अमेरिकन भूमी बळकावण्याची स्पर्धा...



कोलंबसाने  भारतीय उपखंडाकडे जाण्याच्या समुद्री मार्गाचा शोध लावण्याच्या नादात,आशिया-युरोप यांच्यासाठी पूर्णपणे अज्ञात अशा भूखंडाकडे जाण्याचा मार्ग शोधला. त्यालाच भारत समजून त्याने आणखी तीनदा या भूमीला भेट दिली. पंधराव्या शतकाच्या अस्तकाळात कोलंबसाच्या माध्यमातून काही स्थायी स्वरूपाच्या स्पनिश वसाहती या भूमीवर स्थापन झाल्या. कोलंबसानंतर युरोपातील अनेक दर्यावदींनी या भूमीच्या वेगवेगळया भागाचे दर्शन घेतले. त्यांच्या सरींनंतर कोलंबस ज्या भूमीला भारत संबोधत होता,ती भारताची भूमी नाही हे त्यांना उमगले. हा आपल्याला पूर्णपणे अज्ञात असा भूखंड आहे,याची जाणीव पक्की झाली. हाच युरोपिअन देशांमध्ये हया भूखंडावरील अधिकाधिक भूमी बळकवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेचा आरंभबिंदू ठरला. कच्चा माल,खनिज संपत्ती,व्यापारवृद्धी इत्यादी कारणांनी ही स्पर्धा अत्यंत तीव्र होत गेली. हे पंधराव्या शतकाचे अखेरचे दशक होते.  स्पेन,पोर्तुगाल,फ्रांस,इटली या देशांनी अमेरिका खंडाला पादाक्रांत करण्यात आघाडी घेतली. याकाळात इंग्लंड मात्र या स्पर्धेत खूप मागे होता. याला कारण तत्कालिन इंग्लंडची राजसत्ता. मात्र याचवेळी इंग्लंडची राजकीय परिस्थिती देखील बदलली. टयुडोर घराणे इंग्लंडच्या राजगादीवर स्थानापन्न झाले. टयुडोर घराण्याचा पहिला राजा हेन्री सातवा हा अत्यंत कर्तबगार निघाला. व्यापार-उदिम यांचे महत्व आणि त्यासाठी आवश्यक नाविक सामर्थ्य याचे महत्व त्यानं ओळखले. त्याने राज्यकारभार हाती घेतला,तेंव्हा इंग्लंडचे आरमार अत्यंत प्राथमिक अवस्थेत होते. कोलंबसाने शोधलेल्या भूमीत असलेली समृद्धीची बीजं त्यानी हेरली. नव्या भूमीवर इंग्लंडचा देखील हक्क असावा,असा विचार त्यानं केला. आपल्या अशक्त नाविक साधन-संपत्तीच्या मर्यादा माहित असूनही, त्यानं हे आव्हान स्वीकारलं. इटलीतील  जिनोव्हाचा रहिवासी असलेल्या एका साहसी व संशोधक वृत्तीच्या  दर्यावर्दीचे साहय या कामी घेण्याचे त्याने ठरवले. तो म्हणजे जॉनॉबेट. हेन्रीने त्याच्याशी करार केला. त्यानुसार १४९८ मध्ये जॉनॉबेट आणि त्याची दोन मुलं यांनी अमेरिकेच्या दोन  री केल्या. ब्रिस्टल या  इंग्लंडच्या नैऋर्त्य भागात एव्हन नदीच्या व अटलांटिक महासागराच्या किना-यावर वसलेल्या शहरापासून त्यांनी आपल्या सरींचा प्रारंभ केला होता. जॉनॉबेट या दोन्ही सरींमध्ये उत्तर अमेरिकेच्या भूभागावर पोहचला. लबराडोर ते व्हर्जिनिया हा किनारी प्रदेश त्याने पिंजून काढला कॉबेटचे उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पोहचणे,ही घटना  अमेरिकेच्या इतिहासातात अत्यंत महत्वाची आहे. उत्तर अमेरिका खंडात जॉनॉबेट हा पहिला युरोपिअन होता. युरोपातील इतर दर्यावर्दी तोपर्यंत प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडाकडे पोहचलेले होते. कॉबेटच्या या दोन मोहिमाच, आजच्या अमेरिकेचा राष्ट्र म्हणून झालेल्या प्रवासाचा आरंभबिंदू ठरला. कॉबेटच्या मोहिमांनंतर इंग्लंडची या भूखंडासंदर्भातील भावी योजना तात्काळ अंमलात येऊ शकली नाही. याला कारण त्यांची दुबळी नाविक शक्ती होती. कॉबेटच्या मोहिमांचा युरोपला झालेला,तात्काळ लाभ म्हणजे न्यू फाउंडलचा शोध. मासेमारीसाठी अत्यंत समृद्ध असे हे क्षेत्र युरोपाला कॉबेटमुळे गवसले. ज्याचा लाभ पंधराव्या शतकापासून इंग्लड,फ्रांस, स्पेन व पोर्तुगाल यांना मोठया प्रमाणात घेता आला. अमेरिकन सागरी मोहिमांमध्ये इंग्लंड काही काळ मागे पडला होता. त्याकाळात स्पेन,फ्रांस, स्वीडन,डेन्मार्क,पोर्तुगाल हे देश यामध्ये आघाडीवर होते. या सगळया युरोपिअन देशातील दर्यावर्दी नव्या भूखंडावर पोहचत होते. नव्या भूखंडाच्या भूभागावर जो आधी पोहचला,त्याने तेथे वसाहत स्थापन करुन तो भूभाग आपल्या राजाच्या नावावर करुन घेतला. 'पळा पळा कोण पुढे पळे तो' अशीच ही स्पर्धा होती. जो जितका धावत होता,तेवढया भूमीचा तो धनी होत होता. पोर्तुगालचा पेड्रो अत्वारिस कब्रेल दक्षिण अमेरिकेच्या ज्या भूभागावर पोहचला, तो ब्राझील म्हणून ओळखला गेला. बोलबोवा हा स्पेनचा दर्यावर्दी, तर प्रशांत महासागर पार करुन अमेरिकेच्या पश्चिम किना-यावर पोहचला. त्याने तो भाग स्पेनच्या राजाच्या नावावर झाल्याचे घोषित केले. अमेरिकन भूखंडाची अशी स्वयंघोषित वाटणी होत होती. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडाच्या भूमीवर आज अस्तित्वात असणा-या प्रत्येक भागाचा व देशाचा असा रंजक इतिहास सांगता येतो. आपल्याला आज उत्तर अमेरिकेतील जो भूभाग अमेरिका वा यु.एस. वा यु.एस.ए. म्हणून ओळखला जातो. त्याचा इतिहास पाहावयाचा असल्याने, अमेरिका खंडातील इतर देशांचा इतिहास पहाणे विस्तारभयास्तव शक्य नाही. आज युरोपिअन लोकांनी अमेरिका खंडावर पोहचणे,तेथे वसाहती स्थापन करणे आणि स्वतःसाठी नवीन देशांची निर्मिती करणे या इतिहासाचा अनेकांनी आपल्या परीने अन्वयार्थ लावलेला दिसतो. युरोपातील लोकांसाठी कोलंबसासारखे सर्व दर्यावदी आणि युरोपिअन वसाहतींची अमेरिकेत स्थापना करणारे सर्व कर्तबगार लोक हिरो ठरले.  अमेरिका खंड काबीज करणे हे ज्यांना जमले नाही,त्यांनी अमेरिकेत गेलेल्या युरोपिअन लोकांना  संपूर्णपणे  खलनायक म्हणून रंगविण्यात धन्यता मानली. इतिहासकारानं तटस्थ असावे,हा आदर्श इतिहासकाराचा प्रधान दंडक मानला जातो. प्रत्यक्षात काही सन्मान्य अपवाद वगळता इतिहासाच्या बाबतीत हे घडणे दुर्मिळच. जेत्यांचा वा विजेत्यांचा इतिहास काळा करण्यात,जीतांना अथवा पराभूतांना नेहमी अथांग समाधान-शांती यांची प्राप्ती होत असते. इतिहासात एखादा जेता ठरला,तर त्याच्याकडे देखील काही गुणं असतील हे एकांगी इतिहासकार मान्य करायला तयारच नसतात. आपल्या पराभूत समाजाच्या भावना-संवेदना गोंजारण्यातच अशा इतिहासकारांचा स्वार्थ दडलेला असतो. खरे तर इतिहासकारांनी विजेत्यांचे गुण आणि पराभूतांचे दुर्गुण परखडपणे स्पष्ट करणे अपेक्षित असते. हे पराभूत समाजाच्या भावी वाटचालीसाठी अत्यंत आवश्यक ठरते. इतिहास लेखनात व सादरीकरणात नेहमी वर्तमानाची परिमाणं महत्वाची ठरतात.  इतिहासकारानं असे केले, तर त्याला वर्तमान भौतिक सुखसमृद्धीचा लाभ मिळत नाही. तसेच वर्तमानकालिन राजकारण्यांना त्यांची पोळी भाजता येत नाही. त्यामुळेच काही सन्मान्य अपवाद वगळता वर्तमानाला अनुकुल असेच इतिहास लेखन व सादरीकरण होत असते. अमेरिकेचा इतिहास पाहतांना युरोपिअन गो-यांची अमिट काळी बाजू कदापि  नाकारता येत नाही. मात्र त्यांचे असामान्य गुण  नाकारणे देखील न्यायसंगत ठरत नाही. आज जगातील एकमेव महाशक्ती म्हणून दिमाखाने मिरविणारी अमेरिका आपल्या दिसते. पंधराव्या शतकात अशा अज्ञात भूमीवर महासागर पार करून पोहचण्याचे या लोकांचे साहस व धैर्यही जाणून घेतले पाहिजे. त्याकाळातील सागरी प्रवास अत्यंत खडतर होता. इंग्लड म्हणा वा युरोप म्हणा यांच्यापासून अमेरिका खंड किमान तीन हजार सागरी मैल अंतरावर. त्याकाळातील शिडाची छोटी-छोटी जहाजे दिवसाला पाच मैल अंतर कापणारी. ते सुद्धा सागरी प्रवाहांनी त्यांना पुढे जाण्याऐवजी मागे ढकलले नाही तर.  जहाजाच्या साधारण ७५ फूट लांब व ५ फूट उंच अशा अंधा-या जागेत महिनोंमहिने काढणे शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक. ज्या भूमीच्या शोधासाठी निघालो आहोत,तिची दिशा माहित नाही,मार्ग माहित नाही. अथांग महासागरावर प्रवास करतांना वादळांमध्ये शिडाच्या छोटी जहाजांचा निभाव लागेल की नाही, याची खात्री नाही. जगण्याची आणि जगलोच तर भूमीचे दर्शन होण्याची कोणतीच आशा नाही. ज्या भूमीवर पोहचणार तिच्या भौगोलिक-नैसर्गिक परिस्थितीची काहीच कल्पना नाही. अशा संपूर्ण प्रतिकुल अवस्थेत हे लोक अमेरिका खंडावर पोहचले. तेथे पोहचल्यावरचा त्यांचा तेथे स्थायिक होण्याचा इतिहास बघणे देखील तेवढेच प्रेरणादायक व रंजक आहे.  

प्रा.डॉ.राहुल हांडे,                       भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

      (लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

 

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !