मराठी मातीचा उपेक्षित वारसा...
'' स्वतःच्या इतिहास,उगम आणि संस्कृती याविषयी अनभिज्ञ व अज्ञानी असलेला समाज म्हणजे मुळं नसलेला वृक्ष असतो '', असे प्रतिपादन प्रख्यात जमैयकन नीग्रो नेते मार्कस ग्रेव्ही ज्युनियर यांनी नीग्रो समाजाविषयी केलेले आहे. त्यांचा हा विचार भारतीय बहुजन समाजाला देखील अत्यंत चपखलपणे लागू होतो. भारतात बहुजनांचा इतिहास वा संस्कृतीच नव्हे तर त्यांचे तत्वज्ञान, वाङ्मय व भाषा यांचा वृक्षच नष्ट करण्याचा अथवा त्याचे बोन्साय करण्याचा प्रयत्न व प्रघात आर्याच्या आगमनापासून आजवर अस्तित्वात असलेला दिसतो. महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात या भूमीत इसवीसनाच्या नवव्या शतकापासून झालेल्या घडामोडी जरी लक्षात घेतल्या ,तरी याची यथायोग्य प्रतीति येऊ शकते. आज मराठी समाज,त्याची संस्कृती, त्याचे पुरोगामीत्व,भाषा,वाङ्मय,तत्वज्ञान,परंपरा,जनमानस अशा सर्व गोष्टींचे उगम व विकास याचे आदिकारण म्हणजे भागवत अथवा वारकरी संप्रदाय समजले जाते. असे समजण्यात काही वावगे देखील नाही. अखेर जे तत्वज्ञान व आचारपद्धती बहुसंख्य समाजाकडून,दीर्घकाळासाठी व अखंडपणे स्वीकारली जाते,तीच त्या समाजाच...