मराठी मातीचा उपेक्षित वारसा...
'' स्वतःच्या इतिहास,उगम आणि संस्कृती याविषयी अनभिज्ञ व अज्ञानी असलेला समाज म्हणजे मुळं नसलेला वृक्ष असतो '', असे प्रतिपादन प्रख्यात जमैयकन नीग्रो नेते मार्कस ग्रेव्ही ज्युनियर यांनी नीग्रो समाजाविषयी केलेले आहे. त्यांचा हा विचार भारतीय बहुजन समाजाला देखील अत्यंत चपखलपणे लागू होतो. भारतात बहुजनांचा इतिहास वा संस्कृतीच नव्हे तर त्यांचे तत्वज्ञान, वाङ्मय व भाषा यांचा वृक्षच नष्ट करण्याचा अथवा त्याचे बोन्साय करण्याचा प्रयत्न व प्रघात आर्याच्या आगमनापासून आजवर अस्तित्वात असलेला दिसतो. महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात या भूमीत इसवीसनाच्या नवव्या शतकापासून झालेल्या घडामोडी जरी लक्षात घेतल्या ,तरी याची यथायोग्य प्रतीति येऊ शकते. आज मराठी समाज,त्याची संस्कृती, त्याचे पुरोगामीत्व,भाषा,वाङ्मय,तत्वज्ञान,परंपरा,जनमानस अशा सर्व गोष्टींचे उगम व विकास याचे आदिकारण म्हणजे भागवत अथवा वारकरी संप्रदाय समजले जाते. असे समजण्यात काही वावगे देखील नाही. अखेर जे तत्वज्ञान व आचारपद्धती बहुसंख्य समाजाकडून,दीर्घकाळासाठी व अखंडपणे स्वीकारली जाते,तीच त्या समाजाची समग्र जीवनपद्धती म्हणून ओळखली जाते,याविषयी काही मतभेद असण्याचे कारण नाही ;परंतु याचा अर्थ हा स्वीकार होण्यासाठी तत्पूर्वी संघर्ष केलेल्या महापुरुषांचे कार्य ,तत्वज्ञान व त्यांचे संप्रदाय यांना नकार असाही होत नाही. असे करणे म्हणजे आपल्या समाजवृक्षाची मुळं नष्ट करणे अथवा त्याचा बोन्साय करणे होय. भागवत संप्रदायापूर्वी नवव्या शतकापासून नाथ,लिंगायत आणि महानुभाव या संप्रदायांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायभरणी करण्यासाठी फार मोठा संघर्ष केलेला होता. नाथसंप्रदायाचा उगम हा उत्तर भारतातील असला,तरी नवव्या शतकात मत्स्येंद्रनाथांनी मध्यप्रदेशातून सातपुडामार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला. खानदेशातील तोरणमाळ येथील त्यांची गादी इ.स.८७२ ची आहे. शिवोपासक महाराष्ट्राने या शैव पंथाचा स्वीकार करणे स्वाभाविकच होते. निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांच्यामुळे नाथसंप्रदायाचा दुवा भागवत संप्रदायाशी जोडला जाऊन,हरिहर एैक्य प्रस्थापित झाले आणि शैव-वैष्णवांची मांदियाळी चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाली. असे असतांनाही नाथ संप्रदायाच्या पुरोगामी विचाराधारेची पिछेहाट नकळतपणे होत गेली अथवा करण्यात आली. अठरा पगड जातीभेदांना मुठमाती देण्यासाठी प्रयत्नशील असलेला योगमार्गी नाथ संप्रदाय आज केवळ भटक्या विमुक्त जाती-जमांतींचाच व अंधश्रद्धायुक्त तंत्र-मंत्राचाच राहिला आहे,अशी भावना सर्वसामान्य माणसाची झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी नाथ संप्रदायाची महाराष्ट्रातील काशी समजल्या जाणा-या अहमदनगर जिल्हयातील मढीच्या यात्रेची सफर केल्यास आणि तेथे भरणा-या जात पंचायती व जादूटोण्याची दुकानं पाहिल्यास गावकुसाबाहेरील समाजघटकांना धर्माच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू पाहणा-या नाथ संप्रदायलाच गावकुसाबाहेर काढण्यात आल्याची जाणीव तीव्र झाल्याशिवाय राहत नाही. नाथपंथाचा भारतीय वाङ्मयविश्वालाच नव्हे,तर मराठी,बंगाली,गुजराती व हिंदी या देशी भाषाभगिंनींना देखील महत्वाचे योगदान आहे. ज्ञानेश्वरपूर्व नाथपंथाची अत्यंत अल्प साधने आज उपलब्ध आहेत. अमरनाथ व गहिनीनाथ हे गोरक्षशिष्य महाराष्ट्रातील नाथपंथाचे मूळ पुरुष. त्यांचे 'अमरनाथ संवाद' व 'गोरक्ष गीता' हे दोन ग्रंथ अप्रकाशित असून,गहिनीनाथांचा 'गहिनीनाथप्रताप' हा ग्रंथही आज उपलब्ध नाही. असे असले तरी मराठी संस्कृती,भाषा व साहित्य यांच्या दृष्टीने नाथांचे हे योगदान अमूल्यच आहे. नाथांनंतर मराठी मातीला पुरोगामीत्व देणारा दुसरा संप्रदाय म्हणजे महात्मा बसवेश्वरांचा शिवोपासकच असलेला लिंगायत संप्रदाय. कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यातील वैचारिक,सांस्कृतिक,भाषिक व साहित्यिक अनुबंध दृढ करण्यात या संप्रदायाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जातीभेदाची कृत्रिम तटबंदी मोडित काढत,स्त्री-पुरुष समानतेची नांदी देणा-या महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान केवळ भक्तीच्या क्षेत्रातच नव्हे तर सर्वांगीण व संपूर्ण क्रांतीचा उद्घोष करणारे होते. त्यांच्या विचाररुपी हि-याला आचाररुपी कोंदण लाभलेले दिसते. चर्मकार समाजातील संत हरळय्या यांचा मुलगा शिलवंत व मधुसरस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांचा कदाचित भारतातील पहिला आंतरजातीय विवाह बाराव्या शतकात बसवेश्वरांनी घडवून आणला. आज नऊशे वर्षानंतरही यासाठीऑनरकिलिंग करणाऱ्या विकृत मानसिकतेचा -हास भारतीय समाजमानसातून झालेला नाही.स्त्रियांना मत स्वातंत्र्य,धार्मिक व आध्यात्मिक हक्क देणाऱ्या,या विद्रोही महात्म्याने स्त्रियांची मासिक धर्माच्या अशुद्धतेच्या कल्पनेतून व पंचसुतकापासून सुटका केली. प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य,श्रमप्रतिष्ठा म्हणजेच त्यांचा 'कायक सिद्धांत'. प्रामाणिक श्रम म्हणजेच खरी शिवोपासना आणि त्याच्यातूनच स्वर्गप्राप्ती म्हणजेच 'कैलास', हे सांगणारे बसवेश्वर संपत्तीच्या विभागणीचा विचार व आपण कमावलेल्या धनाचा समाजोपयोगी वापर याविषयी आपल्या 'दासोह सिद्धांता'त आग्रही दिसतात. येथे त्यांची समाजवादी व समतावादी विचारधारा काळाच्या पुढे असल्याची जाणवेत,कारण यानंतर युरोपात सुमारे पाचशे वर्षानंतर या संकल्पना अस्तिवात येण्यास प्रारंभ झाला. दक्षिणेत ई.स. तिसऱ्या शतकापासून नवव्या शतकापर्येत आपल्या भक्तिआंदोलनाने देशभर खुप लोकप्रिय ठरलेली अलवार संतपरंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील दुवा म्हणून लिंगायत पंथाकडे पाहता येते. मराठी समाज,भाषा,साहित्य आणि संस्कृती यांचे सर्वाथाने पुरोगामी भरणपोषण करणारा अस्सल मराठी मातीचा संप्रदाय म्हणजे 'महानुभाव'. यादवकाळात चातुर्वण्य व्यवस्थेचे व कर्मकांडाचे स्तोम माजले असतांना श्रीकृष्ण भक्ती व गीता यांना प्रमाण मानत धार्मिक कर्मकांड व सामाजिक गुलामी यांना नाकारत खरी भक्ती आणि समता यांचा हुंकार केवळ आणि केवळ मराठीतच देणारा हा पंथ. आपल्या द्वैती तत्वज्ञानाने आणि परंपरा नाकारणाऱ्या आचारधर्मामुळे यादवकाळातच संकटात सापडला. महात्मा चक्रधर आणि श्रीगोविंदप्रभू यांच्या विचारांनी व आचरणाने याकाळात सनातन हेमाद्रीप्रवृत्तीला हादरे देण्यास प्रारंभ केला. यामुळे या पंथाला प्रचंड जाच सहन करावा लागला,एवढेच नव्हे तर मराठी संतांच्या उपहासाला सामोर जावे लागले. एकनाथांपासून तुकारामांपर्यत जवळपास सर्व संतांनी चक्रधर-नागदेवाचार्यानंतर या पंथात शिरकाव झालेल्या अपप्रवृत्ती व दांभिकतेवर कोरडे ओढले असले,तरी त्यात द्वेष भावना नव्हती. मात्र याचे आकलन नसणाऱ्या सर्वसामान्यांनी महानुभाव शब्दाचा उच्चार 'मानभाव' करत या पंथाचा उपहास आजवर चालवलेला आहे. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात समग्र समता,स्वातंत्र्य आणि लोकशाही याविषयी लिंगायत व महानुभाव यांचे जहालपण एकसारखेच मानावे लागेल. यामुळेच सर्वसामान्यांना ते एकदम स्वीकारण्यास कठिण गेले आणि त्यांनी ते स्वीकारू नये यासाठीही नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले. या दोन पंथांच्या जहालपणामुळेच तत्कालीन धर्ममार्तड भागवत संप्रदायप्रणित चंद्रभागेच्या वाळवंटातील लोकशाहीला अनुकुल झाले. हि लोकशाही मान्य करूनही नामदेवांना चोखामेळांवरील घोर अमानवी अन्यायाविरुद्ध लढा द्यावाच लागला. या प्रश्नाचे उत्तर 'काळाराम मंदिर सत्याग्रहापर्यत' मिळाले नाही. वारकरी संप्रदायाएवढेच योगदान महानुभाव संप्रदायाचे मराठी समाज,भाषा व साहित्याला आहे. उलटपक्षी ते विविधांगी आहे. स्वतः गुजराती असून अस्खलित मराठी बोलणारे आणि आपल्या शिष्यांना फक्त मराठीतच ग्रंथलेखनाचा आदेश देणारे पंथ संस्थापक चक्रधर आणि संस्कृत नाकारत मराठीचा आद्य आग्रह धरणारे नागदेवाचार्य.यांच्यामुळे मराठीत आद्य गद्य लेखन परंपरा निर्माण करणारे महानुभाव, चरित्र लेखनाचे सर्व आधुनिक निकष पाळत मराठीतील आद्य चरित्र लिहिणारे महानुभाव, धवळे लिहिणारी मराठीतील आद्य कवयित्री महदंबा महानुभाव, मराठीतील आद्य प्रवासवर्णन 'ऋद्धिपूरवर्णन'लिहिणारे महानुभाव,मराठीत सर्वप्रथम साहित्याचे परकियांपासून जतन करण्यासाठी सांकेतिक लिपी शोधणारे महानुभाव, विविध विषय व प्रकार असलेल्या साती ग्रंथांची निर्मिती करणारे महानुभाव अशाप्रकारे महानुभावांनी मराठी भाषेला व साहित्याला दिलेल्या योगदानाला तोड नाही. महानुभावांचा उपहास व तिरस्कार झाला नसता,तर मराठी गद्य लेखन परंपरा पुन्हा जीवंत होण्यासाठी आणि मराठीत विविध वाङ्मयप्रकार निर्माण होण्यासाठी अठराव्या शतकापर्यंत प्रतिक्षा करावी लागली नसती. महाराष्ट्रातील धार्मिक व सामाजिक क्रांतीचा उद्घोष करणारे,नाथ,लिंगायत आणि महानुभाव हे सामाजिक,भाषिक व साहित्यिक स्तरावर उपेक्षित संप्रदाय ठरले वा ठरविण्यात आले याविषयी मतमतांतरे असू शकतील;परंतु मराठी मातीला पुरोगामीत्वाचा खरा साज चढविणाऱ्या या पंथांच्या योगदानाला नाकारणे वा उपेक्षित ठेवणे म्हणजे आपल्या तेजोमय इतिहासाला उपेक्षिने होय,हे मात्र निश्चित.
प्रा.डॉ.राहुल हांडे
संपर्क – ८३०८१५५०८६
Very good information 👌👍
ReplyDeleteखूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडलं आहे..👌👌👌👌👌👌
ReplyDeleteRahul you are a born Professor, thinker, social reformer through your writings.I advise you to continue writing & writing .It's really appreciable in the beginning of the profession. All the best to you.
ReplyDelete