भारताच्या आत्म्याचा "रेणु'.. (दै.दिव्य मराठी रसिक पुरवणी विशेष लेख)

               भारताच्या आत्म्याचा "रेणु'...

ग्रामीण भारत आपल्या देशाचा आत्मा समजला जात असेल, तर या समाजाला आपल्या असामान्य प्रतिभेतून यथातथ्य साकारणारा पहिला हिंदी साहित्यिक म्हणजे फणीश्वरनाथ रेणु. प्रेमचंद यांच्या सामाजिक व वास्तवादी साहित्यप्रवाहाला हिंदी साहित्यात विस्तारीत करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. हिंदी ग्रामीण साहित्याची पायाभरणी करणारा महान लेखक, स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक, नेपाळमधील दमनशाहीच्या विरोधातील सशस्त्र क्रांतीचे मुख्य सुत्रधार, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ "पद्मश्री'पुरस्काराचा त्याग अशा फणीश्वरनाथ रेणुंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्त...  
-------------
गर्द काळोखात बुडत चाललेली रात्र आणि एका वृक्षाच्या फांदीवर बसलेले चिमणा-चिमणीचे जोडपे. त्यांच्यातील संवाद, चिमणा म्हणतोय "ये हे ये' जणू काही त्याला विचारायाचे आहे,"जागी आहेस की झोपली.' चिमणी आळसावलेल्या सुरात यावर म्हणते,"एह एह ये ये',म्हणजे "मी जागीच तर आहे.' यावर चिमणा म्हणतो,"एह एह एह एह' म्हणजे "हो,जागीच रहा.'
अर्ध्या रात्रीच्या घनघोर अंधारात "परती परिकथा' या आपल्या कादंबरीच्या प्रारंभीच चिमणा-चिमणी  यांच्या आवाजाला शब्द व अर्थ देण्याचे सामर्थ्य प्रकट करणारा व हिंदी साहित्याचा  मानबिंदू  ठरलेला  साहित्यिक म्हणजे फणीश्वरनाथ रेणु. स्वातंत्र्योत्तर ग्रामीण जीवनाचे परिपूर्ण चित्रण म्हणजे रेणुंचे साहित्य. प्रयोगशिलता, ताजेपणा, कल्पनाशक्ती,   तरलता, नाजूकता, सजिवता, रसपूर्ण भाषेत प्राण व जीवन ओतण्याचे सामर्थ्य रेणुंच्या साहित्याचे व्यवच्छेदक वेगळेपण. त्यांच्या कथा-कादंबरीतील कथानक चित्रपटातील दृष्यांप्रमाणे आपल्यासमोरून सरकताना दिसते. कथानकातील प्रत्येक पात्राची एक एक रेष खुलविण्याची त्यांची प्रतिभा उच्च कोटीच्या चित्रकाराप्रमाणे जाणवते. मग ती नैना जोगीण असो की लाल पान की बेगम. "मारे गए गुलफाम' या त्यांच्या कथेला आजची पिढी "तीसरी कसम' या  चित्रपटाने  आणि "इस्स' म्हणून संकोचणारा हिरामन (राज कपूर) आणि आपल्या नृत्याची बिजली पाडणारी हिराबाई (वहिदा रेहमान) यांच्यावरून ओळखते.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरचा संक्रमणशील भारत यांना जोडणारा दुवा म्हणजे रेणुंचे साहित्य. "ठुमरी' या कथासंग्रहातील "पंचलाइट' सारख्या कथेतील विकसनशील खेडं असो की "मैला आंचल' कादंबरीतील रुढी-परंपरा व बुरसटलेपणा यांच्यात जगणारा अनघड ग्रामीण समाज असो, हे हिंदी ग्रामीण साहित्यात सर्वप्रथम केवळ रेणुंच्या लेखणीतूनच अवतरले. त्यांचे ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीण समाज,व्यक्ती व व्यवस्था यांच्यापुरते मर्यादित नसून,ग्रामीण निसर्ग व पशु-पक्षी देखील त्याचा अविभाज्य भाग आहेत. सम्रग ग्रामीण अनुभूती म्हणजे रेणुंचे साहित्य. ग्रामीण भारत आपल्या देशाचा आत्मा समजला जात असेल, तर या समाजाला आपल्या असामान्य प्रतिभेतून यथातथ्य साकारणारा पहिला हिंदी साहित्यिक म्हणजे फणीश्वरनाथ रेणु.
मैला आंचल या त्यांच्या कालजयी साहित्यकृतीला समीक्षकांनी "गोदान' नंतरची सर्वात प्रभावशाली हिंदी साहित्यकृती म्हणून गौरविले आहे. मैला आंचल न वाचलेला हिंदी साहित्य प्रेमी विराळाच म्हणावा लागेल. रेणु हे प्रेमचंद यांच्या नंतरच्या पिढीचे साहित्यिक. त्यांच्या काळातील अज्ञेय,कमलेश्वर,निर्मल वर्मा इत्यादी साहित्यिक नागर व मध्यमवर्गीय जीवनाला केंद्रवर्ती ठेवून भाषा,शब्द आणि आविष्कारांच्या विविध प्रयोगांना प्राधान्य देत असताना,रेणुंनी ग्रामीण जीवनाला प्राधान्य दिलं. प्रेमचंद यांच्या सामाजिक व वास्तवादी साहित्यप्रवाहाला हिंदी साहित्यात विस्तारीत करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. नागर जीवनानुभवांचा आशय व्यक्त करणारे व आधुनिक वेषभूषा परिधान करणारे समकालीन लेखक आपल्या कोषात गुरफटले असताना, ग्रामीण धोतर-कुर्त्याचा वेष करणारा आणि खेडयातच वास्तव्य करणारा हा लेखक त्यांच्यासाठी आव्हान ठरत होता.
आपल्या हयातीतच एखाद्या दंतकथेप्रमाणे तो समकालीन साहित्यिकांसाठी प्रेरणा व आसुया दोन्हींचे कारण ठरत होता. रेणुंचे जीवन संघर्ष कोणत्या कादंबरीच्या कथानकापेक्षा कमी नाही. आपल्या साहित्यकृतींमधील पात्रांप्रमाणचे त्यांचे जीवन आकर्षक व साहसी होते. बिहारमधील अररिया जिल्हयातील फॉरबिसगंजजवळच्या औरोही हिंगना गावात,जन्मलेल्या रेणुंचे शिक्षण भारत व नेपाळमध्ये झाले. कळत्या वयापासूनच दमनकारी शोषक व्यवस्थविरुद्धच्या संघर्षात ते सहभागी झाले. सोशलिस्ट पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी योगदान दिले. भारतीय स्वांतत्र्य संग्रामात त्यांनी सहभाग घेतला. १९५० मध्ये नेपाळच्या दमनकारी सत्तेविरुद्ध करण्यात आलेल्या सशस्त्र क्रांतीचे मुख्य सुत्रधार म्हणूनही रेणु ओळखले जातात. यामुळे त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्वाला संघर्षाची किनार लाभली. वर्णनात्मक शैली आणि पात्रांच्या वेगवान चरित्र निर्मिती करणारे रेणुं एखाद्या चित्रकाराप्रमाणे भासतात. रेणुंच्या साहित्यावर प्रेमचंद यांचा प्रभाव नकळतपणे जाणवत असला, तरी प्रेमचंद यांचे साहित्य जीवनविषयक मोहभंगावर स्थिरावते, रेणु मात्र लोकसंगीत,लोकगीत गुणगुणत नवीन मार्गाचा शोध घेणारी चिवटता प्रकट करतात.
कादंबरी,कथा,काव्य,प्रवास वर्णन इत्यादी साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये रेणुंचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. असे असले तरी कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांना अधिक ओळखले जाते. हिंदी ग्रामीण साहित्याची पायाभरणी करणारा साहित्यिक म्हणून ही त्यांचाच उल्लेख केला जातो. जीवनाच्या विविध अंगी संघर्षाला भिडणारा प्रतिभावंत लेखक हिंदी ग्रामीण साहित्याचा जनक ठरला, हे हिंदी ग्रामीण साहित्याचे सौभाग्यच म्हणावे लागेल.  १९३६ पासून कथालेखन करणाऱ्या रेणुंची पहिली परिपक्व कथा "बटबाबा' होती. १९४२ च्या आंदोलनात सहभागी झालेल्या रेणुंना तुरुंगवास भोगावा लागला. १९४४ मध्ये तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर त्यांची बटबाबा ही कथा आली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कादंबरीकार म्हणून त्यांना जी अफाट लोकप्रियता लाभली,तेवढीच कथाकार म्हणूनही लाभली. "ठुमरी', "अग्निखोर', "आदमि रात्रि की महक', "एक श्रावणी दोपहरी की धूप', "अच्छे आदमी', "सम्पूर्ण कहानयिां' इत्यादी त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह हिंदी साहित्यात मैलाचे दगड मानले जातात.  
अफाट प्रसिद्धी आणि तेवढीच तीव्र बदनामी रेणुंच्या वाटयाला प्रारंभीच्या काळात आली. मैला आंचल कादंबरीवर वाङ्मयचौर्याचे आक्षेप घेण्यात आले. बंगाली लेखक सतीनाथ चौधरी यांच्या "धोढाई चरितमानस' या कादंबरीचे अनुकरण त्यांनी केले,अशी आवई उठवण्यात आली. टिकाकारांना प्रत्यक्ष विरोध न करता आपली दुसरी कादंबरी "परती परिकथा'मधून त्यांनी विरोधकांच्या टिकेला सडेतोड उत्तर दिले. प्रतिभावंताचा ठामपणा आणि निरागसता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे रेणु. आत्मचरित्रासंदर्भात जेंव्हा त्यांच्याकडे मागणी होऊ लागली, तेंव्हा अत्यंत निरागस-निर्मलतेने त्यांनी प्रतिपादन केले की,"स्वतःविषयी काही सांगण्याची इच्छा  होते,परंतु जॉर्ज बर्नाड शॉ यांचा डोळयात विनोदी भाव व दाढीत हसणारा चेहरा समोर आला की माझी लेखणी जागेवर थिजते,कारण त्यांच्यासारखं इतर कोणीही लिहू शकणार नाही.' त्यांचा हा प्रामाणिकपण जीवनाच्या अंतापर्यंत तसाच राहिला. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या रेणुंनी सत्ताधा-यांच्या दमनाविरोधात आपल्या पद्मश्री पुरस्कारचा त्याग केला. अन्यथा आपण साहित्य संमेलनाध्यक्ष होण्यासाठी जीवनभर घेतलेल्या भूमिकेचा त्याग करणारे साहित्यिकही पाहतो. हिंदी साहित्याचा मानबिंदू असलेल्या फणीश्वरनाथ रेणुंचे जन्मशताब्दी वर्ष ४ मार्चपासून प्रारंभ झाले आहे. यानिमित्ताने हिंदी साहित्यक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आपल्याही ग्रामीण साहित्यिकांनी पुन्हा एकवार रेणुंच्या साहित्याचे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अवलोकन करणे आपल्या ग्रामीण साहित्यासाठी पूरकच ठरेल.
--------------
handerahul85@gmail.com
लेखकाचा संपर्क – ८३०८१५५०८६

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !