गांधी-आंबेडकर महासमन्वय : काळाची गरज

      
      
   गांधी-आंबेडकर महासमन्वय : काळाची गरज

'' हिंदू धर्मचेतना पूर्णपणे संचारलेला हिंदूंचा हिंदू असल्याचे मी स्वतःस समजतो. ज्यास आपण हिंदू शास्त्र म्हणतो,अशा सर्व पुस्तकांत,आपण विश्वास ठेवीत असलेल्या आणि पालन करीत असलेल्या अस्पृश्यतेच्या अस्तित्वासाठीचे एकही प्रमाण शोधण्यास मी अयशस्वी ठरलो आहे;परंतु इतर ठिकाणी मी वारंवार सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माने खरोखरच अस्पृश्यतेस नैतिक पाठबळ दिले असल्याचे मला आढळले,तर हिंदू धर्माचा त्याग करण्यास मी डळमळणार नाही.'' हे विधान आहे हिंदू धर्मावर असीमप्रेम करण्या-या महात्मा गांधी यांचे. जन्माने हिंदू असल्याचा गर्वाभिमान बाळगणारे गांधीजी या धर्मावर कलंक म्हणून सर्वात सखोल व अमिट ठसा असणा-या अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा दृढ संकल्प व्यक्त करतात. असे असले तरी गांधीजी आज ना हिंदूत्ववाद्यांना आपले वाटतात ना आंबेडकरवाद्यांना. देशाने 'राष्ट्रपित्या' चा दर्जा दिलेल्या, याच गांधीजींची १५०वी जयंती साजरी करण्याची तयारी होत असतांना,३०जानेवारीला त्यांच्या पुण्यतिथी दिनी अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेची राष्ट्रीय सरचिटणिस असलेली पूजा पांडे नावाची एक महिला आणि तिचे सहकारी त्यांच्या पुतळयावर गोळया झाडण्याचा विकृत आनंद लुटतांनाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होतो. आधुनिक प्रजासत्ताक भारताचा सर्वप्रथम धर्मग्रंथ म्हणजे आपले संविधान. जगातील या सर्वश्रेष्ठ राज्यघटनेचा उपभोग भारतीय नागरिक म्हणून आपण घेत आहोत आणि,तिचे निर्मिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांची १२५वी जयंती २०१६ मध्ये आपण साजरी केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने(युनो) डॉ.आंबेडकरांची १२५वी जयंती समारंभाचे आयोजन केले,ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. युनोने यावेळी 'विश्वाचा प्रणेता' म्हणून त्यांचा गौरव केला. युनोच्या सत्तर वर्षांचा इतिहासात डॉ.आंबेडकर पहिले भारतीय ठरले,ज्यांच्या जयंती समारंभाचे आयोजन युनोने केले. यापूर्वी मार्टिन ल्यूथर किंग  आणि नेल्सन मंडेला या दोन महापुरुषांचीच जयंती युनोत साजरी करण्यात आली होती. हे तीनही महापुरुष मानवाधिकार संघर्षाचे महान नेते होते,यावर युनोच्या माध्यमातून अखिल विश्वाने शिक्कामोर्तब केले. हे होत असतांना दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर हिंदूत्ववादी आझाद सेनेचे कार्यकर्ते 'राज्यघटने'चे दहन करतात आणि गेल्या डिसेंबर महिन्यात दिल्लीतच गटार साप‹Š करतांना सहा कामगारांचा मृत्यू होतो. हे सर्व कामगार अर्थातच दलित समाजातील असतात,कारण सफाई कामगारांच्या जागा केवळ दलित समाजासाठीच राखीव असतात. सवर्ण समाज असल्या कामाचा विचार देखील करु शकत नाही. याचकाळात आरक्षणाचा हक्क देणा-या राज्यघटनेला नाव ठेवणा-या समाज घटकाला दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव संसदेकडून एकमताने मंजूर करुन घेतला जातो. अशा सर्व घटनांचा अन्वयार्थ आपण जेंव्हा विवेकपूर्ण पद्धतीने लावतो,तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते,ती म्हणजे अशाप्रसंगी स्वतःला गांधीवादी विचारांचा पाईक म्हणवणारा लोकप्रतिनिधी असो वा आंबेडकरी चळवळीचे अपत्य म्हणवणारा मंत्री वा लोकप्रतिनिधी असो एकही जण निषेध म्हणून आपल्या पदाचा त्याग करत नाही. सन्मानाची पदं भूषविणा-या लेखक-विचारवंत-कलावंत यांची देखील भूमिका यापेक्षा वेगळी दिसत नाही. कारण येथे प्रत्येकाला गांधी-आंबेडकर हे पदं-सन्मान-पुरस्कार यांच्या प्राप्तीसाठीच केवळ महत्वाचे आहेत. यातील अनेकजण दुरचित्रवाणीच्या वृत्तवाहिन्यांवरच रोखठोक-बेधडक बोलतांना दिसतात,त्यांच्यासाठी तो केवळ आजचाच सवाल असतो. दुस-या बाजूला देशाचे सरकार प्रत्येक वेळी गांधीचे नाव तर घेतेच,पण त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान चालवते आणि खादीला प्रोत्साहन म्हणून चरखा पि‹Šरवतांना दिसते. हेच सरकार डॉ.बाबासाहेब आंबेडकारांच्या १२५व्या जयंतीप्रित्यर्थ दिमाखदार सोहळे, विविध योजनांची घोषणा करतांना दिसते;परंतु या महापुरुषांच्या विचारांना व कार्याला नष्ट करु पाहणा-या समाजकंटकांवर कोणतीही ठोस कारवाई करत नाही. महात्मा गांधी विरुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर असा सामना रंगविण्यात मात्र, यासर्व समाजधुरिणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. अशावेळी या दोन्ही महापुरुषांच्या विचारधारांमधील दरी आणि संभ्रम सामान्यांच्या डोक्यात वाढतच जातो. यातून गांधीवाद व आंबेडकरवाद हे एकमेकांचे कट्टर शत्रु असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात दृढमुल होणे स्वाभाविकच आहे. हा संभ्रम वृद्धिंगत करुन आज या देशात केवळ प्रतिगामी शक्तींचे षडयंत्र व हेतू सर्वथा साध्य झाल्याचे सिद्ध होते. अशावेळी या दोन महापुरुषांच्या समाज कल्याणकारी विचारधारांचा समन्वय साधण्याचा पुनर्रविचार होणे नितांत आवश्यक आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांमध्ये साम्य व संतुलन करण्याचे प्रयत्न करावेच लागतील,जरी हे दोन महापुरुष स्वतःच्या जीवनकाळात एकमेकांशी बहुतांशी असहमत असतील तरी. हिंदूत्ववादी संस्थांनी या दोन महापुरुषांच्या विचारधारांसोबत समरसता निर्माण करण्याचा वरकरणी का होईना,पण प्रयत्न केलेला दिसतो. असे असतांना गांधीवादी आणि आंबेडकरवादी एकमेकांना समजावून घेऊन आणि सहकार्याने चालू शकत नाहीत का ? अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न या अनुषंगाने निमार्ण होऊ शकतात. गांधी व आंबेडकर यांच्या आदर्शांमध्ये काही तफावत होती का ? हे दोघेही दलितांचे उत्थान,जातिगत भेदभावाची समाप्ती,समता या ध्येयांप्रती प्रामाणिकपणे समर्पित नव्हते का ? ब्रिटिश वसाहतवादी शासनाच्या विरोधात चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या विशिष्ट संदर्भात या दोघांमध्ये आठ-नऊ दशकांपूर्वी निर्माण झालेले  मतभेद आजही  तितकेच प्रासंगिक व महत्वपूर्ण  आहेत का ? या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर 'नाही' असेच आहे. या दोन्ही महापुरुषांचे लक्ष एकच होते,मात्र त्यांचे मार्ग वेगळे होते. दक्षिण आफ्रिकेत श्वेत वर्णियांकडून मिळालेल्या हीन-पशुवत वागणूकीमुळे गांधीजींना डॉ.बाबासाहेब आंबेडकारांच्या आणि तमाम भारतीय दलितांच्या वेदनांची कल्पनाच नव्हे,तर साक्षात अनुभवच आला. यामुळेच १९२० व १९३०च्या दशकात अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी लिहिलेले अनेक भावपूर्ण व सशक्त लेख,याची साक्ष देतात. एवढेच नव्हे तर एका लेखात डॉ.आंबेडकरांविषयी ते म्हणतात,''त्यांनाच (आंबेडकरांना) नव्हे तर सर्व अस्पृश्यांना माझ्यावर थुंकण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी असे जर केले तर मी हसतमुखाने त्याचा स्वीकार करेल.''  गांधी व आंबेडकर यांच्या जडण-घडणीत मूलभूत अंतर असल्याने त्यांचा दलित समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिच्या निर्मूलनासाठी त्यांनी निवडलेल्या मार्गात भिन्नता असणे अत्यंत स्वाभाविक आहे. या भिन्नतेचे मुळ गांधींच्या सर्वण असण्यात आणि आंबेडकरांच्या दलित असण्यात होते. शासक अशा सवर्ण वर्गाच्या दलितांना हीन लेखणा-या व मानणा-या मानसिकतेचा शासित अशा दलित वर्गावर प्रचंड प्रभाव पडला होता. हा वर्ग स्वतःलाच हीन समजायला लागला होता. हे आंबेडकरांसमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी दलित मानसिकतेत परिवर्तन करत त्यांच्यात आत्मसम्मान व आत्मविश्वास निर्माण करणे आंबेडकरांनी महत्वाचे मानले. त्यामुळे त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याला प्रधान मानले,तर वसाहतवादी ब्रिटिश साम्रज्याच्या जोखडातून भारताला मुक्त केल्यानंतर,सामाजिक परिवर्तन सहज शक्य आहे,अशी गांधींची धारणा होती. आपल्या उद्दिष्टयासाठी आंबेडकरांना कायदा व संविधान यामाध्यमातून परिवर्तन करणे महत्वाचे वाटले,तर गांधींजींना माणसांचे मनःपरिवर्तन झाल्याने हे साध्य होईल असे वाटत होते. डॉ.आंबेडकरांचा मार्ग घटनाकेंद्रित होता आणि गांधीजींचा आध्यात्मकेंद्रित होता. दोन्ही महापुरुषांच्या ध्येय-धोरणात असलेल्या अंतराला तत्कालिन राजकिय,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक पार्श्वभूमी देखील कारणीभूत होती,हे नाकरता येत नाही. आज केवळ लिखित ऐतिहासिक पुरावांच्या आधारे तत्कालिन सर्वच संदर्भ जुळवता येणे अशक्य आहे. आजच्या वास्तवाचा विचार केला असता भारतीयांच्या मनःपरिवर्तनाचा प्रयोग संपूर्ण यशस्वी झालेला दिसत नाही आणि कायदे -संविधान यांनीही समाज पूर्णपणे वठणीवर आलेला दिसत नाही. गांधीवाद आणि आंबेडकरवाद यांच्यात निर्माण करण्यात आलेल्या टोकाच्या विसंवादाने भारतीय समाजमानस भरकटवण्यात आणि भ्रमित करण्यात प्रतिगामी शक्ती मात्र यशस्वी झालेल्या दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांचा समन्वय होऊ शकतो,तर गांधी-आंबेडकरांचा का नाही ? यासाठी एकच करावे लागेल,या विचारधारेचा पाईक म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला आपल्या क्षणिक आणि शुद्र स्वार्थाचा त्याग करावा लागेल. वर्तमानकालिन परिस्थितीचा गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे  विचार करता आंबेडकरवाद आणि गांधीवाद आज एकमेकांना पूरक अधिक आहेत आणि विरोधी कमी हे जाणवल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत गांधी-आंबेडकर यांना दोन विरुद्ध धृवांवर ठेवण्यात अनेकांचे संशोधन आणि लेखणी खर्ची पडली आहे. आता संशोधन आणि लेखणी दोहोंचा वापर समन्वयासाठी होणे अपेक्षित आहे. भारतीय समाजमानस अंर्त-बाहय बदलविण्यासाठी ,या महापुरुषांना अपेक्षित असलेली  सामाजिक क्रांती प्रत्यक्षात उतरण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने  पुरोगामी भारत अस्तित्वात येण्यासाठी महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांचा महासमन्वय काळाची गरज बनली आहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी – ८३०८१५५०८६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !