'मराठी भाषा गौरव ' दिन विशेष लेख
मराठीचा 'अभिजात ' संघर्ष
दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात आपली मातृभाषाविषयक अस्मिता क्षणिक का होईना,धारदार होते. सालाबादानुसार २७ फेब्रुवारी हा कवीश्रेष्ठ कुसमाग्रजांचा जन्मदिन आपण 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करतो. अनेकजण याला 'मराठी दिन ',' मराठी भाषा दिन','मराठी राजभाषा दिन' इत्यादी संबोधनं वापरतात,यातील ' गौरव' शब्दाचा त्यांना सपशेल विसर पडलेला असतो वा त्यांना हे नेमकं माहितच नसते. विविध नामवंत मराठी दिनदर्शिंकांमध्ये देखील या दिनाबद्दल चूकीचे उल्लेख आढळतात. सहज निरिक्षण केल्यास महाराष्ट्रात प्रत्येक स्तरावर असा चूकीचा उल्लेख होतांना आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही. 'राजभाषा मराठी दिन' हा १ मे या दिवशी असतो,हे अनेकांना माहित नाही. यानिमित्त्याने विविध स्तरांवर भाषणं-व्याख्यानं-प्रवचनं यांचा महापूर आलेला,आपण याची देही याची डोळा अनुभवतो. आपल्याला याकाळात सर्व काही मराठीमय झाल्याचे वा होणार असल्याचे भास देखील होऊ लागतात. याचवेळी आपल्या कानावर मराठी सोबत अभिजात नावाचा शब्द सतत आदळत असतो आणि आपण मायबोलीच्या अभिमानानं तो-तो रोमांचित होतो. आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच पाहिजे यासाठी नेत्यांपासून कार्यकर्त्यापर्यंत,साहेबापासून शिपायापर्यंत,शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक जण राणा भिमदेवी थाटात गर्जना करतांना पाहून धन्य वाटते. सालाबादानुसार आपण १ मार्चपासून २६ फेब्रुवारीपर्यंत हे सर्व लीलया विसरतो. त्यामुळे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणजे नेमकं काय? याचा ही आपण गांर्भीयाने विचार करावयास हवा. भारत सरकारने कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष ठरविले आहेत. त्यानुसार भाषेची प्राचिनता,मौलिकता,सलगता,भाषिक आणि वाङ्मयीन पंरपरेचे स्वयंभूषण असणे महत्वाचे असते,तसेच त्या भाषेचे प्राचीन रुप आणि आजचे म्हणजे अर्वाचीन रुप यांच्यात अखंड असे नाते सिद्ध होणे अपेक्षित असते. या निकषांच्या आधारावर आजवर केंद्र सरकारने तमिळ,संस्कृत,तेलगु,कन्नड,मल्याळम व ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. अभिजात दर्जा प्राप्त झाल्यावर काय फरक पडतो ? असाही एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात सहज निर्माण होऊ शकतो. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यावर त्या भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्यमान्यतेची मोहर,तर उमटतेच पण त्या भाषिक समजाच्या भाषिक अस्मितेला व अभिमानाला एक झळाळी प्राप्त होते. अभिजात भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळून तिच्या विकास कार्याची गतीमानता वाढते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी सखोल संशोधन व अभयास करुन पुरावे एकत्रित करण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या राज्य सरकारने ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१० जानेवारी २०१२ रोजी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली होती. या समितीने याच सरकारच्या कार्यकाळात दि.१२ जुलै २०१३ रोजी मराठीत व दि.१६ नोव्हेंबर २०१३ रोजी इंग्रजीत सदर अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला. पठारे समितीने अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्याचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते,हे सप्रमाण सिद्ध केले. मात्र याचवेळी राज्यात व देशात सत्तांतर झाले. सत्तांतराच्या लाटेत राज्य व केंद्र अशा दोन्ही पातळयांवर सत्तेत येणा-या पक्षाने दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी पठारे समितीचा अहवाल स्वीकारत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे हे देखील एक होते. आपण यासाठी बांधील आहोत,असा दावा या राज्याच्या जून्या राज्यकर्त्यांनी सातत्याने केला. मात्र तो सुद्धा 'चुनावी जुमलाच' ठरला।मराठी माणूस व मराठी भाषा या दोन मुद्यांवर ज्या पक्षाचे राजकारण उभे आहे. असा पक्ष आता राज्यात सत्ताधारी झाला आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्यांच्याकडून मराठी भाषक समाज निश्चितच आशादायी आहे. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, यासाठी अनेक दाखले देता येतात. प्राचीन महारठ्ठी,मरहट्ठी भाषा,महाराष्ट्री प्राकृत भाषा,अपभ्रंश भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास सांगता येतो. यातील महाराष्ट्री प्राकृत भाषा,अपभ्रंश भाषा व मराठी या तीन वेगवेगळया भाषा नसून ती एकाच भाषेची तीन रुपे आहेत. मराठीतील पहिला ग्रंथ 'गाथासप्तशती' हा सुमारे २००० वर्षे जुना आहे. मराठी भाषेच्या अत्यंत प्रगल्भ अवस्थेत 'लीळाचरित्र' आणि 'ज्ञानेश्वरी' सारखे श्रेष्ठ ग्रंथ निर्माण झाले. कोणतीही भाषा एकाएकी प्रगल्भ होत नाही. प्रगल्भ अवस्थेला पोहचण्यासाठी अनेक शतकांचा काळ जावा लागतो. असे जागतिक स्तराचे ग्रंथ आपल्या मराठीत आठशे वर्षापूर्वी लिहिले गेले. आज संशोधकांनी शोधलेल्या शेकडो शिलालेख,ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे पाहिल्यास मराठी लीळाचरित्र व ज्ञानेश्वरी यांच्यापूर्वी बारा-पंधराशे वर्षे अत्यंत समृद्ध भाषा होती हे सिद्ध झाले आहे. प्राकृत भाषांचे व्याकरणकार वररुची यांचा 'प्राकृतप्रकाश' आणि हेमचंद्र यांचा 'देशीनाममाला' या ग्रंथांमध्ये ही मराठीचे पुरावे सापडतात. शाकुंतल व मृच्छकटिक यांसारख्या संस्कृत नाटकातील अनेक पात्रांच्या तोंडचे प्राचीन मराठीतील संवाद पाहिले असता, मराठीची प्राचीनता निर्विवादपणे सिद्ध होते. जुन्नर जवळील नाणेघाटात असलेला मराठी भाषेतील पहिला शिलालेख २२२० वर्षापूर्वीचा आहे. यावरुन मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असले पाहिजे,असे अभयासकांचे मत आहे. महाराष्ट्र या देशनामापेक्षा जुनी असलेली 'महाराष्ट्री भाषा' सातवाहनांच्या राजवटीत (इ.स.पूर्व २ रे शतक ते इ.स.२ रे शतक ) प्राकृत महाराष्ट्री म्हणून भारताच्या ब-याच मोठया भूभागात प्रचलित होती. असा अडीच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या आपल्या मायबोलीला.आज स्वतःचे अभिजातपण सिद्ध करण्यास संर्घष करावा लागत आहे. संघर्ष हा मराठीला नवा नाही,परंतु आपण आपल्या भाषेच्या गौरवासाठी किती संघर्ष करतोय? हा खरा प्रश्न आहे. 'मराठी भाषा गौरव दिन' प्रसंगी अनेक विद्वान मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरणरंजन करतांना,वर्तमानाविषयी गळा काढतांना आणि भविष्याविषयी चिंताक्रांत होतांना दिसतात. यासाठी मराठी ज्ञानभाषा व्हावी वा जगाच्या सर्व क्षेत्रातील ज्ञान मराठीत उपलब्ध व्हावे असा विचार हे विद्वान आग्रहीपणे व्यक्त करतांना पाहायला मिळतात,परंतु हे कोणी करायचे? याचे उत्तर देत नाही. याला कारण आपला भाषिक अभिमानच मुळी दांभिक व दिखाऊ आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता,अशा सर्व विद्वानांपासून ते मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणा-या सर्वांची मुलं वा नातवंड कोणत्या माध्यमात शिक्षण घेत आहेत याचे सर्वेक्षण केल्यास आपला भाषाविषयक दांभिकपणा उघड झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा अखेरची घटका मोजत असल्याची खंत असो की उच्च शिक्षणात मराठी विषयाची झालेली गत असो याविषयी बोलण्याची सोय उरणार नाही. म्हणूनच मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी आपल्याला मराठी भाषकांचे राज्य म्हणून संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेल्या लढयाप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. एवढेच नव्हे तर मराठीचे अभिजातपण जगासमोर अधोरेखित करण्यासाठी प्रत्येक स्तरावर झपाटल्यागत काम करावे लागेल,तरच आपण 'हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी ।' हे कवीवर्य माधव ज्युलियनांनी आपल्या मातृभाषेविषयक पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करु शकेल.
प्रा.डॉ. राहुल हांडे,
भ्रमणध्वनी - ८३०८१५५०८६
खूप छान.
ReplyDelete