आदर्श स्त्री राज्यकर्तीः पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर
आदर्श स्त्री राज्यकर्तीः पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर
''माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.'' अशी प्रतिज्ञा पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या महेश्वर येथिल राजवाडयावर लिहिलेली आहे. राज्यकारभार हाती घेतल्या क्षणी संपत्तीवर तुळशीपत्र ठेऊन अहिल्याबाईनी ही प्रतिज्ञा घेतली आणि आमरण तीचे पालन केले. अहिल्याबाईच्या कार्याचा विचार करतांना त्यांच्या धार्मिक,सामाजिक व जनकल्याणकारी कार्यालाच प्राधान्य दिले जाते.एक राजकारणी सत्ताधारी स्त्री म्हणून त्यांच्या समर्थ व्यक्तिमत्वाला मात्र कायमच दुर्लक्षित केले गेले आहे. त्यांचे प्रशासन कौशल्य,प्रशासन व राज्यकारभारावरील पकड,राजकीय द्रष्टेपणा,चाणाक्षपणा याचा विचार करणे,आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. कारण आज सर्वत्र स्त्रियांच्या राजकारणातील सहभागीत्वावर राजकारण सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्त्रियांना पन्नास टक्के म्हणजेच पुरुषांच्या बरोबरीने सहभाग देण्याची वल्गना करत आहे. अशावेळी अहिल्याबाईसारख्या असामान्य स्त्री राज्यकर्तीचा विचार होणे नितांत आवश्यक आहे.प्रत्यक्ष सिंहासनावर नसलेली सत्ताधारी,राजकारणात असून सत्तेच्या स्पर्धेत नसलेली आणि व्रतस्थ असून संन्यासिनी नसलेली स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई,असे त्यांचे समर्पक वर्णन करता येते. आपल्याकडे राजा वा सत्ताधारी केवढा धार्मिक होता किंवा आहे याचे स्तोम माजविण्यात येते. यात काहिंचा लाभ आणि उर्वरित सगळयांचा भंपकपणा असतो. कोणत्याही राज्यकर्त्याचे राज्यशास्त्राच्या कसोटीवर मूल्यमापन करण्याची भारतीयांना सवयच नाही आणि ती नसण्यात किंवा न लावण्यात राजकीय व अन्य स्वार्थ दडलेला आहे. अहिल्याबाईच्या बाबतीत देखील हेच घडले. त्यांनी मंदिरे बांधली,धर्मशाळा बांधल्या,घाट बांधले,अन्न छत्र चालविली याचेच स्तोम माजविण्यात आले. यातून त्यांचे एक अत्यंत धार्मिक भाबडे व्यक्तिमत्व रंगविण्यात आले. यामुळे त्यांचे राजकारण धुरंधर,आत्मभान असलेले,स्व अधिकारांची जाणीव असलेले व सत्तेचा वापर जनकल्याणसाठी करण्याची क्षमता असलेले समर्थ व्यक्तिमत्व लोप पावले. एक स्त्री राज्यकर्ती आपल्या अधिकारांचा व सत्तेचा वापर आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी किती प्रभावीपणे करु शकते याचे मूर्तिमंत उदाहरण अहिल्याबाई होत्या.अठराव्या शतकात अहिल्याबाईच्या मागच्यापुढच्या काळात मराठेशाहीत तशा अनेक स्त्रिया राजकारणात वावरतांना दिसतात. मात्र या सर्व स्त्रिया सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत होत्या. अहिल्याबाईचे राजकारणात येणे मात्र निराळे होते. त्यांची गुणवत्ता पारखुन त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना राज्यकारभारात आणले होते.त्यांच्या गुणांची कदर करणा-या सास-यांच्या हाताखाली त्यांना कारभाराचे शिक्षण मिळाले. पण इतरजणींप्रमाणे त्यांनी पुत्रपौत्रांना सत्ता मिळवून देण्यासाठी राजकारण केले नाही. मल्हाररावांनंतर अहिल्याबाईचा पुत्र सत्तेवर आला,त्यावेळी त्यांचे स्थान अधिकृतपणे दुय्यम असले,तरी मल्हाररावांचा उजवा हात म्हणून त्यांचा लौकिक मराठा राज्यात सर्वत्र पसरलेला होता. मुलाला हाताशी धरुन त्या हवी तशी हुकमत गाजवू शकत होत्या,मात्र त्यांनी विश्वस्ताची भूमिका स्वीकारली आणि आपल्या पुत्राच्या अपराधाची चौकशी आरंभली व शेवटापर्यंत नेली. पुत्र वा नातू यांना सत्ता मिळवून देणे ही त्यांच्या राज्यकारभाराची प्रेरणा कधीच ठरली नाही. त्यांनी आपली परमेश्वर भक्ती आणि राजकारण या दोन्ही गोष्टींचा अतिरेक कधीही होऊ दिला नाही. स्वराज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेनुसार छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पेशव्यांशी अहिल्याबाई निष्ठावंत होत्या,पण नतमस्तक वा लाचार कदापि नव्हत्या. त्यांची अंतिम निष्ठा सातारकर छत्रपती व मराठा स्वराज्याशी होती. नाना फडणीस व तुकोजी यांनी अहिल्याबाईना सत्तेवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी हाणून पाडला. यामागे त्यांची सत्तालालसा नसून,जे धन त्यांना जनकल्याणाच्या कार्याला उपयोगात आणायचे होते,ते धन या दोघांना स्वतःच्या व फौजेच्या उपयोगात आणायचे होते. यासाठी अहिल्याबाइर्ंनी प्राणपणाने लढण्याची तयारी दर्शवली,परंतु तशी वेळ त्यांच्यावर आलीच नाही,कारण मराठाशाहीत त्यांचा दराराच तसा होता. दिल्लीच्या बादशहाने त्यांना स्वतंत्र पत्र लिहून त्यांची स्वतंत्र दखल घेतली होती. शिख,रजपूत,गोहदवाले हे सर्व लोक स्वतःहून अहिल्याबाईकडे सल्ला घेण्यासाठी आले,मराठयांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. पण मरठयांनी त्यांचा सुज्ञ सल्ला कधीही घेतला नाही. त्याचे परिणाम इतिहासाला माहितच आहे. अहिल्याबाईनी राज्यकारभार एखाद्या कर्तव्यदक्ष गृहिणीप्रमाणे केला,मात्र त्यांच्या जनकल्याणकारी सत्तेच्या विरुद्ध बंडाळी करु पाहणा-या विकृत प्रवृत्तींना चोख प्रतिउत्तर देखील दिले. इंदूर-महेश्वर-उज्जैन या परिसरातच त्यांचा वावर असला तरी हिमालयाच्या केदारनाथपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि पूर्वेच्या जगन्नाथपुरीपासून पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत त्यांचे कार्य चालू होते. त्यांनी असंख्य माणसे आपल्या वागण्यातून आणि कार्यातून जोडली होती. अहिल्याबाइर्ंनी देशभरात जे धार्मिक व सामाजिक कार्य उभे केले त्या मागे एक विशिष्ट हेतू होता. आपसातील यादवीने मराठा साम्राज्याचा अस्त समिप आला आहे,याची जाणीव त्यांना अस्वस्थ करत होती. आपल्या या धार्मिक कार्यातून स्वसमाजाचे अस्तित्व टिकवणे व अस्मिता जागवणे हा त्यांचा या कार्यामागील द्रष्टेपणा होता. मात्र याचा अर्थ हिंदू अस्तित्व व अस्मिता असा नव्हता. त्यांच्या संवेदनेच्या कक्षेत बहुरंगी अखंड भारतीय समाज होता. अहिल्याबाईच्या राजकीय कर्तबगारीचा विस्तृत आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, मध्ययुगीन भारताच्या इतिहासात त्यांच्यासारखी कर्तबगार व यशस्वी राज्यकर्ती स्त्री कोणीही दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात इंदिरा गांधी यांनी आपली छाप भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर पाडलेली दिसते. १९९० नंतरच्या भारतीय राजकारणात ममता बनर्जी, मायावती व जयललिता यांनी स्वकर्तृत्वाने भारतीय राजकारणावर छाप पाडली. अशी मोजकी अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बाकी सगळा आनंदच दिसतो. भारतीय राजकारणात स्त्रियांच्या राखीव जागांमुळे सहभाग वाढलेला दिसत असला, तरी काही सन्मान्य अपवाद वगळता त्यांचे पती वा गणगोतच त्यांची सत्ता प्रत्यक्षात राबवतांना दिसतात. कायदयाने सत्ताधारी झालेल्या या स्त्रियांनी पुण्यशोल्क अहिल्याबाईचे चरित्र अभ्यासून,त्यांचा आदर्श समोर ठेवून आपली सत्ता राबवली वा राजकारण केले,तर या भारताचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असेल आणि हिच पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकरांना खरी आदरांजली ठरेल.
प्रा.डॉ. राहुल हांडे,
मो. ८३०८१५५०८६
Comments
Post a Comment