सत्य-शिव-सुंदर' मानवाचा चित्रकथी...खलील जिब्रान(रसिक पुरवणी,दै.दिव्य मराठी)
'सत्य-शिव-सुंदर' मानवाचा चित्रकथी... "तुम्ही मला विचारत आहात,की मी वेडा कसा झालो ? त्याचे झाले असे की एक दिवस सकाळी मी गाढ झोपेतून जागा झालो आणि पाहतो तर मी माझ्या चेह-यावर चढवलेले सर्व मुखवटे चोरीला गेले होते." दैनंदिन जीवनात अनेक मुखवटयांमध्ये स्वतःचा चेहरा हरवलेल्या प्रत्येक माणसाची व्यथा आपल्या 'पागल'(द मॅडमॅन) या कथेत व्यक्त करणारा भाववादी चिंतक,कवी,कथाकार व चित्रकार म्हणजे खलील जिब्रान. काव्य,कथा व चित्र यांना भावनीक चिंतनाच्या कोंदणात प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न हीच जिब्रानची कलानिर्मिती. उच्च कोटीचा तत्त्वज्ञानी असणा-या जिब्रानने तेवढयाच उच्च कोटीच्या कलानिर्मितीतून मुखवटयांमागील ख-या मानवी चेह-याचे सुंदर चित्रच रेखाटले आहे. जिब्रान तत्त्वज्ञ होता;परंतु त्याचे तत्वज्ञान रूक्ष व अतिवास्तवाच्या काटेरी कुंपणात जखडलेले नव्हते. माणसाच्या माणूसपणावर त्याचा गाढ विश्वास होता. जन्मजात कलावंत असलेल्या जिब्रानला,बालपणापासून चित्रकलेचे अंग लाभले होते. विविध आकार-आकृत्या त्याच्या मनःपटलावर ...