आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त दैनिक सार्वमत मध्ये प्रसिद्ध झालेला लेख"कृष्णाकाठचा कल्पवृक्ष"

             
                 
   कृष्णाकाठचा कल्पवृक्ष
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा अत्यंत यशस्वी राजकीय आलेख असलेल्या आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवलेल्या एका नेत्याचे निधन होते. त्याने आपल्या मागे ठेवलेल्या संपत्तीची मोजदाद केली जाते. तेंव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलोपार्जित काही गुंठे जमिन आणि बँकेच्या खात्यात केवळ पंधरा हजार रूपयांची शिल्लक एवढेच ऐहिक संचित मागे ठेवलेला हा नेता म्हणजे आधुनिक महाराष्ट्रच नव्हे तर आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक स्व.यशवंतराव चव्हाण. आज हे सत्य कपोलकल्पित कथा वाटेल. हे सत्य या महाराष्ट्राने साक्षात अनुभवले आहे. वर्तमान राजकारण आणि राजकीय नेतृत्व यांचा भयाण अनुभव घेणा-या आजच्या युवापिढीला यावर विश्वास बसणे अशक्यच आहे. आर्थिक व शैक्षणिक अशा दोन्ही स्तरावर प्रतिकुल परिस्थितीत जन्मलेला हा मुलगा जीवनाच्या संघर्षात संकटांवर स्वार झाला. आपण प्रयत्नपूर्वक आपले व्यक्तिमत्व घडवायचे अशी खुणगाठ मनाशी बांधून परिश्रम करू लागला. शाळेत शिक्षकांनी,'मोठेपणी आपण कोण होणार ?.' या प्रश्नाचे उत्तर लिहायला सांगितले होते. यावर इतर कोणीही न दिलेले वेगळे उत्तर यशवंताने दिले होते. 'मी यशवंतराव होणार' या  उत्तरातच यशवंतरावांच्या स्वतंत्र बाण्याचे दर्शन घडते. मी कोणाचे अनुकरण करणार नाही,तर स्वतःला कोणी तरी मोठा घडवणार. परिस्थितीतून आणि आईकडून मिळालेल्या संस्कारांनी यशवंतरावांनी स्वतःला घडविले. आपल्या जीवनात भोगलेल्या दारिद्रयाचे भांडवलही केले नाही आणि गरिबीच्या चटक्यांनी त्यांच्या मनातील कोवळीकही करपली नाही. यामुळेच यशवंतराव बुद्धिमान होते,तसेच अत्यंत भावनाशीलही होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यय राजकारणात दिसला,तर भावनाशीलतेचा प्रत्यय त्यांच्या साहित्य-कला प्रेमात व साहित्यनिर्मिर्तीत दिसला.यशवंतरावांना भारताच्या राजकीय व सामाजिक वास्तवाचा परिचय शालेय कालखंडातच होत होता. राजकीय पारतंत्र्य आणि सामाजिक विषमता या जटिल प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधींच्या राजकीय चळवळीत आणि सामाजिक समतेसाठी सत्यशोधक चळवळीत सकिय सहभाग घेतला.  गांधीप्रणित स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झालेले यशवंतराव गांधीवादी कधीच नव्हते,तर ते नेहरू-रॉयवादी होते हे विशेष. राजकीय सत्तेचा वापर करुन आर्थिक व सामाजिक समता स्थापन करण्यावर त्यांचा कायम भर होता. आर्थिक समृद्धिशिवाय सामाजिक समता हे केवळ दिवास्वप्न आहे,याची पूर्ण जाणीव त्यांना होती. आधुनिक विज्ञानाची कास धरून समाजपरिवर्तनाचे नवे युग निर्माण करू पाहणा-या यशवंतरावांनी शिक्षण व सहकार यांच्यातील सामर्थ्य पुरेपुर ओळखले होते.  महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिक्षणाची व सहकाराची गंगोत्री पोहचविण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात जनतेचा प्रचंड रोषाचा सामना करत यशवंतरावांनी द्विभाषिक राज्याचे व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. सर्वागीण विकासाची दुरदृष्टी व तळमळ असलेल्या यशवंतरावांनी बेरजेचे राजकारण करत प्रतिकुल परिस्थितीला अनुकुल करण्याचे आव्हान सहजपणे यशस्वी केले. आज महाराष्ट्रात यशवंतरावांचे गुणगाण करण्याची प्रथा प्रचलित आहे. असे भाग्य फार मोजक्या व्यक्तिंच्या नशिबात असते. याच महाराष्ट्रात यशवंतरावांनी कठोर टिका,उपहास व निर्भत्सना सोसलेली आहे. आपल्या टिकाकारांशी वा प्रखर विरांधकांशी मैत्रीचे व आपुलकीचे संबंध जोडण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. मृदू स्वभाव,धुरंधर मुत्सद्दी,शीलवंतता,शालीनता,रसिकता, औदार्य,विवक,गुणग्राहकता अशा सर्व श्रेष्ठ गुणांचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणजे यशवंतराव. जीवनातील सहकारवर गाढ श्रद्धा असलेल्या यशवंतरावांनी सर्वाना सोबत घेत,सर्वाच्या कल्याणसाठी  मनाच्या श्रीमंतीने माणूसकीच्या माध्यमातून मानवतेची बेरीज करत समतेच्या पायावर उभे मानवतेचे मंदिर साकारण्याचा ध्यास घेतला होता. आजच्या जाहिरातबाज राजकारणाचा विचार करता द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी केलेल्या कर्तबगारीचे वर्णन करण्यासाठी अनेक  ग्रंथ कमी पडू शकतात. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी शेती आणि औद्योगीकरण या दोन्ही क्षेत्रांना महत्व देण्याची गरज त्यांना वाटत होती. जमिनविषयक सुधारणा कायदयाची निर्मिती व अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीच्या क्षेत्रात प्रगती साधतांना मानवी व आर्थिक अशा दोन्ही बाजू सांभाळल्या जातील याची काळजी त्यांनी घेतली.शेतीला सहकाराचे बळ दिले. ऑगस्ट १९५७ मध्ये महाराष्ट्रात १८सहकारी साखर कारखान्यांची नोदणी करण्यात आली व त्यांच्यासाठी २८ लक्ष रूपयांचे भागभांडवल सरकारने गुंतवीले. सहकारी व निमसरकारी अशा दोन्ही स्तरावर शेतमाल प्रकिया उद्योगावर भर देण्यात आला. ग्रामीण बँका,पतसंस्था,भूविकास बँका अशा माध्यमातून शेतक-यांना आर्थिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आधुनिक दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देत त्याला सहकाराच्या माध्यमातून सशक्त करण्यात आले.औद्योगिकरणासाठी अनुकुल पर्यावरण निर्माण करण्यात आले. उद्योगांची तांत्रिक गरज भागविण्यासाठी व नवरोजगार निर्मितीसाठी तांत्रिक शिक्षण देणा-या संस्थांची निर्मिती करण्यात प्राधान्य देण्यात आले. प्रशासन हे लोकाभिमुख व लोककल्याणकारी करण्यासाठी महत्वाचे फेरबदल करुन,हे शासन व प्रशासन आपले आहे हा समाजाचा विश्वास दृढ करण्यात आला. शासन व प्रशासन स्वभाषेतून कार्य करत असेल ,तरच ते राज्यातील नागरिकांना आपले वाटेल आणि यातूनच स्वभाषा सशक्त-समृद्ध होईल याचे महत्व माहित असलेल्या यशवंतरावांनी भाषाविभाग स्थापन केला. राज्यकारभारात मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरण्यात आला.  सर्व बंधनमुक्त असे स्वायत्त विश्वकोष निर्मितीमंडळ वाई येथे स्थापन करण्यात आले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे हे समजलेल्या यशवंतरावांनी शिक्षणाचा सर्वागीण व सर्वदूर प्रसार करण्यासाठी कायम वाढीव निधी उपलब्ध करुन दिला. आधुनिक व सशक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाचे महत्व ओळखून पुस्तकी व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सोयी करण्यावर भर दिला. माध्यमिक व उच्च शिक्षण,तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण,शारीरिक शिक्षण व ललित कलांचे शिक्षण यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या. मराठवाडयाच्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. राज्यात शिक्षणाचे एक मनोहारी दृष्य याकाळात उभे राहिले. महाराष्ट्रातील नद्या व भूरचना यांचा अभयास करुन पाटबंधारे आणि वीजनिर्मिती संदर्भात कोयना जलविद्युत प्रकल्प,विदर्भातील पारस औष्णिक विद्युत प्रकल्प,पूर्णा प्रकल्प असे प्रकल्प उभे करण्यात आ.। औद्योगीक विकासासाठी सरकारी औद्योगीक वसाहती स्थापन करण्यात आल्या. नवबौद्धांना राखीव जागांची सवलत देण्याच्या निर्णय घेऊन त्यांच्या विकासातील अडसर दूर करण्यात आला. दिक्षा भूमी समाजार्पण करण्यात आली आणि डॉ.बाबासाहेब आंबंडकरांच्या जन्मदिवशी म्हणजे १४ एप्रिलला सार्वजनिक सुटटी देण्याची प्रथा सर्वप्रथम यशवंतरावांनी देशात सुरू  केली. वाङ्मय निर्मिती,नाटय-चित्रपट,लोकसाहित्य यांच्या विकासासाठी विविध योजना,मंडळे स्थापन करुन यशवंतरावांनी परिपूर्ण जीवनासाठी या कलांचे असलेले महत्व अधोरेखित केले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना,राज्य कामगार योजनेखाली मुंबईत महात्मा गांधी स्मारक रूग्णालय,महाराष्ट्रातील पहिले नर्सिग कॉलेज पहिली नेत्रपेढी,माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र सातारा, अद्ययावत क्षयरोग रूग्णालय नासिक,डोक्यावरुन  मैला वाहण्याची प्रथाबंदी,शुगर फॉर्मचे राष्ट्रीयीकरण,ई.बी.सी.सवलत अशा समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे कार्य आपल्या कल्पकतेतून,तळमळीतून व कर्तबगारीतून उभे करुन आधुनिक महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणा-या यशवंतरावांनी देशाच्या विकासातही तेवढेच मौलिक योगदान दिले आहे. देशाची हाक ऐकून हिमालयाच्या मदतीला या सहयाद्रीने धाव घेतली. जीवनाच्या अखेरच्या पर्वात विधीशून्य राजकारणाचा बळी ठरलेला हा महापुरुष जरी विजनवासात गेला, तरी त्याच्यातील संवेदनाशील मानवाचा त्याच्यातील राजकारण्याला कधीच बळी घेता आला नाही. संथ वाहणा-या कृष्णमायीच्या तीरावर रूजलेला आणि आकराला आलेला हा कल्पवृक्ष महाराष्ट्राच्या येणा-या प्रत्येक पिढीला सावलीच नव्हे ,तर आधार देणार आहे. या कल्पवृक्षाला चितारण्याचा कितीही प्रयत्न केला,तरी तो दशांगुळे उरणारच आहे.                                                 
                                  प्रा.डॉ. राहुल हांडे,                                               भ्रमणध्वनी - ८३०८१५५०८६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !