आदर्श स्त्री राज्यकर्तीः पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर
आदर्श स्त्री राज्यकर्तीः पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर ''माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.'' अशी प्रतिज्ञा पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या महेश्वर येथिल राजवाडयावर लिहिलेली आहे. राज्यकारभार हाती घेतल्या क्षणी संपत्तीवर तुळशीपत्र ठेऊन अहिल्याबाईनी ही प्रतिज्ञा घेतली आणि आमरण तीचे पालन केले. अहिल्याबाईच्या कार्याचा विचार करतांना त्यांच्या धार्मिक,सामाजिक व जनकल्याणकारी कार्यालाच प्राधान्य दिले जाते.एक राजकारणी सत्ताधारी स्त्री म्हणून त्यांच्या समर्थ व्यक्तिमत्वाला मात्र कायमच दुर्लक्षित केले गेले आहे. त्यांचे प्रशासन कौशल्य,प्रशासन व राज्यकारभारावरील पकड,राजकीय द्रष्टेपणा,चाणाक्षपणा याचा विचार करणे,आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. कारण आज सर्वत्र स्त्रियांच्या राजकारणातील सहभागीत्वावर राजकारण सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्त्रियांना पन्नास टक्के म्हणजेच पुरुषांच्या बरोबरीने सहभाग देण्याची वल्गना करत आहे...