२४ व्या तीर्थंकराचे आगमन. (दै. सार्वमत शब्दगंध पुरवणी धर्म आणि आणि मानव या लेखमाला लेख क्र.५५)


                 २४ व्या तीर्थंकराचे आगमन
          
इसवी सनापूर्वी सातव्या-सहाव्या शतकात गंगेच्या उत्तर तीरावर वसलेले लिच्छवी क्षत्रियांचे विशाल व पराक्रमी गणराज्य वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते. लिच्छवीच्या सोबत मल्ल,वज्जी,आणि ज्ञातृ इत्यादी आठ कुलातील क्षत्रियांनी मिळून या संयुक्त गणराज्याची स्थापना केले होती. वैशाली ही या गणराज्याची राजधानी होती.लिच्छवी हे सूर्यवंशी क्षत्रिय होते.ते स्वत:स श्रीरामाचे वंशज मानत. बुद्धपूर्व काळात या लिच्छवींना `विदेह` या नावाने ओळखले जायचे. वैशालीच्या उत्तरभागी कुंडपूर हे एक चिमुकले उपनगर होते. त्याचे दोन भाग पडले होते. कुंडपूरच्या उत्तरेकडील भागात ज्ञातृवंशी क्षत्रिय राहत आणि दक्षिणेकडील भागात ब्राह्मण राहत असत. कुंडपूरचा उत्तर भाग हा क्षत्रिय कुंडपूर म्हणून ओळखला जाई. अशा क्षत्रिय  कुंडपूरचे प्रशासक राजा सिद्धार्थ होते. त्यांची राणी त्रिशलादेवी या लिच्छवी गणराज्याचे गणाध्यक्ष चेटक यांच्या भगिनी होत्या. चेटक यांचा उल्लेख जैन परंपरेत विदेहराज आणि त्रिशलादेवींचा विदेहदिंन्ना असा केला जातो.  राजा सिद्धार्थ यांचे कुटुंब हे तीर्थंकर पार्श्वनाथांचे उपासक होते. विवाहानंतर राणी त्रिशलादेवी गर्भवती राहिल्या. एकदा रात्रीच्या शांत नीरव समयी अर्धवट निद्राधीन त्रिशालादेवींना एक अद्भुत व दिव्य स्वप्नमालिका दिसली. ज्यावेळी तीर्थंकराचा आणि चक्रवर्ती पुरूषाचा महान आत्मा एखाद्या भाग्यशाली मातेच्या उदरात प्रवेश करतो त्यावेळी त्या मातेला चौदा अत्यंत शुभ स्वप्ने पडतात अशी एक समजूत जैन परंपरेमध्ये रूढ आहे. त्यानुसार त्यांच्या उदरी मोहरुपी चिखलात फसलेल्या आत्मरथाचा उद्धार करण्यास समर्थ(श्वेतवृषभ),महान,बलिष्ठ व जगत श्रेष्ठ (श्वेतहस्ती ),निर्भय,पराकमी वीर(केशरीसिंह),तिन्ही लोकांतील समðद्धीचा स्वामी(लक्ष्मी),देखणा,सर्वमान्य,सर्वप्रिय(पुष्पमाला),मनोहर,जगाला शीतलता देणारा(चंद्रमंडल), अज्ञानांध:काराचा नाश करणारा(सूर्य),कुल व वंश यांची प्रतिष्ठा वाढविणारा (महाध्वज), अनेक गुण व विभूती यांना धारण करणारा (कलश),जगताचा पाप-ताप शांत करŠन शीतलता प्रदान करणारा(पद्मसरोवर), अपार गंभीरता व मधुरता यांचा समन्वय करणारा(क्षीरसमुद्र),दिव्यता धारण करणारा व देवांनाही पूज्य असणारा(देवविमान),समस्त गुणरुपी रत्नांचा समूह(रत्नराशी),क्रुरतेसारख्या दोषांपासून मुक्त व असाधरण तेज:संपन्न(जाज्वल्य अग्नी) असा पुत्र जन्म घेणार होता. अशी मंगल स्वप्ने जन्मणा-या पुत्राची महानता सूचित करीत असतात. ही महान स्वप्ने दिसल्यावर त्रिशलादेवी जागृत झाल्या. त्यांनी राजा सिद्धार्थ यांना आपण पाहिलेल्या स्वप्नांची वार्ता त्याला सांगितली. राजाचा आनंद गगनात मावेना. उभयतांनी या शुभ-स्वप्नांच्या फलितावर बरीच चर्चा केली. प्रातःकाळी राजाने स्वप्नफल जाणणा-या पंडितांना पाचरण केले आणि रात्रीच्या स्वप्नांचा अर्थ विचारला. पंडितांनी स्वप्नांचे फल सांगितले व म्हटले,'या चौदा प्रकारच्या स्वप्नांवरून असे सूचित होते की,त्रिशलादेवी ही अत्यंत भाग्यशाली माता होईल. होणारा पुत्र तीर्थंकर अथवा चक्रवर्ती बनेल आणि तुमचे कुल,वंश व राज्य यांची सर्व प्रकारांनी अभिवृद्धी करणारा होईल.' स्वप्नफल ऐकताच संपूर्ण राजपरिवारात आनंदाची दिव्य लहर फैलावली. थोडयाच दिवसात स्वप्न-पंडितांची भविष्यवाणी अक्षरशः खरी होत असल्याचा सर्वांना अनुभव येऊ लागला. चैत्र शुद्ध त्रयोदशी (ख्रिस्तपूर्व ५९९,१३ मार्च ) त्रिशलादेवींच्या पोटी जैन धर्म प्रवर्तक भगवान महावीरांचा जन्म झाला. महावीरांच्या व्यक्तिमत्वाचे अवलोकन केल्यास या स्वप्नाची सत्यता पटल्यशिवाय राहत नाही. महापुरुषांच्या जन्मकाली येणा-या सुखद व आनंददायक घटनांच प्रत्यय महावीरांच्या जन्मसमयी आला. जेंव्हापासून हे बालक त्रिशलादेवींच्या उदरात आले, तेंव्हापासून धन,धान्य,कोष्ठागार,स्वजन व राज्यकोष यांची सर्व प्रकारे अभिवðद्धी झाली,यामुळõ या पुत्राचे नाव पिता सिद्धार्थाने 'वर्धमान' असे ठेवले. यशिवाय महावीर,सन्मति ही प्रमुख नावे आणि वीर, आतिवीर, अंत्यकाश्यप ही गौण नामे होती. महापुरूषांच्या जन्मकाली अशा प्रकारच्या सुखद व आनंददायक घटना घडतात,असे वर्णन प्रत्येक धर्म परंपरेत केलेले दिसते. भगवान बुद्धांच्या जन्मसमयी अनुभवास आलेल्या अशाच मधुर प्रसंगाचे काव्यमय वर्णन बौद्ध साहित्यातूनही केलेले आढळते. आजच्या काळात या घटनांच्या वर्णनामागील  सुप्त संदेश पाहणे  महत्वाचे आहे. अशा कथांचा शब्दशः अर्थ घेणे आधुनिक काळात शक्य नाही. एवढे मात्र खरे की,अशा महापुरूषांचा जन्म हा संपूर्ण सृष्टीसाठी कल्याणप्रद असा असतो. त्यामुळे स्वर्गस्थ देवतांपासून अखिल सृष्टी त्यांच्या जन्मप्रसंगी आनंदमय झाल्याचे वर्णन,त्या त्या धर्मपरंपरेत केलेले आहे. खरे पाहिले तर भगवान बुद्ध असो वा भगवान महावीर असो या दोघांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध व जैन परंपरेत अशा जन्मकथांची पेरणी करण्यात आली असावी.  सामान्य माणसाला उपदेश करणे, हाच या जन्मकथांचा मुख्य उद्देश  आहे.  वर्धमान हे आपल्या मातापित्यांचे तिसरे अपत्य होते.  ज्येष्ठ बंधू नंदीवर्धन आणि भगिनी सुदर्शना यांच्या सहवासात वर्धमानांचे बालपण व्यतीत होऊ लागले. वर्धमान जन्मापासून अपार बलशाली व साहसी होते,असे वर्णन जैन साहित्यात आलेले आहे. देवाने कालसर्पाचे रूप घेऊन आणि आपले रौद्ररूप दाखवून आठ वर्षांच्या वर्धमानांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस प्रचंड कालसर्पाला एखाद्या दोरीसारखे फेकणारे आणि रौद्ररूपधारी देवाच्या पाठीत एक बुक्की मारून त्याला गारद करणा-या वर्धमानांचे बल व साहस वर्णन करणा-या मोठया रंजक कथा जैन परंपरेत आहे. यामुळेच त्यांना महावीर असे संबोधले गेले. या कथांच्या मागील अर्थाचे आपण जेंव्हा विश्लेषण करतो,तेंव्हा असे लक्षात येते की, महावीरांनी ज्या अहिंसेचा पुरस्कार आपल्या तत्वज्ञानात केला,ती अहिंसा दुर्बलांची नव्हती. महावीर बलवान व साहसी असून,अहिंसा सांगत होते. बलवानांची अहिंसा ही खरी अहिंसा असते. बलवानांनी अहिंसा तत्व स्वीकारल्यास जगात खरी शांती निर्माण होऊ शकेत,हा संदेशच या कथांमधून मिळतो. यथावकाश वर्धमानांच्या माता-पित्यांनी त्यांना विधिवत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. क्षत्रिय कुलोत्पन्न असल्याने महावीरांमध्ये शौर्य,साहस व पराक्रम हे गुण असणे स्वाभाविक होते. त्यांनी अनेक प्रसंगात त्याचा प्रत्यय देखील दिलेला होता. क्षत्रियोचित शस्त्रविद्येत त्यांनी कौशल्य प्राप्त केलेले असणारच. जन्मतः शांत,गंभीर व चिंतनशील वृत्ती असलेल्या महावीरांना,मात्र बल प्रदर्शन व हिंसक प्रवृत्ती यांचे विषयी आसक्ती नव्हती. त्यांच्यातील हे वेगळेपण त्यांच्या माता-पित्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. शस्त्रविद्येपेक्षा शब्दविद्येत महावीरांना अधिक गती असवी,हे त्यांनी हेरले. तेंव्हा त्यांना शब्दविद्येच निपुण करण्याचा निर्णय माता-पित्यांनी घेतला. क्षत्रिय वर्णात विदेहराज जनक,कैकेय नरेश,प्रवाहण जैवाली,पार्श्वकुमार यासारखे काही क्षत्रिय होऊन गेले की,जे शस्त्रविद्येसोबतच आत्मविद्या व शब्दविद्या या दोन्ही क्षेत्रात तेवढेच निपुण म्हणून अजरामर ठरले. राजा जनक आणि अष्टावक्र  यांच्या संवादातून अष्टावक महागीतेसारख्या ग्रंथाची रचना झाली. अष्टावक्रासारख्या द्रष्टयाला प्रश्न करणारा जनक ही त्याच योग्यतेचा होता. जनकाप्रमाणे वर्धमान हे जन्मजात वेदविद्येत पारंगत होते. मति,श्रुत व अवधिज्ञान(पूर्व जन्मीचे ज्ञान) यांनी संपन्न होते. याचा सर्वांगिण विचार करून,राजा सिद्धार्थ आणि त्रिशलादेवी यांनी वर्धमानांना पाठशाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. वर्धमानांच्या बल व शौर्य प्रदर्शनाचे अनेक प्रसंग तोपर्यंत घडले होते. ज्ञान प्रदर्शनाची संधी अद्याप प्राप्त झालेली नव्हती. माता-पित्यांचा आदेश पाळणारे व गुरुंविषयी आदर राखणारे वर्धमान पाठशाळेत जवळपास मौनच राहत होते. आचार्यांनी त्यांना वर्णमाला शिकवणे सुरू  केले. वर्धमान स्तब्धच होते. त्यांच्या अलौकिक ज्ञानाविषयी त्यांच्या माता-पित्यांसह सर्वजण अनभिज्ञच होते. वर्धमानांच्या ज्ञानप्रकाशाचा प्रत्यय देणारी पहिली घटना एक दिवस पाठशाळेत घडली. एके दिवशी वर्धमानांच्या पाठशाळेत एक टिळाधारी वृद्ध ब्राह्मण प्रवेश करता झाला. त्याच्या मुद्रेवरून तो अत्यंत विद्वान व ब्रम्हज्ञान संपन्न ऋषी असावा असे भासत होते. वर्धमानांचे आचार्य त्याच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी उठून उभे राहणार,तेवढयात तो वर्धमानांकडे वळला. त्याने वर्धमानांना अत्यंत अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. आचार्य व अन्य विद्यार्थी हे सर्व आवाक होऊन पाहत होते. त्या ब्राह्मणाने वर्धमानांना शास्त्रग्रंथातील अनेक गंभीर प्रश्न विचारले,व्याकरणातील जटिल समस्यासुद्धा विचारल्या,त्याच्या सर्व प्रश्नांचे वर्धमानांनी नेमके-अस्खलित उत्तर दिली. एवढया गंभीर प्रश्नांची अस्खलित उत्तरे द्यावी अशी कोणती अलौकिक प्रतिभा वर्धमानांच्या अंगी असावी हे आचार्यांना कळेना. आचार्यांसह सर्व पाठशाळा वर्धमानांच्या चरणांशी नम्र झाली. प्रस्तुत कथेतून असा बोध घेता येतो की,खरा ज्ञानी कधीही उक्तीने आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नसतो. राजा सिद्धार्थांना जेंव्हा ही अद्भूत घटना समजली,तेंव्हा ते लगेच पाठशाळेत आले. वात्सल्याचे भरते येऊन त्यांनी वर्धमानांना उराशी कवटाळले व त्यांच्या डोक्यावर हात फिरवून ते बोलू लागले,' कुमार ! मी तुमची अपूर्व ज्ञानशक्ती ओळखू शकलो नाही,याबद्दल क्षमा करावी. पण तुम्हीही त्याबद्दल कधी सांगितले नाही. इतकी गंभीरता काय कामाची? वर्धमानांनी मंद स्मित केले आणि पित्यासोबत ते पुन्हा राजवाडयाकडे निघून गेले. महावीरांनी भविष्यात जग उजळवून टाकणा-या त्यांच्या ज्ञानाचा प्रथम प्रत्ययच जणू या प्रसंगातून दिला असावा.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,                                      भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      (लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)
                  

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !