाणात तेथे उपस्थित असतील,याची कल्पना आपण येवू शकते. महायज्ञाच्या
अनुभूतीत बुडालेल्या श्रद्धाळूंचे भाग्य जोरावर
होते. पवित्र यज्ञज्वालेसह त्यांना ऋजुवालुका
नदीच्या तीरावर उदय पावलेल्या त्रिकालजयी ज्ञानसूर्याचे दर्शन व मार्गदर्शन
लाभणार होते. हे त्यांचे चिरतंन असे
मंगल भाग्याच म्हणावे लागेल. वैशाख शुद्ध
एकादशीची मंगलमय प्रभात. स्वातंत्र्य व समता यांच्या सोनेरी किरणांची उधळण करीत
मध्यमपावेच्या महासेन उद्यानात ज्ञानसूर्य भगवान महावीरांचे आगमन झाले. त्यांच्या
आगमनाची वार्ता यज्ञज्वालेप्रमाणे मध्यमपावेत पसरली. त्यांच्या उग्र साधनेची
प्रसिद्धी एव्हाना समस्त मगधात झालेली होती. यामुळे महायज्ञासाठी संमिलीत
झालेला जनसमुदाय त्यांच्या दर्शनासाठी महासेन उद्यानाकडे धावत होता. जनसामन्यांना
महावीरांच्या दर्शनाची ओढ लागली आणि महायज्ञासाठी उपस्थित वैदिक पंडितांच्या मनात
तेढ निर्माण झाली. महायज्ञाचे प्रमुख सूत्रधार इंद्रभूती गौतम यांच्याशी इतर
पंडितांनी विचारविनिमय केला. जनांचा एवढा प्रचंड प्रवाह ज्याच्याकडे सहज प्रवाहित
होत आहे. असा हा महावीर साधनाबल व तपोबल यांच्यात आपल्याला सरस असला,तरी
ज्ञानाच्या संदर्भात उणाच असेल. असा विश्वास या पंडितांना होता. धार्मिक व सामाजिक
शोषणामुळे विकृत झालेल्या,वैदिक संस्कृतीला वर्धमान महावीरांच्या रूपाने
प्रचंड मोठे आव्हान दिले जाणार. याची खात्री एव्हाना या पंडितांना झाली होती.
त्यामुळे साधनाबल,तपोबल,प्रतिभा व व्युत्पन्नता यांनी युक्त महावीरांचे
व्यक्तित्व वेळीच दडपणे आवश्यक होते. अन्यथा जुनाट व बुरसटलेली वैदिक संस्कृती या
वादळात टिकाव धरू शकणार नाही. इंद्रभूती गौतम यांच्या
नेतृत्वात महावीरांना धर्मपरिषदेत आव्हान देण्याची योजना आखण्यात आली. जनांचा अलोट
प्रवाहाचे स्नेह संपादित करत महावीर धर्मपरिषदेच्या स्थानाकडे जाऊ लागले.
ज्ञानसंपन्नता व अभिजातता यांचा अंहकार घेऊन इंद्रभूती गौतम त्यांना सामोरे गेले. 'इंद्रभूती
गौतम ! आलात तुम्ही ?' अशा अपार स्नेहपूर्ण व मंत्रमुग्ध वाणीत
महावीरांनी त्यांचे स्वागत केले. पहिल्याच क्षणी आपल्या व्यक्तिमत्वाने आणि वाणीने
समोरच्याशी सहृध्यतेचे अनुबंध निर्माण करणा-या महावीरांसमोर
इंद्रभूतींच्या मनातील सर्व विरोध गळून पडला. कोणालाही मैत्र जीवाचा करण्याचे
आकर्षण व सामर्थ्य महावीरांमध्ये होते. महावीरांसमोर इंद्रभूती गौतम गोंधळले.
त्याक्षणी '
इंद्रभूती ! आपण महान विद्वान असूनही जीवाच्या सत्तेच्या
बाबतीत तुमच्या मनात संदेह आहे ?' या महावीरांच्या विधानाने,त्यांच्या
मनातील सुप्त संदेहाचा नेमका वेध घेतला. आपल्या मनातील हा संदेह इंद्रभूती आजवर
कोणासमोरच व्यक्त करू शकले नव्हते.
त्यांच्या मनातील संदेहाला महावीरांनी अतिशय सहजतेने वाचा फोडली
होती. महावीरांच्या सर्वज्ञतेची प्रचीती त्यांना आली. तेवढयात इंद्रभतींना
उद्देशून महावीर म्हणाले,' जीवाच्या अस्तित्वाबद्दल संदेह व्यक्त
करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावरच संदेह व्यक्त करण्यासारखे आहे. प्रत्येकाच्या हृदयात
असलेला मी म्हणजे अंह या तत्वाचा बोध म्हणजेच जीवाच्या सत्तेचा बोध. जीवसत्तेचा
बोध म्हणजेच आत्मतत्वाचा बोध होय. आत्मा हा इंद्रियांनी जाणवणारा नाही. तो
इंद्रियांच्या पलिकडचा म्हणजे अतीन्द्रिय आहे. इंद्रियांनी
त्याचे आकलन करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. अशा अतीन्द्रिय
आत्म्याचा ज्ञानाने अनुभव घ्या. तुम्हांस त्याच्या स्पष्ट व थेट अनुभव येईल..' भगवान
महावीरांच्या पहिल्याच वचनाने इंद्रभूतींसह उपस्थित सर्वांच्या मनावरील भ्रमाची
सर्व आवरणे गळून पडली. ज्ञानाचे अमरपिपासू व सत्याचे सबलजिज्ञासू इंद्रभूती गौतम
भगवान महावीरांना शरण गेले. त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्कारले आणि महावीरांच्या
धर्माची दिक्षा घेतली. ही वार्ता त्यांचे धाकटे बंधू अग्निभूती यांच्या कानावर
गेल्यावर,ते आपल्या ५०० शिष्यांसह महावीरांना शरण आले. इंद्रभूतींचे
सर्वात कनिष्ठ बंधू वायूभूती यांनी महावीरांना अखेरचे आव्हान देण्याचा प्रयत्न
केला. कारण त्यांचे दोन सेनापती आधीच गारद झाले होते. वायूभूती जेंव्हा महावीरांना
सामोरे गेले तेंव्हा, 'हजारो
ग्रंथ अवलोकन करून आणि पारायण करून
ही आपण जीव व शरीर एक आहेत की भिन्न ? या द्वंद्वातच आपण अडकला आहात.' असे
महावीरांनी म्हणताच वायूभूतींचे अवसान गळाले. महावीरांनी त्यांच्या मनातील संदेहाचाही
नेमका वेध घेतला होता. वायूभूतींच्या मनात सर्वज्ञ महावीरांसमोर
संपूर्ण
शरणागतीशिवाय कोणताच विचार निर्माण होऊ शकला नाही. पहिल्याच धर्मपरिषदेत एकावेळी
अकरा दिग्गज ब्राहमण विद्वान व त्यांच्या चार हजार चारशे शिष्यांनी भगवान
महावीरांकडे प्रव्रज्या स्वीकारीली,ही घटना अद्भूतच मानावी लागेल. यज्ञयाग,कर्मकांड
यांना विरोध आणि स्त्री-शुद्रांना समानाधिकारांचा पुरस्कार करणा-या महावीरांना
ब्राहमण वर्गाचा विरोध होणे स्वाभावीक होते. मात्र महावीरांनी आपल्या
धर्मप्रसाराचा सर्वात पहिला केंद्रबिंदू म्हणून त्याचीच निवड केली. यामुळे
मध्यमपावेची धर्मपरिषद मोडकळीस आलेल्या वैदिक धर्माच्या चौकटीला प्रचंड हादरा
देणारी ठरली. भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी एकाच काळात केलेली ही धर्मक्रांती
भारताच्या
इतिहासाचा प्रवाह पूर्णपणे बदलण्यास कारणीभूत ठरली. महारवीरांनी ईश्वर संकल्पनेला
आव्हान देत,तेथे आत्म्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्यापेक्षा वयानी
काही वर्षे लहान असणा-या बुद्धांनी त्यांच्याही पुढे जाऊन,आत्म्यालाही नाकारले आणि मानवी जीवनातील
दुःख निवारणाला महत्व दिले. यामुळेच भारतात आत्मवादी धर्मांचा आणि त्यांच्या
तत्वज्ञानाचा एक प्रचंड प्रबल प्रवाह निर्माण झाला. समता,स्वांतत्र्य आणि बंधूता यांचा
भारतभूमीवरील पहिला उद्घोष म्हणजे भगवान बुद्ध व भगवान महावीर. ईश्वर संकल्पनेच्या
नावाखाली सर्वसामान्य जनांचे होणारे सर्वांगिण शोषणाचा नायनाट, हे
या दोन्ही महापुरुषांच्या तत्वज्ञानाचे सार व ध्येय होते. महावीर असो वा बुद्ध या
दोघांचा साधनाकाल हा केवळ वैयक्तिक आत्मोन्नतीसाठी केलेला प्रयत्न नव्हता. अखिल
समाजाचे कल्याण व शोषणविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम
सत्याचा शोध घेतला आणि नंतर त्याचा बोध समाजाला करून
दिला. महावीरांच्या बारा वर्षाच्या म्हणजेच एका तपाच्या साधानाकाळात त्यांनी ईश्वराची
जागा आपला आत्माच घेऊ शकतो. अज्ञान,अन्याय,अपरिग्रह,हिंसा इत्यादींनी मुक्त झालेला आणि ज्ञान,न्याय,क्षमा,सहिष्णुता,स्थितप्रज्ञता,सत्य,प्रेम,अहिंसा,भूतदया
इत्यादींनी युक्त झालेला आत्मा म्हणजेच ईश्वर. हे सत्य त्यांना उमगले. हेच ते
कैवल्यज्ञान. यासाठी त्यांनी प्रथम स्वचा अत्यंत कठोर
व परखड शोध घेतला. त्याचप्रमाणे समाज व्यवस्थेचाही अत्यंत नेमका व
सूक्ष्म शोध घेतला. यामुळेच त्यांच्या पूर्वीच्या तेवीस तीर्थंकरांच्या तुलनेत
महावीरांचे जीवन अधिक कष्टमय,पीडामय व तपःप्रधान ठरले. त्यांच्या काळात
सभोवतालची अंदाधुंद,क्रुर व दारूण
परिस्थिती यांना ते बुद्धांप्रमाणेच सामोरे गेले. समाजाच्या दारूण
भीषणतेवर चिरंतन उपाय शोधण्यासाठी हे दोन्ही महापुरुष
समाजाचे सखोल अवलोकन करत होते. आपल्याला प्राप्त होणारे ज्ञान
हे केवळ आपले नसून, ते सर्व समाजासाठी असणार आहे. असा
निग्रहच त्यांनी केलेला होता. भगवान महावीरांनी मध्यमपावाच्या धर्मपरिषदेत आपल्या
साडेबारा वर्षांचा एकांत व मौन यांचा त्याग केला. आता त्यांना समाजाशी संवाद
साधायचा होता. त्यांना प्राप्त झालेल्या सत्याला समाजात रूजवायचे
होते आणि त्याला बोलके करायचे होते. यामुळेच मध्यमपावाची धर्मपरिषद ही जैन
धर्माच्या तत्त्वज्ञानाची व संस्थात्मक धर्म म्हणून उभारणीची नांदी ठरली. येथून
महावीरांनी समाजसाधनेचे व्रतच अंगीकारले असे म्हणावे लागते. कैवल्यज्ञानाची
प्राप्ती झाल्यानंतर समाजासमोर आलेल्या महावीरांना आपल्या पहिल्याच उपदेशात
विद्वान वैदिक पंडितांनी स्वीकारले. हे अत्यंत मोठे यश होते. वैदिक पंडित महावीरांना
शरण आले. याचा सर्वसामान्य लोकांवर मोठा प्रभाव पडणे साहाजिक होते. पूर्वीच्या
धर्माच्या काही धुरीणांनी नव्या धर्माचा पहिल्याच परिचयात स्वीकार करणे. ही गोष्ट
असामान्य व विशेषच म्हणावी लागेल. मध्यमपावेच्या धर्मपरिषदेनंतर भगवान महावीरांचा
जीवन प्रवास म्हणजे धर्म म्हणून जैन तत्त्वज्ञानाची उभारणीचा अथक संघर्ष ठरला.
प्रा.डॉ.राहुल
हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
खरा धर्म काय आहे? याचा विचार करायला लावणारा अतिशय चिंतनशील लेख. मन:पूर्वक अभिनंदन राहुल.
ReplyDelete