वर्धमान ते भगवान महावीर
वर्धमान ते भगवान महावीर...
वर्धमान महावीरांच्या पाठशालेय जीवनापर्यतची माहिती जैन साहित्यात आढळते. शालेय जीवन ते यौवनापर्यतचा त्यांचा जीवनप्रवास तसा अनभिज्ञच म्हणता येतो. जैन साहित्यात प्रस्तुत कालखंडाचे संदर्भ उपलब्ध नाही. तसेच महावीरांच्या चरित्रकारांनी देखील या कालखंडासंदर्भात कपोलकल्पित घटना नव्यानेच निर्माण करून,त्याला इतिहास ठरविण्याचा प्रयत्न केलेला नाही. वास्तवाची प्रामाणिकता त्यांनी अत्यंत कसोशीने पाळली आहे. विवाहयोग्य युवावस्थेपासून महावीरांच्या जीवनाचा प्रवास मात्र जैन साहित्यात व महावीरांच्या चरित्रग्रंथात अत्यंत काटेकोरपणे अधोरेखित झालेला दिसतो. युवकावस्थेत पोहचलेल्या वर्धमानांचा विवाह करण्याची ईच्छा राजा सिद्धार्थ व त्रिशलादेवी यांच्या मनात माता-पिता म्हणून निर्माण होणे,स्वाभाविक होते. या उभयतांनी एके दिवशी एकान्तात गंभीर विचार करुन कुमार वर्धमानांना विवाहबंधनात जखडण्याचा निर्णय पक्का केला. त्यांनी अनेक राजकन्येंचा शोध घेतला. अखेर महासामंत समरवीर यांची कन्या यशोदा ही त्यांना महावीरांसाठी सर्वार्थाने योग्य वाटली. धर्म व राजनीती यांचे ज्ञान असलेली यशोदा महावीरांची पत्नी व्हावी,असा निर्णय त्यांनी घेतला. माता-पित्याच्या विवाहसंबंधी निर्णयास महावीर सुरवातीपासूनच विरोध करत होते. यशादेची निवड त्रिशलादेवी यांनी केली,तरी महावीरांचा नकार कायम होता. अखेर त्रिशलादेवींच्या डोळयात उभे राहिलेल्या अश्रूंनी,महावीरांच्या वज्र निर्धारास वाहून नेले. महावीरांच्या विवाह विषयी श्वेतांबर व दिगंबर दोन्ही जैन पंथामध्ये परस्पर विरोधी मान्यता आहेत. दिगंबर जैन पंथाच्या आचार्यांनी महावीरांना आजन्म ब्रहमचारी मानले आहे. परंतु श्वेतांबर पंथ त्यांचा विवाह यशोदेशी झाला आणि त्यांना प्रियदर्शना नावाची कन्या होती,याला मान्यता देतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर उपवर प्रियदर्शनेचा विवाह महावीरांच्या कुंडपूरातील क्षत्रियकुमार जमालीशी करुन देण्यात आला. जमाली हा त्यांची ज्येष्ठ भगिनी सुदर्शना यांचा पुत्र होता. महावीरांच्या प्रापंचिक जीवनासंदर्भात अन्य इतिहासकारांनी देखील फारसे प्रश्न उपस्थित केलेले दिसत नाहीत. बालपणापासून एकांताप्रिय,चिंतनशील व विरक्त महावीर,हे आत्मचैतन्य जागृत व्यक्तिमत्व होते. प्रपंचाच्या बंधनात जीवन व्यतीत करणे,हे आपले जीवनकार्य कदापि नाही. याची संपूर्ण जाणीव त्यांना होती. त्यांची अंतःप्रेरणाच त्यांना वैराग्य व संन्यस्त जीवनाच्या दिशेने मार्गस्थ करत होती. जैन मान्यतेनुसार त्यांनी कोणाचाही आदर्श याबाबत घेतलेला नव्हता. ते द्रष्टे होते आणि द्रष्टयाला उपदेशाची वा उदाहरणाची गरज नसते. 'उवदेसो पासगस्स नत्थि', असे ते स्वतःच म्हणत असत. असे असले तरी मातापित्यांच्या स्नेहबंधनामुळे त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती,ते जोवर जीवंत आहेत,तोवर गृहत्याग करणार नाही. राजमहालातच ते वानप्रस्थाश्रमाप्रमाणे साधना करत होते. राजभवन आणि वन या दोन्हींच्या बाबतीत समतेचा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला होता. माता-पित्यांचे निधनसमयी महावीरांचे वय अठ्ठावीस होते. आता ते आपल्या प्रतिज्ञेतून मुक्त झाले होते. त्यामुळे गृहत्याग करुन एकांत जीवन व्यतीत करण्यासाठी,एकाकी श्रमण होऊन परिभ्रमण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपला निर्णय त्यांनी ज्येष्ठ बंधू नंदीवर्धन यांच्याकडे व्यक्त केला. माता-पित्यांच्या वियोगाने व्याकुळ व राज्यकारभाराच्या जबाबदारीने अस्वस्थ नंदीवर्धन यांनी आपल्या कनिष्ठ बंधूला आपला निर्णय दोन वर्ष लांबणीवर टाकण्याची गळ घातली. महावीरांनी ज्येष्ठ बंधूंच्या मानसिकतेचा विचार करत,त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र दोन वर्षांनी आपल्याला कोणी रोखणार नाही आणि या दोन वर्षात माझ्यासाठी म्हणून कोणताही कार्यारंभ-समारंभ होऊ नये. मी केवळ एकांत-साधनेतच आपला समय व्यतीत करीन,असे वचन घेतले. यासंदर्भातही दिगंबर पंथाच्या काही काव्यग्रंथातून विरोधी मत मांडण्यात आले आहे. दिगंबर पंथाच्या मान्यतेनुसार प्रव्रज्येच्या वेळी महावीरांचे माता-पिता जीवंत होते. दिगंबर पंथीय काव्यग्रंथांमध्ये याप्रसंगी माता त्रिशलादेवी यांनी केलेल्या करुण विलापाचे काव्यमय वर्णन आलेले आहे. असो हा एकाच धर्माच्या दोन पंथांच्या मान्यतांचा भेद आहे. यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र सर्वमान्य असलेल्या महावीरांच्या चरित्राचा आधार घेणे योग्य. त्यागाचा संकल्प केलेले वर्धमान पुन्हा भोगाकडे वळाले नाही. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजा नंदीवर्धनही वर्धमानांच्या दीक्षा महोत्सवाच्या व्यवस्थेस लागला. मार्गशीर्ष वद्य दशमी(ख्रिस्तपूर्व ५६९,२९डिसेंबर,सोमवार) या दिवशी,दिवसाच्या चौथ्या प्रहरी वर्धमान राजभवनातून बाहेर पडले. चंद्रप्रभा नावाच्या पालखीत विराजमान वर्धमानांनी,ज्ञातखंड उद्यानात पालखी थांबविण्याची आज्ञा दिली. आपले राजसी वस्त्र व अलंकार यांचा त्यांनी त्याग केला. त्यानंतर सिद्धांना प्रणिपात करत,घनगंभीर स्वरात त्यांनी आपल्या भावी जीवनाचे दर्शन घडवणारी प्रतिज्ञा केली. 'मी समभावाच्या व्रताचा अंगीकार करीत आहे. आजपासून मनाने,वाणीने व कर्माने पापमय आचरणाचा मी त्याग करीत आहे. पूर्वकृत पापाचरणापासून निवृत्त होत आहे व भविष्यातही ही निवृत्ती कायम राहावी म्हणून संकल्पबद्ध होत आहे. मी हरेक स्थितीत समभाव कायम ठेवीन,हर प्रकारचे कष्ट,संकटे व उपसर्ग समभावाने सहन करीन. आपत्तींच्या झंझावातातही माझा समतेचा नंदादीप सदा-सर्वदा प्रज्वलित राहील. मी अविचल मनाने जीवात अंतिम उच्छवास कायम असेतो साधनेच्या या अग्निपथावरुन पुढेच चालत जाईन. सिद्धीच्या अंतिम द्वारापर्यंत.' सर्वव्यापी समतेसाठी साधनेचा उद्घोषच जणू महावीरांनी केला. त्यांची ही प्रतिज्ञा म्हणजे जैन धर्माची पायाभरणी होती. राजकुमार वर्धमान आता वर्धमान महावीर झाले. श्रमण महावीरांच्या सशक्त पावलांनी योगसाधनेसाठी एकांत वनाचा पथ तुडविण्यास प्रारंभ केला. श्रमण वर्धमानांचे साधकजीवन हे एक श्रेष्ठतम साधकजीवन होते. महावीरांच्या खडतर व अविचलित साधनेला अधोरेखित करणा-या अनेक कथा जैन साहित्यात ग्रथित करण्यात आल्या आहेत. या कथांमधून आणि वर्णनांमधून साधनेची एक एक पायरी चढत जाणा-या महावीरांच्या कठोर प्रचीती येते. मर्यादित अवकाशामुळे हा सर्व प्रवास सविस्तरपणे कथन करणे शक्य नाही. यासाठी कल्पसूत्र या जैन ग्रंथांचा संदर्भ घेतल्यास संक्षिप्तपणे आपल्याला याची जाणीव होऊ शकते. त्यांच्या साधकजीवनाचे यर्थाथ वर्णन भद्रबाहू यांच्या कल्पसूत्र ग्रंथामध्ये आले आहे. महावीरांच्या निर्वाणानंतर सुमारे १५० वर्षांनंतर कल्पसूत्रांची निर्मिती झाली असावी. त्यांची रचनाकार भद्रबाहू यांना दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही पंथात अंतिम श्रुतकेवली म्हणून मानले जाते. यामुळे भद्रबाहू यांनी भगवान पार्श्वनाथ व महावीर यांचे रेखाटलेले जीवनचरित्र प्रमाण मानण्यात येते. भद्रबाहूंच्या कल्पसूत्रात महावीरांच्या बारा वर्षांच्या कठोर साधनेचे व व्यक्तिमत्वाचे वर्णन अत्यंत संक्षिप्त स्वरूपात एकवीस अलंकारात करण्यात आले आहे. भद्रबाहू म्हणतात,'कांस्यपात्राप्रमाणे त्यांचे जीवन निर्लेप होते. शंखाप्रमाणे त्यांचे हदय निरंजन(रागमुक्त) होते. जीवाप्रमाणे त्यांची जीवनचर्या अप्रतिहत होती. आकाशाप्रमाणे ते सदा पराश्रसरहित(स्वालंबी) होते. पवनाप्रमाणे ते अखंड विहारी होते. शारदीय जलाप्रमाणे त्यांचे अंतःकरण निर्मळ,स्वच्छ व शीतलतेने सदैव युक्त होते. कमलाप्रमाणे ते अलिप्त व अनासक्त होते. कासवाप्रमाणे ते जितेन्द्रिय व संयमी होते. गेंडयाच्या शिंगासारखे ते सदोदित (बाहय व आंतर अशा दोन्ही दृष्टींनी) एकाकी राहत असत. पक्ष्याप्रमाणे ते स्वच्छंद विहारी होते. भारंड पक्ष्यासारखे ते साधनेत सदैव जागरूक असत. श्रेष्ठ हत्तीसारखे ते संकटात शूरपणे वारवरत असत. वृषभासारखे ते प्रखर पराक्रमी होते. सिंहासारखे वे दुर्धर्ष(दुःखांना न भिणारे)होते. सुमेरूसारखे पीडेमध्ये ते अविचल होते. सागरासारखे ते सदैव सौम्य होते. सूर्यासारखे ते तेजोमय होते. सुवर्णासारखे मनोहर कांतियुक्त होते. पृथ्वीसारखे सुखात व दुःखात समभावी होते. अग्निशिखेसारखे सदैव तेजस्वी असत.' श्रमण महावीरांच्या साधनेत अखेर कैवल्यप्राप्तीचा क्षण आला. जुंभिय गावाच्या सीमेवर ऋजुवालुका नदी किनारी श्यामक नावाच्या शेतक-याचे शेत होते. शेतात उभ्या असलेल्या विशाल शालवृक्षखाली ध्यानस्थ बसलेले महावीर. वैशाख शुद्ध दशमीचा(वर्ष ख्रिस्तपूर्व ५५७) दिवस. दिवसाचा चौथा प्रहर सुरू झाला. सूर्यास्तसमयी महावीरांच्या रूपाने ज्ञानसूर्याचा उदय झाला. चार घातक अथवा नाशकारक कर्मांचा क्षय झाला. हे चार कर्म म्हणजे ज्ञानावरण,दर्शनावरण,मोहनीय व अंतराय. महावीरांचे आद्यचरित्रकार आचार्य भद्रबाहू म्हणतात,'श्रमण महावीरांचे तपाचरण हे अन्य तेवीस तीर्थंकरांच्या तुलनेत अधिक उग्र व अधिक कठोर होते.' ऋजुवालुका नदीच्या तटावर साधक महावीर कैवल्यज्ञान प्राप्त करून सिद्धीच्या उंबरठयावर येऊन पोहचले. ते आता सर्वज्ञ,सर्वदर्शी,अर्हंत व जिन झाले. आजवरचे त्यांचे जीवन हे एका साधकाचे जीवन होते. साधनेच्या मार्गावर चालून कैवल्यप्राप्ती करणा-या महावीरांना आता लोककल्याणाचा मार्ग स्वीकारायचा होता. एकांत व मौन यांचा त्याग करत त्यांना सत्याला बोलके करायचे होते. त्यांना प्राप्त झालेल्या अतिगूढ आत्मरहस्याला लोकांच्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवायचे होते. कारण आता ते वर्धमान महावीर राहिले नव्हते,तर भगवान महावीर झाले होते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)
अतिशय माहितीपूर्ण आणि मार्मिक.
ReplyDelete