इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु पाहणा-या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक , सामाजिक , राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ' विनाशकाले विपरित बुद्धी ' या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत , साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुस-या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंदयांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य , व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना ,' करु णा-शील-प्रज्ञा ' हा महामंत्र देणा-या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्वव्यापक अशा बौद्ध धर्माची स्थापना केली. अलौकिक , काल्पनिक , अगोचर , कुट व गुढ संकल्पनांची मांडणी म्हणजे धर्मसिद्धांत आणि त्यांचा काथ्याकूट...